राहुल गांधींनी बिहारी तरुणांना खरंच बेरोजगार म्हटलं का? : बीबीसी फॅक्टचेक

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या भाषणाचा 21 सेकंदंचा एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

या व्हीडिओत दावा केला जात आहे की पाटण्याच्या गांधी मैदानात रविवारी झालेल्या जन आकांक्षा रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी संपूर्ण बिहार राज्याचा अपमान केला आहे.

भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरही हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

24 तासापेक्षा कमी काळात जवळजवळ पन्नास हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे आणि दोन लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हीडिओ पाहिला गेला आहे.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, भाजप खासदार विनोद सोनकर, गिरीराज सिंह शांडिल्य यांच्यासह भाजपच्या बिहार शाखेतल्या अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हीडिओमध्ये राहुल गांधींची वाक्यं काहीशी अशी ऐकू येतात. "बिहारच्या युवकांना जेव्हा विचारतो की तुम्ही काय करता? तेव्हा ते सांगतात, काहीच नाही."

मात्र आम्ही केलेल्या पडताळणीत आम्हाला असं लक्षात आलं की भाजपने राहुल गांधींच्या भाषणाबरोबर छेडछाड केली आहे. त्यांच्या भाषणाचा काही भाग काढून टाकण्यात आला आहे आणि त्याला चुकीचा संदर्भ देऊन सादर करण्यात आलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

काँग्रेसच्या यू ट्यूब चॅनल नुसार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जन आकांक्षा रॅलीत 30 मिनिटांचं भाषण केलं होतं.

त्या रॅलीत त्यांनी नोटबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कथितरित्या काही कॉर्पोरेट घराण्यांना नफा मिळवून दिल्याचं बोलले होते. त्यातच त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यालाही स्पर्श केला होता.

भाजपाने जिथं फक्त बेरोजगारीचा उल्लेख केला होता तोच भाग व्हायरल केला.

राहुल गांधी (फाईल फोटो)

फोटो स्रोत, You tube grab

राहुल गांधी म्हणाले होते, "आधी तुम्ही शिक्षणाचं एक मोठं केंद्र होतात. नालंदा विद्यापीठ फक्त पाटण्यातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध होतं. मात्र आज अशी परिस्थिती नाही. आज तुम्ही कशाचं केंद्र आहात याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही बेरोजगारीचं केंद्र आहात. बिहार हे बेरोजगारीचं केंद्र झालं आहे. बिहारचा युवक संपूर्ण देशात फिरत असतो.

तुम्ही बिहारच्या कोणत्याही गावात जा आणि त्यांना विचारा की तुम्ही काय करता? काही नाही हेच उत्तर मिळेल. मोदींनी रोजगार दिला? नाही. नीतिश कुमारांनी रोजगार दिला? नाही. बिहारचा युवक गुजरातमध्ये गेला तेव्हा त्याला मारहाण करून पळवण्यात आलं. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीही स्थान नाही. मात्र तुमच्यात काहीही उणीव नाही. तुम्ही पुन्हा एकदा शिक्षणाचं केंद्र होऊ शकता?"

बेरोजगारी एक मोठा मुद्दा

रविवारी त्यांनी घोषणा केली होती की त्यांचं सरकार सत्तेवर आलं तर पाटणा विद्यापीठाला केंदीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल.

मात्र देशातील प्रतिभावान अधिकारी, खेळाडू आणि महत्त्वाच्या व्यक्ती देणाऱ्या बिहार राज्याचा अपमान केला असा आरोप राहुल गांधीवर झाला. त्या व्हीडिओबरोबर छेडछाड झाली आहे.

व्हीडिओच्या दहाव्या सेकंदानंतर एक वाक्य हटवलं आहे की, "बिहारच्या लोकांना रोजगारासाठी फेऱ्या माराव्या लागतात."

खरा व्हीडिओ पाहिल्यावर असं लक्षात येतं की हे स्पष्ट होतं की राहुल गांधी बेरोजगारीच्या मुद्द्यावर नीतीश कुमार आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य करत होते.

लोकसंख्येवर नजर टाकली असता असं लक्षात येतं की बिहारमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 27 टक्के तरुण आहेत. त्यांचं वय 15 ते 30च्या दरम्यान आहे. संख्येचा आधार घ्यायचा झाल्यास हा आकडा 10 कोटींपेक्षा जास्त येतो.

तज्ज्ञांच्या मते औद्योगिकीकरणच्या अभावामुळे तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी कमी होत आहेत.

उत्तर प्रदेशातल्या सहरसा, मधेपुरा आणि सुपौल जिल्ह्यातले अनेक मजूर दिल्ली पंजाबसह इतर राज्यांमध्ये दरवर्षी पलायन करतात. कामगार विभागाकडे तिथं जाणाऱ्या मजुरांची आकडेवारी उपलब्ध नाही.

त्यामुळे 2015च्या विधानसभा निवडणुकीत रोजगार हा मोठा मुद्दा होता आणि या लोकसभा निवडणुकीतही तो राहिल.

बेरोजगारांची संख्या

सरकारी आकडेवारीनुासर ज्या राज्यात रोजगाराची स्थिती खराब आहे त्यात बिहारचाही समावेश आहे.

भारतीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या चंदीगडमधल्या ब्यूरोच्या एका अहवालानुसार बिहारमध्ये नियमित रोजगार मिळणाऱ्या श्रमिकांची टक्केवारी सगळ्यांत कमी (9.7%) आहे.

राहुल गांधी, मनोहर पर्रिकर, रफाल

फोटो स्रोत, Twitter

एखाद्या घरातल्या सदस्याकडे नियमित रोजगार आहे अशा घरांची संख्या सुद्धा अतिशय कमी असल्याचं या आकडेवारीत समोर आलं आहे.

बिहारमधील मनुष्यबळ विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, बिहारमध्ये नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या 9 लाख 80 हजारांपेक्षा जास्त आहे. हे ते लोक आहे ज्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की वर्षाला सरासरी दी़ड लाख अशा दराने चार लाख नवीन बेरोजगार या आकडेवारीत दाखल झाले आहेत.

या पोर्टलवर अनेक लोकांनी रजिस्टर केल्यामुळे हा आकडा गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)