रफाल करारावरून राहुल गांधी आक्रमक: 'वाड्रा, चिदंबरम यांची चौकशी करा, पण रफालवर उत्तरंही द्या'

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रफाल लष्करी विमान खरेदीच्या वादाने नव्याने भरारी घेतली आहे.

गुरुवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद देण्यासाठी मोठं भाषण केलं.

त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रफाल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. "मोदींनी 30 हजार कोटी घेऊन ते थेट अनिल अंबानींना दिले," असा गंभीर आरोप गांधींनी गुरुवारी संध्याकाळी केला.

त्यानंतर आज 'द हिंदू' वर्तमानपत्रात ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की "24 नोव्हेंबर 2015ची संरक्षण मंत्रालयातील एक अंतर्गत नोटनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्रालय आणि कराराशी संबंधित टीम यांची वेगवेगळी दखल घेतली होती."

याच बातमीच्या आधारे आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, "मी एका वर्षापासून म्हणत आहे की, नरेंद्र मोदींचा रफाल करारत प्रत्यक्ष सहभाग आहे."

"तरुण आणि लष्कराच्या जवानांसोबत मला बोलायचं आहे. पंतप्रधानांनी वायू दलाचे 30 हजार कोटी रुपये चोरी करून ते अनिल अंबानींना दिले आहेत," असं ते पुढे म्हणाले.

रफाल

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या करारासंबंधी समांतर व्यवहार केला आहे. सुरुवातील संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण या खोटं बोलल्या, त्यानंतर पंतप्रधान मोदी खोटं बोलले. याशिवाय मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयात खोटं बोललं आहे," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"सरकारला रॉबर्ट वाड्रा, पी. चिदंबरम यांच्याबाबतीत जी काही चौकशी करायची आहे ती जरूर करावी, पण रफालसंबंधित प्रश्नांची उत्तरंही द्यावीत," ते पुढे म्हणाले.

"फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रांसुआ ओलांद यांनीही म्हटलं आहे की रफालचा करार अनिल अंबानींसोबत करायचा आहे आणि HALला बाजूला सारायचं आहे, असं त्यांना मोदींनीच सांगितलं होतं. आता तर संरक्षण मंत्रालयाच्या या नव्या नोटमधूनही हे सिद्ध झालं आहे. चौकीदार चोर आहे, हे सिद्ध झालं आहे. पंतप्रधानांसाठी मला चोर या शब्दाशिवाय दुसरा कोणता शब्द सापडत नाहीये, " असंही गांधी यावेळी म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)