कुंभ मेळ्यामध्ये हरवलेले लोक जातात तरी कुठे?

फोटो स्रोत, Ankit Srinivas
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हरिद्वारमध्ये सध्या कुंभ मेळा सुरू आहे. कोरोनाचं संकट असलं तरी लाखो भाविक कुंभला हजेरी लावत आहेत. इतक्या गर्दीत अनेकदा लोक हरवतात. दोन वर्षांपूर्वी प्रयागराज (पूर्वींचं नाव अलाहाबाद) इथे भरलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने इथे हरवलेल्या लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. तोच लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
जुन्या हिंदी चित्रपटांमुळं 'कुंभ के मेले मे बिछडे' हा शब्दप्रयोग विनोदाचाच विषय झाला होता. मात्र आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाणं हे प्रत्यक्षात अतिशय वेदनादायी ठरू शकतं.
त्यामुळेच कुंभ मेळ्यामध्ये हरवलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेताना दिसतात.
प्रयागराज (पूर्वींचं नाव अलाहाबाद) येथे 49 दिवस चालणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये जवळपास 11 कोटी भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
एवढ्या प्रचंड जनसागरात एखादी व्यक्ती हरवली तर तिला मदत कशी मिळवून दिली जाते, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीच्या गीता पांडे यांनी कुंभ मेळ्यातल्या मदत केंद्रांमध्ये एक दिवस घालवला.
सर्वांत जुनं 'भुले भटके शिबीर'
"इथे येणाऱ्या बहुतांशी व्यक्ती या वृद्ध असतात. त्यातही 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांची संख्या जास्त आहे," असं उमेश तिवारी यांनी सांगितलं. तिवारी हे 'भुले भटके शिबिरा'चे प्रमुख आहेत.
हे शिबीर भारत सेवा दल या धर्मादाय संस्थेकडून चालवलं जातं. अलाहबादमधलं हे सर्वांत जुनं केंद्र उमेश यांचे वडील राजाराम तिवारी यांनी 1946 मध्ये सुरू केलं होतं. आतापर्यंत त्यांच्या केंद्रानं 15 लाख लोकांची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून आणली आहे.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
'भुले भटके शिबिरा'च्या प्रवेशद्वारावरच पोलिस नवीन आलेल्या व्यक्तींची माहिती नोंदवून घेत होते. त्यांचं नाव, पत्ते, ते कोठून आले आहेत, त्यांच्याबाबत कोणाशी संपर्क करायचा असे तपशील विचारले जात होते. आतमध्ये मित्र किंवा कुटुंबियांपासून दुरावलेल्या जवळपास डझनभर व्यक्ती काहीशा चिंताग्रस्त होऊन वाट पाहत बसल्या होत्या. काही जण आवारात टाकलेल्या खाटांवर बसले होते तर काहींनी जमिनीवरच बसकण मारली होती.
वातावरणात काहीसा तणाव होता. आप्तेष्टांच्या काळजीमध्येच सगळा वेळ जात होता. रडवेल्या आवाजात लोक विनंती करत होते, "माझं नाव अजून एकदा पुकारा ना!"
"आम्ही बाथरुमला जात होतो आणि गर्दीत हरवलो." 35 वर्षांची महिला तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत मदत केंद्रात आली होती. मुलीच्या अंगाभोवती ब्लँकेट लपेटण्यात आलं होतं. कारण इथे आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते.
"माझे पती आणि मुलगा आंघोळीला गेले. मी मुलीला घेऊन बाथरूमकडे गेले. परत आलो तेव्हा आम्हाला ते दोघेही सापडले नाहीत," ही महिला सांगत होती.
कुंभ मेळ्याला आलेले श्रद्धाळू गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र संगमावर स्नान करतात. हिंदू मान्यतेनुसार या स्नानाला अतिशय महत्त्व आहे.
"आम्ही आसपास चौकशी केली आणि सकाळी अकराच्या सुमारास या केंद्रावर पोहोचलो," या महिलेनं सांगितलं.
"इथे आम्ही खूप वेळ वाट पाहत आहोत. पुढं नेमकं काय करायचं हेदेखील आम्हाला माहित नाही." त्यांचा मोबाईल फोन, पर्स आणि इतर सर्व सामान त्यांच्या पतीजवळ होतं. त्यामुळं त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर होता.
