CST ब्रिज दुर्घटना : 'एकाही राजकारण्याला मुंबईच्या नियोजनाचं काडीचंही ज्ञान नाही'

सीएसएमटी पूल
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पूल पडला, पूर आला, चेंगराचेंगरी झाली, रेल्वेची धडक, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, झोपड्यांना आग, खड्ड्यांमध्ये पडणे ही सगळी कारणं मुंबईकरांचा दररोज जीव घेणारी आहेत. यापैकी काहीही घडलं तर एकमेकांकडे बोट दाखवण्यासाठी वेगवेगळी प्रशासनं तत्पर असतात.

राजकारणी लोकांनी प्रशासकांकडे बोट दाखवण्याची पद्धतही मुंबईकरांसाठी नवी नाही. त्यामुळे मुंबईकरांचं आयुष्य आता खरोखर स्वस्त झालं आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

एकेकाळी औद्योगिकीकरणानंतर मुंबईमध्ये कोकण, महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध भागांमधून लोक जगण्यासाठी येऊ लागले.

पण विकासाच्या नावाखाली शहराचा बोजवारा उडाल्यावर या शहरात मरण स्वस्त होत गेलं त्यामुळे लोक इथं थेट मरण्यासाठीच येतात का असं वाटू लागलं आहे.

दीड वर्षांपूर्वी एलफिन्स्टन स्टेशनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील प्रवाशांची आणि पर्यायानं लोकांची काळजी घेतली जाईल असा भास निर्माण करण्यात आला होता. पण त्या दुर्घटनेनंतर काहीच बदललं नसल्याचं आता दिसत आहे.

भरपूर यंत्रणांमध्ये हरवलं शहर

मुंबईत महानगरपालिका, राज्य शासन, म्हाडा, एमएमआरडीए, विमानतळ, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे अशा विविध प्रकारच्या प्रशासन यंत्रणा एकाचवेळी काम करत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडल्यावर जबाबदारी घेण्याऐवजी एकमेकांवर जबाबदारी ढकलणं सोपं जातं. नंतर या गदारोळात मूळ प्रश्न सोडवणं राहून जातं.

मुंबईच्या नगरसुधारणेचा कार्यक्रम एकाही राजकीय नेत्याकडे असू नये?

मुंबईच्या या गोंधळावर आणि वारंवार घडणाऱ्या घटनांवर नगरनियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी बीबीसी मराठीकडे आपली प्रतिक्रिया दिली.

मुंबईत पावसाळ्यात हे ठरलेलं चित्र असतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईत पावसाळ्यात हे ठरलेलं चित्र असतं.

त्या म्हणाल्या, "या शहरात राजकारणी लोकांना राजकारणापुढे काहीच दिसत नाही. ब्रिटिश गेल्यावर काय सुधारणा झाल्या, कोणत्या कायद्यांमध्ये काय बदल झाले हे या राजकारण्यांना सांगताही येणार नाही.

एकाही राजकीय नेत्याकडे मुंबईच्या नगरसुधारणेचा कार्यक्रम नाही. सत्ता सर्वच पक्षांना पाहिजे असते, पण सत्ता कशी राबवायची, कशासाठी राबवायची याची आजिबात दृष्टी मुंबईच्या नेत्यांमध्ये नाही. एकाही नेत्याला मुंबई आणि् एकूणच शहराच्या नियोजनाचं काडीचंही ज्ञान नाही. किंवा ते असलं पाहिजे याची कल्पना नाही. एकूणच शहरांबाबत राजकीय नेत्यांना आस्था, किंवा अभ्यास नाही हे दिसून येतं."

"शहर वाचणारे नेते हवेत"

महाजन पुढे म्हणाल्या, "आताचे होणारे अपघात आणि दिशाहिन प्रशासनाकडे पाहिल्यावर मुंबईचा अभ्यासही राजकीय नेत्यांनी केलेला दिसत नाही. किती नेत्यांनी मुंबईचा इतिहास वाचला आहे का, असा प्रश्न पडतो? सगळं खापर प्रशासनावर फोडून कसं चालेल? प्रशासक तुमचे नोकर आहेत. तुम्ही मालक आहात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

प्रशासकांकडे कोणतंही आर्थिक बळ नाही. तुमच्या परवानगीशिवाय काहीच होणार नाही. अशा स्थितीत प्रशासकांना जबाबदार धरून कसं चालेल? शहर चालविण्यासाठी शहर वाचता आलं पाहिजे, शहर वाचणारे नेते किंवा प्रशासकचं शहराचा विकास करू शकतात. सध्याची स्थिती कायम राहिली तर पुढची 200 वर्षं या शहराचं काही होणार नाही, असं मला दिसतं."

बॉम्बे प्लॅनमधली व्हीजन

सुलक्षणा महाजन यांनी सध्याच्या मुंबईच्या फसलेल्या नियोजनाबद्दल सांगताना 1944 च्या बॉम्बे प्लॅनचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, "इतक्या 70 ते 80 वर्षांपूर्वीचा बॉम्बे प्लॅन पाहिला की वाटतं तेव्हा किती दूरदृष्टी होती. त्या सर्व नियोजनाची संपूर्ण जगात वाहवा व्हायची. पण आता तसं काहीच दिसत नाही. याची खंत वाटते."

