स्वामी असीमानंद कोण आहेत? समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोट प्रकरण काय होतं?

फोटो स्रोत, PTI
2007च्या समझौता ब्लास्ट प्रकरणात असीमानंद यांच्यासह चारही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. 12 वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष NIA कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
18 फेब्रुवारी 2007च्या रात्री दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 68 लोकांचा जीव गेला होता.
सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलिसांनी केली आणि नंतर या हे प्रकरण National Investigation Agency किंवा NIA कडे सोपवण्यात आलं होतं.
कोण आहेत असीमानंद?
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातले असीमानंद यांचं खरं नाव नबकुमार सरकार असं आहे. त्यांनी वनस्पती विज्ञान (Botany) विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेतलं आहे. असीमानंद हे जितेन चटर्जी किंवा ओमकारनाथ या नावांनीही ओळखले जातात.

फोटो स्रोत, PTI
असीमानंद हे स्वत:ला साधू मानतात तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही राहिले आहेत. 1977 साली त्यांनी संघाच्या वनवासी कल्याण आश्रमसाठी काम सुरू केलं. जवळजवळ 20 वर्षं मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांनी संघासाठी काम केलं आहे.
2007मध्ये हैदराबादच्या मक्का मशिदीवर बाँब हल्ला झाला. Improvised Explosive Device किंवा IEDचा वापर करून या हल्ल्यात झाला होता. यात 9 लोकांचा मृत्यू झाला तर 50हून जास्त जखमी झाले होते.

फोटो स्रोत, PTI
तेव्हा असीमानंद यांना याप्रकरणी मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं. पहिल्यांदाच अशा घटनेत हिंदुत्ववादी संघटनेच्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं.
2010मध्ये असीमानंद यांना CBIनं ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार असीमानंद यांनी 1995मध्ये गुजरातच्या डांग जिल्ह्यात इतर हिंदू संघटनांसोबत 'हिंदू धर्म जागरण आणि शुद्धीकरण' हे कार्य सुरू केलं. त्यांनी शबरी माता मंदीर बनवलं आणि शबरी धाम स्थापन केलं.
आदिवासीबहुल भागांमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करणं आणि आदिवासींचं ख्रिस्ती धर्मांतर होण्यापासून रोखण्यात असीमानंद काम करत होते.
हैदराबादच्या मक्का मशीद स्फोटांप्रकरणी त्यांची चौकशी होत असतनाच त्यांचं नाव अजमेर, मालेगाव आणि समझौता एक्सप्रेस स्फोटांच्या खटल्यांमध्येही आरोपी म्हणून आलं.
असीमानंद यांचा जबाब आणि युटर्न
मार्च 2017मध्ये NIA कोर्टाने 2007च्या अजमेर स्फोटांप्रकरणी असीमानंद यांची पुराव्याअभावी सुटका केली.
पण 2010मध्ये दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात असीमानंद यांनी स्फोट घडवल्याची कबुली दिली होती. अजमेर शरीफ, मक्का मशीद, समझौता एक्सप्रेस आणि मालेगावमध्ये त्यांनी इतर सहकाऱ्यांबरोबर स्फोट घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. "हिंदूंवर मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यांचा हा बदला" असल्याचं त्यांनी सांगितलं.
42 पानांच्या या जबाबात असीमानंद यांनी आणखी कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार, संघ प्रचारक सुनील जोशी आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची नावं घेतली होती.
सुनील जोशी यांची 29 डिसेंबर 2007रोजी मध्य प्रदेशमध्ये गोळ्या घालून हत्या झाली होती.

असीमानंद यांच्या मते "सगळे मुस्लीम दहशतवादी हल्ले परतवून लावायचे असतील तर बाँबचं उत्तर बाँबनेच द्यावं लागेल."
आपला गुन्हा मान्य करताना असीमानंद म्हणाले होते की, "हैदराबादच्या मक्का मशिदीला लक्ष्य केलं होतं, कारण हैदराबादच्या निझामाला पाकिस्तानला जायचं होतं."
पण नंतर, NIAने आपल्याकडून असा जबाब बळजबरीने वदवून घेतला होता, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांची मक्का मशीद आणि अजमेर शरीफच्या दोन हल्ल्यांमधून सुटका करण्यात आली होती. पण समझौता एक्सप्रेस प्रकरणातले त्यांच्यावरील आरोप कायम आहेत.
या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा कोर्टानं 2014मध्ये असीमानंद यांची जामिनावर सुटका केली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