त्यांच्या मुलीसाठी ढगळ का होईना पण कपड्यांची सोय झाली आणि वारंवार स्पीकरवरून त्यांचं नाव पण पुकारलं. मात्र कोणीही त्यांच्या चौकशीसाठी आलं नव्हतं. उमेश तिवारींनी त्यांना बसचं भाडं देऊ केलं. मात्र या मायलेकी रात्री उशीरा प्रवास करायला तयार नव्हत्या.
"मी जिथे राहते, थेट त्या गावापर्यंत प्रवासाची सोय नाहीये. मग मी सुरक्षितपणे घरी पोहोचणार कशी?" असा या महिलेचा प्रश्न होता. ही महिला आणि तिची मुलगी रात्रभर मदत केंद्रातच राहू शकतात, असं तिवारी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
तिवारी यांनी म्हटलं, "काही दिवस हे इतके गर्दीचे असतात की लोक हरवून जातात. आमच्या केंद्रात सकाळपासूनच ५६० लोक आले आहेत . त्यांपैकी ५१० लोकांची भेट त्यांच्या कुटुंबियांशी घडवून आणण्यात आम्हाला यश मिळालं."
संध्याकाळ होत आली, तरीही इतरांचं वाट पाहणं सुरूच होतं. त्यांपैकी एक अतिशय वृद्ध गृहस्थ होते, जे आपल्या पत्नीपासून दूर झाले होते. "आता ती कुठे असेल? तिनं काही खाल्लं असेल का? तिच्याकडे मोबाईल फोन किंवा पैसे नाहीयेत," ते डोळे पुसत सांगत होते.
"लोक विचार करतात की असं काय वाईट घडणार आहे? पण जेव्हा संकट येतं, तेव्हा तुम्ही हतबल होऊन जाता," तिवारी यांनी म्हटलं.
उमेश तिवारी यांच्याकडे २५ स्वयंसेवक आहेत. ते मेळ्यात फिरत राहतात आणि कोणी हरवलं असेल तर त्यांना 'भुले भटके शिबिरा'मध्ये घेऊन येतात.
"लोकांना दूर करणं किंवा एकत्र आणणं ही देवाची इच्छा असते. मी केवळ त्यांची सेवा करतो. हे हरवलेले लोक माझ्यासाठी देव आहेत."
'माझं खरं नाव कोणालाच माहित नाही.'
'भुले भटके शिबिरा'पासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरच 'खोया-पाया केंद्र' आहे. हे केंद्र पोलिसांकडूनच चालवलं जातं. मी जेव्हा भरदुपारी या केंद्रावर पोहोचले, तेव्हा इथे बऱ्याच घडामोडी सुरू होत्या.
नोंदणी काउंटवर स्वयंसेवकांची गर्दी होती. यातील बरेच स्वयंसेवक तरूण होते. समोरच्या कॉम्प्युटरवर ते हरवलेल्या लोकांची नोंद करून घेत होते.
काही स्वयंसेवक राज्याच्या बाहेरून आलेले होते. त्यामुळं त्यांना इथल्या बोलीभाषांचा लहेजा समजून घेण्यात अडचण येत होती. काही सांस्कृतिक संदर्भही लक्षात येत नव्हते.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
एका काउंटरवर साठीच्या एक आजीबाई आल्या होत्या. तिथल्या स्वयंसेवकांनं त्यांना अर्जामध्ये भरण्यासाठी त्यांचं नाव विचारलं.
"राम बिसल की अम्मा," असं त्यांनी सांगितलं. त्या स्वयंसेवकाच्या काही लक्षात आलं नाही. तो म्हणाला, "मला तुमच्या मुलाचं नाव नको आहे. तुमचं नाव सांगा." माझं खरं नाव कोणालाच माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. पण स्वयंसेवकांनी खूपच आग्रह केल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव सरस्वती देवी मौर्य असं सांगितलं.
