Abhinandan dance video: पाकिस्तानात अभिनंदन वर्तमान यांनी भारतात परतण्यापूर्वी खरंच डान्स केला होता? - फॅक्ट चेक

फोटो स्रोत, SM VIRAL POST/YouTube
भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी मायदेशी परतण्याआधी पाकिस्तानात खरंच डान्स केला का? कारण सोशल मीडियावर तसं दाखवणारा एक व्हीडियो सध्या पसरवण्यात येत आहे.
पाकिस्तानने त्यांना भारताकडे सुपूर्द करण्याआधी अभिनंदन डान्स करत होते, असा या व्हीडिओमध्ये दावा करण्यात आला आहे. आणि फक्त भारतातच नव्हे, पाकिस्तानमध्येही हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे.
भारतात #WelcomeHomeAbhinandan तर पाकिस्तानमध्ये #PeaceGesture या हॅशटॅगसहीत हा व्हीडिओ पोस्ट केला जात आहे.
भारतात विशेषत: तेलुगूसहित इतर भाषांमधल्या मथळ्याखाली हा व्हीडिओ पोस्ट केला गेला. अभिनंदन मायदेशी परतल्यापासून हा व्हीडिओ हजारोवेळा शेअर करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Google
पण बीबीसीच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं दिसून आलं आहे.
युट्यूबर दिसणारा धुसर व्हीडिओ हा काही वर्षांपूर्वीचा आहे, असं गुगल इमेज रिव्हर्स सर्च केल्यावर कळलं, कारण त्यात मूळ व्हीडिओही सापडला.
हा व्हीडिओ 23 फेब्रुवारी 2019ला पहिल्यांदा अपलोड करण्यात आला आहे. संपूर्ण व्हीडिओ हा 4 मीनिटांचा आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक डान्स करत आहेत.
पाकिस्तान हवाई दलाचे ऑफिसर्स एका यशस्वी कारवाईनंतर आनंद साजरा करतानाचा हा व्हीडिओ असल्याचं व्हीडिओसोबत दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
पाकिस्तानी लोकगीत 'चिट्टा चोला' या गाण्यावर ते डान्स करत आहेत.

फोटो स्रोत, YouTube
अभिनंदन यांना पाकिस्तानने 27 फेब्रुवारी ताब्यात घेतलं होतं. पण हा व्हीडिओ 23 फेब्रुवारीला 2019 पोस्ट केला आहे. म्हणजे हा व्हीडिओ 23 तारखेपेक्षाही जुना असण्याची शक्यता आहे.
या व्हीडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीनं अभिनंदन यांनी घातलेल्या हवाई दलाच्या गणवेशासारखा हिरवा ड्रेस घातला आहे. बारकाईनं पाहिलं त्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर पाकिस्तान हवाई दलाचे चिन्ह लावलेलं आहे.

फोटो स्रोत, YouTube
शुक्रवारी हा जुना व्हीडिओ "अभिनंदन यांचा डान्स" असा दावा करत दोन्ही देशातल्या अनेक लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
(तुमच्याकडेही येणाऱ्या बातम्या, फोटो, व्हीडिओ संशयास्पद किंवा खोटेआहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची पडताळणी करायला +91-9811520111वर व्हॉट्सअॅप पाठवा. किंवा इथं क्लिक करून बीबीसीला पाठवा.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








