भूपेन हजारिका कुटुंबीय भारतरत्न पुरस्कार नाकारणार #5मोठ्याबातम्या

भूपेन हजारिका

फोटो स्रोत, Getty Images

सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. हजारिका कुटुंबीय नाकारणार सर्वोच्च सन्मान

दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतल्याची बातमी सकाळने दिली आहे.

आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे.'भारतरत्न' नाकारण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही.

'हजारिका यांचे नाव त्या वादग्रस्त विधेयकाशी जोडले जात आहे. या विधेयकाद्वारे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत हजारिका यांच्या नावाने 'भारतरत्न' जाहीर करून चुकीचा संदेश दिला जात आहे. , असे तेज हजारिका यांनी म्हटलं आहे.

2. नागेश्वर राव यांनी मागितली सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी

CBIचे माजी हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. सीबीआयचे हंगामी संचालक असताना बिहारमधील मुझफ्फरपूर वसतीगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी ए.के.शर्मा यांची बदली करणं ही आपली चूक होती असं राव यांनी स्वीकारलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

नागेश्वर राव

फोटो स्रोत, PTI

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांची बदली करू नये असे स्पष्ट आदेश दिले असतानाही बदली करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने राव यांना फटकारलं होतं.

3. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होणार

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या तुलनात्मक अभ्यासातून मुंबईत मराठी माणूस हद्दपार होत असल्याची बाब समोर आली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मुंबई हिंदी भाषिकांचं शहर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/GETTY IMAGES

2001 आणि 2011 सालच्या जनगणनेचा आधार घेऊन मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगडमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात असून हिंदी भाषिकांचं प्रमाण 70 ते 80 टक्क्यांनी वाढल्याचं या बातमीत पुढे म्हटलं आहे.

4. संसदीय समितीने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना 25 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

ट्विटरचे प्रमुख जॅक डोर्सी आणि कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना संसदेच्या समितीसमोर हजर राहण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. वारंवार सूचना देऊनही हजर न झाल्याची समितीने गंभीर दखल घेतली आहे.

"ट्विटरच्या कामाच्या पद्धतीसंदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ट्विटरच्या प्रमुखांची सोमवारची अनुपस्थितीची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. त्यांना सर्वसंमतीने 25 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे." अशी माहिती भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

5. आनंद तेलतुंबडेंना अटक केल्यास 1 लाखाच्या जामिनावर सोडा- उच्च न्यायालय

आनंद तेलतुंबडेंना 22 फेब्रुवारीला अटक करणार नाही अशा आशयाचं निवेदन पुणे पोलिसांनी जारी केलेलं नाही. त्यामुळे त्यामुळे सोमवारी मुंबई उच्च न्यायलयाने पुणे पोलिसांना आदेश दिले की तेलतुंबडेंना अटक केली तर 1 लाखाच्या जामिनावर सुटका करावी. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

आनंद तेलतुंबडे

फोटो स्रोत, You tube

2017 मध्ये झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)