बंगळुरूत महिला पोलिसाला 'मायेचा पान्हा' फुटला म्हणून चिमुकली बचावली

संगीता हलिमानी
    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी बंगळुरूहून

रस्त्यावर सापडलेली एक चिमुकली पोटात काहीही न गेल्यामुळं बंगळुरूच्या सरकारी रूग्णालयात अत्यवस्थ होती. मात्र एका महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मायेच्या पान्ह्यामुळं तिला जीवदान मिळालं.

रुग्णालयात कामाचा भाग म्हणून आलेल्या या महिला कॉन्स्टेबलनं वेळेत स्तनपान दिल्यानं, ती मुलगी वाचली, असं रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

संगीता हलिमानि या बुधवारी उत्तर बेंगळुरूमधील येलाहांका सरकारी रूग्णालयात गेल्या होत्या. रस्त्यावर सापडलेली किती मुलं रूग्णालयात भरती करण्यात आली आहेत, याची माहिती घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. पोलिसांसाठी हे रोजचंच काम. मात्र तो दिवस संगीता यांच्यासाठी वेगळा ठरला.

"मी गेले तेव्हा त्या बाळाला ग्लुकोज ड्रिपवर ठेवण्यात आलं होतं. ते पाहून या मुलीला अंगावर पाजू शकते का, असा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला. कारण माझी स्वतःची मुलगीही 10 महिन्यांची आहे. डॉक्टरांनी मला लगेचच परवानगी दिली," संगीता यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

बाळाच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी

संगीता हलिमानी

सकाळी फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला ही मुलगी कृषी महाविद्यालयाच्या आवारात सापडली होती.

"बाळ धुळीनं माखलं होतं. शरीरावर ठिकठिकाणी मुंग्याही चावल्या होत्या," 25 वर्षीय महिला कॉन्स्टेबलनं सांगितलं.

स्तनपान झाल्यानंतर बाळाला शहरातल्या वाणी विलास या सरकारी रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. बाळाला जंतुसंसर्ग होण्याचा धोका असल्यानं डॉक्टरांनी हा निर्णय घेतला.

"बाळाला हायपोग्लायशेमिया झाला असता. म्हणजेच बाळाच्या रक्तातली साखरेची पातळी अत्यंत कमी झाली असती. बाळ एक दिवसाचंच असावं. किमान दहा-बारा तास तरी त्याच्या पोटात काही गेलं नसावं," येलाहांका रूग्णालयाच्या वैद्यकीय निरीक्षक डॉ. आस्मा तबस्सुम यांनी सांगितलं.

बाळाची तब्येत आता चांगली असल्याचं वाणी विलास रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्रनाथ मेटी यांनी सांगितलं.

स्तनपानामुळं मुलीचा जीव वाचायला निश्चितच मदत झाली, असं मत दोन्ही डॉक्टरांनी व्यक्त केलं. डॉ. तबस्सुम यांनी म्हटलं, "बाळ एक दिवसाचं होतं. या स्तनपानामुळं त्याला दूध कसं ओढून घ्यायचं हे कळलं. त्याची ती संवेदनाही सक्रिय झाली. पुढच्या वेळेस त्याला दूध पाजताना याचा निश्चित उपयोग होईल."

केलेल्या कामाचं समाधान

संगीता यांनी नंतर वाणी विलास रुग्णालयात जाऊनही बाळाच्या तब्येतीची चौकशी केली.

संगीता हलिमानी

"तिची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं. बाळाला रुग्णालयात तसंच सोडून घरी परत येणं मला खूप जड गेलं. घरी येऊन माझ्या बाळाला बघितल्यानंतर माझं मन काहीसं शांत झालं," संगीता यांनी सांगितलं.

संगीता यांनी म्हटलं, की मी चांगलं काम केलं आहे असं माझे पतीही म्हणाले. "मला स्वतःच्या लहान मुलाची काळजी घ्यावी लागत असल्यानं या बाळाला मी दत्तक घेऊ शकत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अर्थात, या बाळाला जीवदान देण्यासाठी संगीता यांनी केलेल्या प्रयत्नांचंही डॉक्टरांनी खूप कौतुक केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)