त्यांच्या गावातल्या इतर पाच जणांसोबत सरस्वती देवी कुंभ मेळ्यासाठी आल्या होत्या. संगमावर सरस्वती देवींची त्यांच्या गटापासून ताटातूट झाली. त्यांनी साधारण तासभर स्वतःच आपल्या सहकाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सापडले नाहीत, तेव्हा केंद्रावर आल्या. त्यांनी गटातील दोन पुरूषांची नावं सांगितली पण त्यांना त्यांचे फोन नंबर सांगता आले नाहीत.
सरस्वती देवींप्रमाणेच अनेक जण आपल्या मित्र आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी वाट पाहत आहेत. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, फारसे शिकलेले नाहीत, त्यांना आपल्या नातेवाईकांचे फोन नंबर सांगता येत नाहीयेत. काही जणांना ते जिथून आले आहेत, तिथपर्यंत कसं पोहचायचं हेसुद्धा सांगता येत नव्हतं.
सरस्वती देवी नशीबवान होत्या-त्या ज्यावेळेस तक्रार नोंदवत होत्या, त्याचवेळी जवळच्याच एका केंद्रात दोन तरुण मुलं हरवल्याची तक्रार करायला आली होती. ही मुलं सरस्वती देवींनाच शोधायला आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्या सर्वांनी जेव्हा एकाचवेळी बोलायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान लपत नव्हतं. "त्यांना काही झालं तर नाही ना, अशी भीती आम्हाला वाटत होती. त्या आमच्या शेजारी आहेत. त्या मिळाल्या नसत्या तर आम्ही कोणत्या तोंडानं गावी परत गेलो असतो?" परेश यादव सांगत होते.
थोड्याच वेळात श्यामकाली या वृद्ध महिलाही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाल्या. या दोघीही ज्येष्ठ महिला एकमेकांना पाहून खूश झाल्या. पण तरीही श्यामकाली सरस्वती देवींवर काहीशा नाराजही दिसत होत्या. सरस्वती देवी फाजील आत्मविश्वास दाखवून नदीवर एकट्याच गेल्या, असं त्यांचं म्हणणं होतं. सरस्वती देवींना मात्र इतरांनी काळजी न घेतल्यानं आपण हरवलो असं वाटत होतं. दोघींचा राग लवकरच निवळला आणि त्यांनी एकमेकींना मिठी मारली.
दरम्यान, हरवलेले लोक सतत येत राहिल्यामुळं स्वयंसेवक खूप व्यस्त होते. हरवलेले बरेच लोक त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचले होते. काही लोकांच्या गोष्टीचा शेवट मात्र सुखद नव्हता.
नोखा देवी मदत केंद्रात येऊन तास उलटून गेले होते, मात्र स्वयंसेवकांना त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्या त्रासलेल्या दिसत होत्या आणि कोणत्याही प्रश्नाचं नीट उत्तर त्यांना देता येत नव्हतं.
"पुढच्या 12 तासांत त्यांची चौकशी करायला कोणी आलं नाही, तर आम्ही त्यांना पोलिसांकडे देऊ आणि त्यांना तिथून निराधार लोकांसाठीच्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल," एका स्वयंसेवकाने सांगितले.
'...तर तिच्या कुटुंबाला आम्ही काय उत्तर देऊ?'
मी मेळ्यात लोकांना भेटत, त्यांच्या कहाण्या ऐकत फिरत असतानाच दोन वृद्ध स्त्रिया माझ्याकडे आल्या. त्यांच्या हातात कागदाचं चिटोरं होतं. त्यावर त्यांनी हिंदीमध्ये दोन लोकांची नावं आणि मोबाईल नंबर लिहिलेले होते.
"तुम्ही या नंबरवर कॉल करून माझी मैत्रीण आमच्या कॅम्पवर आहे की नाही मला सांगता का?" दोघींपैकी एकीनं मला विचारलं.
या महिलेनं आपलं नाव प्रभा बेन पटेल असल्याचं गुजरातीमधून सांगितलं. त्या अहमदाबादजवळच्या एका गावातून त्यांच्या मैत्रिणीसोबत आल्या होत्या.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
"आम्ही संगमावर जाऊन स्नान केलं आणि मग जवळच्याच मंदिरामध्ये गेलो. तिथेच आमची मैत्रीण हरवली," त्यांनी सांगितलं.
