इंदिरा गांधींना प्रादेशिक नेत्यांबद्दल वाटणारी अडचण ठरली काँग्रेसच्या अधोगतीचं कारण?

काँग्रेस

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, राहुल गांधी
    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

देशातला सगळ्यांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये जीव ओतण्याचं आव्हानात्मक काम राहुल गांधी यांच्या हाती आहे.

दक्षिण मुंबईच्या छोट्या गल्ल्यांमधून काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते चालत होते. तिथल्या स्थानिक लोकांनी पक्षात येण्यासाठी ते आवाहन करत होते. भाजप सरकारच्या अपयशाबद्दलही लोकांना सांगण्याचा आदेश या कार्यकर्त्यांना देण्यात आला होता.

हातात काँग्रेसचा झेंडा घेतलेल्या आणि डोक्यावर काँग्रेसची टोपी घातलेले कार्यकर्ते बबलू गुप्ता म्हणतात, "पक्ष आम्हाला असा संदेश देत आहे की पक्षाचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचावा आणि भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करावा."

संदीप कोंडके काँग्रेस कार्यकर्त्यांच्या टोळीचं नेतृत्व करत आहेत ते सांगतात, "भाजप आणि त्यांची पालकसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पगार मिळतो. त्यांचे सोशल मीडियाचे लोक ट्विट करतात तर त्यांना पैसे दिले जातात. काँग्रेस लोकांकडे जाऊन निवडणुकीसाठी पैसा गोळा करत आहे."

लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे मात्र मागच्या वर्षीच्या शेवटी तीन राज्यात मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

संदीप कोंडके यांच्या मते भाजप सरकारला सत्तेतून हटवणं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. "लोकांना आम्ही आठवण करून देत आहोत की भाजप सरकारने जी वचनं दिली होती ती पूर्ण झालेली नाहीत. लोकांना कळलंय की त्यांनी भाजपवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे. यावेळी ते अशी चूक करणार नाहीत."

दक्षिण मुंबई मतदारसंघ हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी मुरली देवरा आणि त्यांनंतर त्यांचा मुलग मिलिंद देवरा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेसला फटका बसला. मुंबईत विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने एका जागेवर कब्जा केला तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं.

दक्षिण मुंबईच्या धर्तीवर काँग्रेसची मोहीम देशभरात सुरू आहे.

मागच्या निवडणुकांवेळी सभांदरम्यान नरेंद्र मोदींनी भारताला काँग्रेसमुक्त करण्याचं आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते, "बंधू-भगिनींनो, महात्मा गांधी यांनी चंपारण्यातून इंग्रजमुक्त भारताची हाक दिली होती. तसंच आता इथून बिगूल वाजायला हवं. गांधी मैदानातूनच काँग्रेसमुक्त भारताचं बिगूल वाजायला हवं."

काँग्रेस
फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशात

2014 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेला पराजय हा आतापर्यंतचा त्यांचा सगळ्यात नामुष्कीजनक पराभव होता. अनेक राज्यात काँग्रेसचं संस्थान खालसा झालं.

काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार झटके बसत असताना मोदींचं काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न साकार होईल अशी चिन्हं होती. एकाक्षणी राजकीय विश्लेषकांनी देशातला सगळ्यांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोडीत काढायला सुरुवात केली होती.

मात्र राजकारणात पाच वर्षांचा कालावधी खूप मोठा असतो हे पुन्हा एकवार सिद्ध झालं. 135 वर्षांचा इतिहास असलेल्या पक्षाला निकालात काढणं घाईघाईत काढलेला निष्कर्ष होता. हळूहळू काँग्रेसमध्ये तरतरीतपणा आला.

गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात झालेल्या निवडणुकांचे निकाल काँग्रेसचा उत्साह वाढवणारे होते. या निकालांनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. नेत्यांचा आत्मविश्वासही परतला आहे.

पक्षाचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह सांगतात, मोदी आणि भाजप अजिंक्य आहेत असं लोकांना वाटायचं. त्यांना हरवताच येणार नाही असं वाटायचं. मात्र आता चित्र बदलतं आहे. लोकांचा मूड बदलला आहे.

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी

आता पुन्हा एकदा काँग्रेस देशातला सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून निवडणुकांमध्ये असणार का? निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सक्षम झाली आहे का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही काही राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संपर्क केला. आम्ही उत्तर प्रदेशात पोहोचलो. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष 30 वर्षं सत्तेपासून दूर आहे. तामिळनाडूत 50 वर्षं काँग्रेस सत्तेपासून दुरावली आहे.

