लोकसभा 2019: धनंजय मुंडे - 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं #राष्ट्रमहाराष्ट्र

"2014 साली राज्यात स्थिर सरकार यावं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मदत केली होती. एका निवडणुकीनंतर तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला. त्यामागे केवळ राज्याचं हित, हाच हेतू होता.
"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही," असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.
तेव्हा धनंजय मुंडे यांनी रा. स्व. संघ, भाजपाची भूमिका, बहुजन वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुतील भूमिका अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या अभिजित करंडे यांच्याशी बातचीत केली.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व हालचाली आणि भूमिका भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे, असं दिसत आहे. "राज्यामध्ये आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये 20 वेळा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवास करून लोकांची मतं जाणून घेतली आहेत. निर्धार परिवर्तन यात्रेतही तीच भूमिका आहे. त्यामुळं लोकांचं मत आम्हाला माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागा सोडण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी चर्चाच करायची, अशी भूमिका घेतली.
"वंचित बहुजन आघाडीला 2 ते 3 टक्क्यांशिवाय जास्त मतदान होणार नाही, हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा भाजप आणि रा. स्व. संघालाच मदत होणार आहे," असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात जातील का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, "मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये जाईल, हे मी पण बातम्यांमधूनच बघतोय. मी आता पर्यंत तरी रणजित दादांशी बोललो नाहीये, पण आता नक्की बोलेन."
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मावळ मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये आम्ही कार्यकर्त्यांमधून नेता झालेल्या उमेदवारांनाच तिकीट दिलं होते. मात्र त्यात यश आलं नाही. गेल्या वीस वर्षांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी या भागामध्ये भरपूर काम केले आहे, त्यामुळे आता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
पार्थ आणि रोहित पवार यांच्या घराणेशाहीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारल्यावर मुंडे म्हणाले, "या घराणेशाहीत मी येत नाही. माझं घरं कधीच वेगळं झालयं. माझं घर त्यात एकत्र कसं मांडता तुम्ही? माझे वडील कोणते मोठे नेते नव्हते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर मुंडेसाहेबांसाठीच काम केलं. ते मोठे व्हावे, यासाठी आयुष्य खर्ची घातलं."

'सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय सरकार कसं घेतं?'
"सर्जिकल स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले, हे भाजप अध्यक्ष अमित शाह कसे सांगू शकतात? बालाकोटचं श्रेय घेऊन त्याचा बाजार मांडला जात आहे. हे अत्यंत वाईट आहे. शहिदांचं राजकारण करण्याची वेळ भाजपवर आली आहे. अशी वेळ आमच्यावर आली तर त्यापेक्षा मी राजकारण सोडेन," असं मुंडे म्हणाले.

फोटो स्रोत, BBC
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








