मोदी सरकारने रफाल करारातून भ्रष्टाचारविरोधी कलम वगळलं? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE
सर्व महत्त्वाचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. रफाल करारादरम्यान वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम वगळला
रफाल करारादरम्यान झालेल्या वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम शेवटच्या क्षणी वगळण्यात आला, असा दावा 'द हिंदू'ने एका बातमीत केला आहे. भ्रष्टाचारविरोधी धोरणाचा झेंडा वर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने असं का केले, हा प्रश्न या वृत्तात उपस्थित करण्यात आला आहे.
फ्रान्सच्या दसॉ आणि भारताच्या अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या दोन कंपन्यांमध्ये 36 रफाल लष्करी विमानांसाठी हा करार झाला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी या 7.87 अब्ज पाउंडांच्या करारासंबंधीच्या वाटाघाटी केल्या होत्या. त्यात खुद्द पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्याची एक नोट 'द हिंदू'नेच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती.
आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अशा करारामध्ये सामान्यतः आढळणारी "Penalty for use of Undue Influence, Agents/Agency Commission, and Access to Company accounts" ही कलम शेवटच्या करार मसुद्यात वगळण्यात आली होती. या कराराअंतर्गत भ्रष्टाचारासाठी कठोर दंड तसंच दोन्ही पक्षांमधला व्यवहार थेट व्हावा, त्यात कुठल्याही तिसऱ्या व्यक्ती किंवा खात्याचा हस्तक्षेप नको, अशा तरतुदींसाठी ही कलम म्हणून महत्त्वाची मानली जाते.
करारादरम्यान दलाली किंवा पैशांची अफरातफर यांसारख्या गोष्टींना चपराक बसेल, हे यामागचं उद्दिष्ट. मात्र रफाल करारावर दोन्ही सरकारांच्या प्रतिनिधींनी सही करण्याच्या काही दिवसांपूर्वी ही कलम वगळण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
2. तृणमूल आमदाराच्या खुनाप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिस्वास यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी भाजप नेते मुकुल रॉय यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
रॉय हे तृणमूलचे माजी सरचिटणीस असून गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते.
बिस्वास यांचा बळी अंतर्गत वादातून गेला आहे, असं सांगत मुकुल रॉय यांनी हे आरोप फेटाळले आहेत. फुलबारी येथे सरस्वती पूजेदरम्यान सत्यजित बिस्वास यांची हत्या करण्यात आली होती.
3. स्वाईन फ्लूने डोके वर काढले; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
थंडीचा जोर वाढल्यामुळे स्वाईन फ्लुनेही डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळाक देशात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक 85 बळी राजस्थानात गेले आहेत.
त्या खालोखाल गुजरात, पंजाब, आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
देशभरात या आजाराने महिन्याभराच्या कालावधीत, 6,701 रुग्णांना स्वाईन फ्लूचं निदान झालं असून, आतापर्यंत 226 बळी गेले आहेत.
महाराष्ट्रात 138 लोकांना या रोगाची लागण झाली असून 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.
4. श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सात जवानांसह 11 जखमी
रविवारी सकाळी कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर काही तासांतच श्रीनगरच्या लाल चौकात रविवारी संध्याकाळी कट्टरतावाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात सुरक्षा दलाच्या सात जवानांसह 11 जण जखमी झाले.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP
जखमींमध्ये चार पोलीस, CRPF चे तीन जवानांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मदने एका स्थानिक वृत्तसंस्थेकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
5. अबुधाबीत हिंदीला कोर्टाची तिसरी भाषा म्हणून मान्यता
अबूधाबीच्या न्यायालयीन कामकाजात इंग्लिश आणि अरेबिक या विषयांबरोबरच आता हिंदीचाही समावेश करण्यात आला आहे. कामगारांच्या प्रकरणात याचा जास्त उपयोग होणार आहे, असं वृत्त खलीज टाइम्सने दिलं आहे.
या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना कोर्टाच्या कामकाजाची योग्य पद्धतीने माहिती मिळेल. तसंच त्यांचे हक्क समजून घेण्यात आता अडथळा येणार नाही. यामुळे न्यायायलाच्या कामकाजात पारदर्शकता येईल असंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