काँग्रेस
फोटो कॅप्शन, काँग्रेस कार्यकर्ते

महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशीही आम्ही बोललो. इथं 20 वर्षांपूर्वी पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. मात्र सत्तेपासून फार दूर नव्हते. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे.

दोन आठवड्यांच्या दौऱ्यात काही गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या आहेत.

  • अनेक वर्षं नैराश्यग्रस्त स्थितीत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसंच नेत्यांमध्ये आशेचा किरण जागृत झाला आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
  • तीन राज्यातील सकारात्मक निवडणूक निकालानंतर राहुल गांधींची पक्षातली प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्याप्रति निष्ठावान कार्यकर्त्यांचं वजनही वाढलं आहे.
  • तरुणवर्ग तसंच पहिल्यांदाच मतदान करणार असलेली मंडळी काँग्रेसचं मुख्य लक्ष्य आहेत. त्यांचं मन जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
काँग्रेस
फोटो कॅप्शन, मतदार काँग्रेसकडे आकर्षित होणार?
  • सोशल मीडियावर भाजपला टक्कर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
  • पक्षाचं अंतर्गत संघटन मजबूत झालं आहे. कार्यकर्त्यांची फळी ते कोअर टीम यांच्यातील वादविवाद संपुष्टात आला आहे.
  • अनेक राज्यांमध्ये काँग्रेस रसातळाला गेल्याचं चित्र आहे.
  • पक्षाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे आणि आतापासूनच त्यांची निवडणूक मोहीम सुरू झाली आहे.
  • पक्षातल्या हालचाली वाढल्या आहेत मात्र त्याचा वेग कमी आहे.

प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय म्हणजे तरुण आणि महिला वर्गाला आकर्षित करणं हे काँग्रेसचं प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मते हे उद्दिष्ट गाठणं हे मोठं आव्हान आहे.

2014 निवडणुकांमध्ये युवा पिढीला नरेंद्र मोदींनी भुरळ घातली होती. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मंडळींना मोदी आपलेसे वाटत होते. युवा वर्ग आणि प्रथम मतदान करणारी मंडळी आमचं लक्ष्य आहे, असं ते म्हणाले.

भारतातील युवक मोदी सरकारवर नाराज आहेत. ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे आकर्षित होत आहे.

भावना जैन मुंबईतील काँग्रेसच्या उदयोन्मुख नेत्यांपैकी एक आहेत. अनेक वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर 2008 मध्ये त्या देशात परतल्या आहेत.

भावना जैन, काँग्रेस
फोटो कॅप्शन, भावना जैन मुंबईत काँग्रेसचं काम करतात.

महिलांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी भावना यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. "पक्षात प्रवेश केल्यानंतर चारच वर्षांत मला स्थानिक निवडणुका लढवण्याची संधी मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष संघटनेत महिलांना अधिकाअधिक संधी धोरण्याचं धोरण अवलंबलं आहे. आमच्या पक्षात महिलांसाठी कोटा आहे," असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षात जीव ओतला जाताच काँग्रेसमधून अन्य पक्षात गेलेल्या काही नेत्यांनी घरवापसीचं धोरण स्वीकारलं आहे.

तारिक अन्वर यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते काँग्रेसमध्ये परतले आहेत. "सोनिया गांधींच्या विदेशीपक्षाच्या मुद्यावरून आम्ही काँग्रेसपासून विभक्त झालो होतो. ती आमची चूक होती. निवडणुकीत आम्हाला या चुकीची जाणीव झाली," असं ते म्हणाले.

काँग्रेस
फोटो कॅप्शन, तारिक अन्वर

काही अन्य पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी बसपातून काँग्रेसमध्ये आले आहेत. "काँग्रेस हा आमच्या पूर्वजांचा पक्ष आहे. आमचे आजोबा-बाबा याच पक्षात होते. आमच्या मागच्या पिढीने काँग्रेसलाच मत दिलं. त्यामुळे भाजपला कधीही जिंकता आलं नाही," सिद्दीकी सांगतात.

अगदी काही महिन्यांपर्यंत पप्पू म्हणून खिल्ली उडवण्यात येणाऱ्या राहुल गांधीचं नेतृत्व पक्षात सर्वमान्य होताना दिसत आहे.

याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, "आधीच्या तुलनेत राहुल गांधींचा पवित्रा आक्रमक झाला आहे. त्यांचा मूळ स्वभाव आक्रमक नाही, ते मवाळ विचारसरणीचे आहेत. मात्र भाजप रफालच्या मुद्यावरून खोटं बोलत असेल, गोष्टी लपवत असेल तर राग येणं स्वाभाविक आहे."

2014 च्या निवडणूक निकालांनी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला हे सत्य आहे. मात्र हे असं होऊ शकेल याची कल्पना काँग्रेसला आधीच आली होती.

"उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसची घसरण झाली आहे. मात्र खरा दणका 1989 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारने मंडल अहवाल लागू केल्यानंतर बसला. त्याच काळात भाजप एक पक्ष म्हणून विकसित झाला. 1986 मध्ये राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला. दलित चळवळ, जातीपातीचं राजकारण, मंडल आयोगाचा रिपोर्ट या तीन गोष्टीतून काँग्रेस पक्ष सावरलाच नाही," असं लखनऊचे ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्रनाथ यांनी सांगितलं.

त्यावेळी अनेक नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले होते. काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांचा मुलगा आणि बाराबंकी युवा काँग्रेसचे नेते तनुज पुनिया यांनी आपली भूमिका मांडली. "त्यावेळी अनेकजण आम्हाला सोडून निघून गेले. 2009 मध्ये जे आमच्याबरोबर होते, ते अन्य पक्षात सामील झाले. अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला."

काँग्रेस
फोटो कॅप्शन, तनुज पुनिया

पक्ष सोडणाऱ्यांमध्ये लखनौचे राजेश गौतम यांचाही समावेश आहे. ते आता उत्तर प्रदेशात भाजपचे खासदार आहेत. काँग्रेसला बाजूला सारत भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण त्यांनी उलगडलं.

"काँग्रेसमध्ये संघटना स्वरुप असं काहीच नव्हतं. कोणत्याही पक्षात राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवर नेत्यांची फळी असते. मात्र काँग्रेसमध्ये ठराविक लोकांचा कंपू आहे. त्यांची कामगिरी कशीही असो-त्यांचंच ऐकलं जातं. ते तुम्हाला पुढे सरकू देत नाहीत."

काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये क्षमतेला संधी मिळेल असं त्यांना वाटलं. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कोणाच्याही मागे पळण्याची गरज नाही. भाजप नेतृत्व काम करणाऱ्याला संधी देतं.

काँग्रेस पक्ष कमकुवत होण्याची आणखीही कारणं आहेत. इंदिरा गांधी यांना वाटणारी असुरक्षितता. चेन्नईतील ज्येष्ठ काँग्रेस नेते एस. वी. रमणी हे संजय गांधी यांचे मित्र होते. त्यांनी इंदिरा गांधींना काम करताना पाहिलं आहे.

"प्रादेशिक नेत्यांबद्दल इंदिरा यांना थोडी अडचण होती. प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांची ताकद वाढली तर पक्ष नियंत्रणात राहणार नाही, असं इंदिराजींना वाटायचं. पक्षाला नुकसान होईल अशा नेत्यांना इंदिरा यांनी बाजूला सारलं."

काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळ्या आणि नेत्यांमधील तंटे यामुळे पक्ष कमकुवत झाला. आपल्या वैचारिक भूमिकेपासून फारकत घेणं पक्षाला महागात पडलं आहे.

काँग्रेस
फोटो कॅप्शन, काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंह

काँग्रेस पक्षाने युवा मतदारांचं महत्त्व समजून घेतलं नाही. यामुळे युवा नेतृत्व तयार होऊ शकलं नाही असं काँग्रेसचे नेते आणि राजकीय विश्लेषक सांगतात.

चेन्नईतील फ्रंटलाइन मासिकाचे संपादक विजय शंकर सांगतात, तामिळनाडूतील द्रविड पक्षांमध्ये युवा मंडळींचा भरणा आहे. मात्र काँग्रेस त्यांना आपल्याकडे वळवू शकलेली नाही. यामुळे पक्ष मजबूत झाला नाही. हीच चूक अन्य राज्यातही झाली.

म्हणूनच आता युवा मतदार काँग्रेसचं मुख्य लक्ष्य झालं आहे.