हे शहर मेलं आहे...

काल ज्या पुलाचा काही भाग कोसळला त्या पुलाचा ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी दररोज वापर करतात. या पुलाबाबत त्या म्हणाल्या, "सुशोभीकरणाच्या नावाखाली या पुलावर ग्रॅनाईट लावला होता. पावसाळ्यात त्यावरून लोक घसरून पडायचे. या पुलाला जोडणारा पूल सीएसएमटी स्टेशनमध्ये आहे.

घसरलेलं राहणीमान आणि अनिश्चित आयुष्य यांच्यामध्ये मुंबईकर माणसाची कोंडी झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, घसरलेलं राहणीमान आणि अनिश्चित आयुष्य यांच्यामध्ये मुंबईकर माणसाची कोंडी झाली आहे.

त्या पुलावर चालणंही धोकादायक वाटतं. सतत हलणाऱ्या या पुलाबद्दल प्रशासनाला विचारलं तेव्हा त्याचं बांधकामचं वेगळ्या धाटणीचं आहे, असं उत्तर देण्यात आलं होतं. या पुलाच्या स्थितीबाबत अनेक वर्तमानपत्रांनी अनेकवेळा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

हे शहर मरू घातलं होतं आणि आता ते मेलंच आहे असं या अपघातांतून दिसतं"

"मुंबईची द्वारका झाली तर नवल नाही"

एकेकाळी सात बेटांची मुंबई खाड्या बुजवून तयार केली आहे. सध्या दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या विकासात अत्यंत धोका असल्याचे प्रतिमा जोशी सांगतात.

त्या म्हणाल्या, "हा सगळा भाग पाण्यातचं आहे. खाली कोठेही खणलं तरी पाणी लागतं, एकीकडे समुद्राची पातळी वाढते आहे. त्यातच मेट्रोसाठी आपण मुंबई खालून पोखरली आहे, वरती अनियोजित कारभार करून शेकडो मजल्यांच्या इमारती उभ्या राहात आहेत. मुंबई सलग तीन दिवस पाण्याखाली होती हे आपण विसरून गेलो आहोत. हे शहर द्वारकेसारखं पाण्याखाली गेलं तरी मला नवल वाटणार नाही."

आम्ही मुंबईकर पळून जाणार नाही- जयराज साळगांवकर

ज्येष्ठ साहित्यिक आणि 'मुंबई शहर गॅझेटियर' पुस्तकाचे लेखक जयराज साळगांवकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "हे आमचं शहर आहे, आम्ही निर्माण केलं आहे, आम्ही यावर प्रेम केलं आहे. ही घटना पाहिल्यावर संताप होत आहे. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हे अत्यंत सुंदर शहर आहे. या घटनांमुळे आम्ही मुंबईकर पळून जाणार नाही. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे."

असंच जगत राहाण्याशिवाय पर्याय नाही

मुंबईमध्ये पत्रकारिता करणाऱ्या सपना कदम-आचरेकर गेली अनेक वर्षे लोकलने प्रवास करत आहेत.

या असल्या अपघातांमुळं मुंबईकरांच्या बेभरवशाच्या झालेल्या आयुष्याबद्दल त्या म्हणाल्या, "दररोज सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करताना हा विचार असतोच... की आपण आज घरी सुखरूप पोहोचू ना? मी १४-१५ वर्षं हा जीवघेणा प्रवास करतेय."

पाण्याखाली जाणारं शहर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाण्याखाली जाणारं शहर.

"मुंबईत राहणाऱ्यांच्या मानाने उपनगरातून आणि त्याही पुढच्या भागातून मुंबईत नोकरीधंद्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल जास्त होतात.

मुंबईच्या गर्दीने आमचं आयुष्य इतकं व्यापलं आहे की ती आता आमच्या जीन्सचाच भाग झालीय‌. पण जेव्हा एखादा अपघात-आपत्ती घडते तेव्हा मोठ्या संख्येने जीवितहानी होते. त्यावेळी आम्ही मुंबईच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या जीवलगांच्या आणि आप्तजनांच्या काळजीने अस्वस्थ होतो.

पण दुसऱ्याच दिवशी आमचं मुंबई स्पिरीट जागं होतं आणि आमचं रुटीन सुरू राहतं. हा मुंबई स्पिरीटचा अभिमान किती बाळगावा, हे स्पिरिट योग्य आहे का माहीत नाही. पण त्याशिवाय पर्याय नसतो. कारण हे सातत्याने सुरू असतं. मुंबई राहण्यालायक किंवा प्रवास करण्यालायक राहिली नाही. पण असं बोलून प्रश्न सुटणार नाही.

गेल्या वर्षी मुंबईत भरवस्तीत विमान कोसळलं होतं. त्यामध्ये 5 जणांचे प्राण गेले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी मुंबईत भरवस्तीत विमान कोसळलं होतं. त्यामध्ये 5 जणांचे प्राण गेले होते.

मुंबई शहराचा विकास पूर्ण नियोजन करून केला तरच हा प्रश्र्न सुटेल. हे काम ज्यांच्या अखत्यारित आहे त्यांनी गांभीर्याने त्याचा विचार आणि कृती करायला हवी. Whatever it is I still love Mumbai."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)