त्यांना मदत न करणं शक्यच नव्हतं. त्या महिला खूपच घाबरलेल्या होत्या. "ती सापडली नाही तर तिच्या कुटुंबाला आम्ही काय उत्तर देऊ?" त्यांनी मला विचारलं.
मी एका नंबरवर फोन केला. पलिकडून उत्तर आल्यावर मी तो प्रभा बेनकडे दिला. त्यांनी सगळी परिस्थिती पलिकडच्या व्यक्तिला समजावून सांगितली आणि फोन ठेवून दिला.
थोड्या वेळानं माझा फोन पुन्हा वाजला. पलिकडून एक महिला बोलत होती. मी फोन प्रभा बेनकडे दिला. फोनवरचा आवाज ऐकून त्यांना हायसं वाटल्यासारखं दिसलं. त्यांचा चेहरा हसरा झाला. त्यांची मैत्रीण ठीक होती आणि कॅम्पवर पोहोचली होती.
'भुले भटके शिबिरा'ला लागूनच केवळ महिला आणि मुलांसाठी असलेला एक कॅम्प होता. हा कॅम्प हेमवती नंदन बहुगुणा स्मृती समिती या स्थानिक धर्मादाय संस्थेकडूनच चालवला जातो. ही संस्था १९५६ पासून कुंभ मेळ्यामध्ये हरवलेल्या व्यक्तिंसाठी कॅम्प चालवते.
सकाळपासून आम्ही ९५० लोकांना त्यांच्या आप्तस्वकीयांशी भेट घडवून आणली, अशी माहिती संत प्रसाद पांडे यांनी मला दिली. 15 लोकांची मात्र त्यांच्या कुटुंबियांसोबत अजूनही भेट झाली नाही, असं पांडेंनी सांगितलं.
"जे इथं थांबले आहेत, त्यांना आम्ही अन्न, कपडे आणि ब्लँकेट पुरवतो. जे स्वतः एकटे प्रवास करू शकतात, त्यांना आम्ही तिकीट काढून देतोय किंवा प्रवासखर्चाचे पैसे देतो."
पांडे यांच्या कॅम्पमध्ये एकूण १०० स्वयंसेवक आहेत. मेळ्यामध्ये एकट्यानं फिरताना दिसणाऱ्या, कुठेतरी रडत बसलेल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना या स्वयंसेवकांना देण्यात आली आहे.
'कोणाला तरी माझी पाच वर्षांची मुलगी सापडेल.'
संध्या विश्वकर्मा या आशेपोटीच पांडे यांच्या शिबिरामध्ये थांबल्या आहेत. त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीची, राधिकाची वाट त्या पाहत आहेत.
"ती हरवून तास झाला आहे, त्या रडत रडत सांगत होत्या. तिला आम्ही सगळीकडे शोधलं आणि आता तिच्यासंबंधी घोषणा करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. कोणाला तरी ती सापडेल आणि तिला ते आमच्यापर्यंत आणून सोडतील अशी आशा आहे," संध्या सांगत होत्या. त्यांची बहिण समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
या केंद्रातले पोलिस कर्मचारी इतर केंद्रांशीही संपर्क साधत असल्याचं पांडे यांनी सांगितलं. संध्या यांच्या मुलीबद्दल कोणतीही माहिती मिळाली तर ते लगेचच आम्हाला कळवतील असंही पांडेंनी म्हटलं.
एका केंद्रावरून माहिती आल्यानंतर संध्या आणि त्यांची बहीण तातडीनं तिथे पोहोचल्या. एक पोलिस कर्मचारी राधिकाला कडेवर घेऊन तिथे आला. "तू यांना ओळखलंस का," असं संध्याकडे बोट दाखवून त्यांनी राधिकाला विचारलं. तिनं होकार दिल्यानंतर मुलीला संध्याकडे सोपवलं. पण त्याआधी काही औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. मुलगी सापडल्यानंतर संध्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मात्र फोटोसाठी विचारल्यानंतर त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
('बीबीसी विश्व' हे आमचं बातमीपत्र तुम्ही संध्याकाळी 7 नंतर Jio TV Appवर पाहू शकता. बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. )