काँग्रेसने शक्ती नावाने एक प्रकल्प राबवला आहे. त्याअंतर्गत युवा तसंच महिला वर्गाला जोडण्यात येतं आहे.

मोठे नेते आणि शेवटच्या फळीतील कार्यकर्ते यांच्यातील संवाद वाढवणं हाही हेतू आहे. मुंबईतील नेहरू नगर झोपडपट्टीतील कार्यकर्त्याने सांगितलं- वाईट काळातही काँग्रेसशी निष्ठा जपली आहे. राहुल गांधींनी महिला तसंच युवा वर्गाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे हे खूप चांगलं आहे.

या कार्यकर्त्याची पत्नीही काँग्रेससाठी काम करते. शक्ती प्रकल्पाअंतर्गत थेट राहुल गांधींशी संपर्क साधता येतो. स्मार्टफोनवर शक्ती अॅप स्वरुपातही आहे.

हे अॅप कसं काम करतं याविषयी मी शहरातल्या आणि गावातील कार्यकर्त्यांना विचारलं. शक्ती प्रकल्प हा काही ऐतिहासिक उपक्रम नाही तसंच मोठ्या उत्साहाने त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

काँग्रेस
फोटो कॅप्शन, छत्तीसगढमधील एक चित्र

एका तरुणाने आपलं मन मोकळं केलं. तो म्हणाला, ''राहुल गांधी मोठे नेते आहेत. त्यांनी युवांना व्यासपीठ मिळवून दिलं आहे. मी युथ काँग्रेसशी संलग्न आहे. मला राहुल गांधी आवडतात. कोणीही नेता होऊ शकतं हा विश्वास राहुल यांनी मिळवून दिला आहे.

गेल्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या आघाडीवर भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला. मात्र आता सोशल मीडियावर आम्ही भाजपला मागे टाकल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात येतो आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसच्या विजयात सोशल मीडियाचं मोठं योगदान असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस
फोटो कॅप्शन, राजेश गौतम

के के शास्त्री पक्षाच्या सोशल मीडिया युनिटशी संलग्न आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये त्यांनीच काँग्रेसच्या सोशल मीडियाची रणनीती तयार केली होती.

ते सांगतात, ''2014 मध्ये सोशल मीडियावर काँग्रेसचं अस्तित्वच मर्यादित होतं. गेल्या वर्षीपर्यंत दोन राज्यात काँग्रेस सोशल मीडियाच्या बाबतीत भाजपपेक्षा पुढे आहे. आम्ही उशिरा सुरुवात केली आहे, पण आता आम्ही वेगाने पुढे निघालो आहोत."

प्रादेशिक पक्षांचा उदय होत असताना एककेंद्राभिमुख काँग्रेस पक्षाची घसरण होणं साहजिक होतं, असं भारतीय राजकारण जवळून पाहणारे अभ्यासकही सांगतात.

1951 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये सहभागी पक्षांची संख्या 53 होती. 1957 मध्ये ही संख्या घटून पक्षांची संख्या 15 झाली आहे. गेल्या निवडणुकांच्या वेळेस देशातील पक्षांची संख्या 1900 एवढी होती. यापैकी 465 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.

काँग्रेस

फोटो स्रोत, Pti

फोटो कॅप्शन, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी

काँग्रेस पक्ष नव्याने उभा राहत आहे मात्र त्याचा वेग कूर्म असल्याचं पक्षाचे नेते आणि जाणकारांना वाटतं.

ज्येष्ठ पत्रकार विजय शंकर यांच्यामते काँग्रेसला मिळालेली नवसंजीवनी एक मोठी प्रक्रिया आहे.

लखनऊचे ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्रनाथ भट सांगतात, "वेळेच्या बाबतीत मतभिन्नता असू शकते. मात्र काँग्रेस आगेकूच करेल यात शंकाच नाही. मात्र यासाठी वेळ लागेल."

मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणुका जिंकू शकत नाही. त्यांना मित्रपक्षाची आवश्यकता आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात, "एक गोष्ट स्पष्ट आहे. वेगवेगळ्या राज्यात मित्रपक्षांची मदत घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरावं लागेल. आतापर्यंत झालेल्या 15 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणुका जिंकल्या आहेत. चारवेळा त्यांनी आघाडीचं सरकार उभारलं. आगामी लोकसभा निवडणुकीत काय होईल हे सांगणं अवघड आहे. 2014 मध्ये केवळ 44 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)