अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत, पण राजकीय नेते आपलं आजारपण का लपवतात?

अरुण जेटली

फोटो स्रोत, @ARUNJAITLEY

"अरुण जेटली यांची तब्येत ठीक नसल्याचं ऐकून मी खूप उदास झालो आहे. वैचारिक मतभेदांमुळे आमचा त्यांच्याशी दररोज संघर्ष होतो. मात्र, त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी माझ्याकडून आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांना शुभेच्छा. या कठीण काळात आम्ही १०० टक्के तुमच्यासोबत आहोत."

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी हे ट्वीट केल्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या तब्येतीबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मंगळवारी अरुण जेटली उपचारांसाठी अचानकपणे अमेरिकेला निघून गेले. 1 फेब्रुवारीला जेटली अर्थसंकल्प सादर करणार होते. मात्र आता ते अर्थसंकल्प सादर करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

जेटली आठवड्याभरात परत येतील असं पक्षाकडून सांगितलं जात असलं, तरी ते नेमके कोणत्या उपचारांसाठी जात आहेत याबद्दल मौनच बाळगण्यात आलं आहे. कदाचित यामुळेच जेटलींच्या आजाराबद्दल अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

अर्थसंकल्प, त्यापाठोपाठ येणाऱ्या लोकसभा निवडणुका अशा महत्त्वाच्या काळात जेटलींचं आजारपण लोकांसमोर येऊ नये, याची काळजी पक्षाकडून आणि स्वतः जेटलींकडूनही घेतली जात आहे का? ही शंका उपस्थित होत आहे, कारण यापूर्वीही अनेकदा राजकाण्यांकडून आपल्या आजारांबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती.

सर्व ठीक असल्याचा देखावा का?

राजकारण्यांची अशी कोणती निकड असते, की त्यांना कायमच आपण नीट आहोत, कार्यरत आहोत हे दाखवावं लागतं. आपली ठणठणीत प्रतिमाच लोकांसमोर उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न का असतो? हा प्रश्न निर्माण होत आहे.

मनोहर पर्रिकर

फोटो स्रोत, TWITTER

बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, जयललिता यांना नेमकं काय झालं होतं याबाबत अगदी शेवटपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सोनिया गांधीही बऱ्याचदा उपचारांसाठी भारताबाहेर जात असतात आणि मग त्यांच्या आजाराबद्दलही चर्चा सुरू होतात. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आजार लपवणं अशक्य झाल्यावर माध्यमांना थेटपणे माहिती देण्यात आली. मात्र तरीही त्यांना टेकू देऊन, नाकामध्ये नळी घातलेल्या परिस्थितीत कामाला लावून सर्व काही नीट असल्याचं भासवलं जातंय. यामागची हतबलता काय आहे?

राजकीय निकड आणि मनुष्य स्वभावही

बीबीसी मराठीशी यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांनी म्हटलं, "राजकारण हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. त्यामुळे पुढं येऊन स्वतःच्या आजारपणाबद्दल सांगितल्यामुळे कारकिर्दीबद्दल अनिश्चितता निर्माण होण्याची भीती त्यांना वाटत असावी. आपलं महत्त्व कमी होईल ही असुरक्षितताही जाणवत असावी."

"अर्थात, यामागे केवळ राजकारण हे एकमेव कारण नाही असं मला वाटतं. हा मनुष्यस्वभावाचाही भाग आहे. आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर आपणही या गोष्टीची वाच्यता बाहेर करत नाही. यातून लवकरात लवकर बाहेर पडू, बरं होऊ ही सामान्यांना असलेली आशा त्यांनाही असणारच! या भावनेतूनही आजाराबद्दल सांगितलं जात नाही," असंही सुरेखा टाकसाळ यांनी सांगितलं.

कारकिर्दीबद्दल वाटणारी असुरक्षितता

राजकीय कारकिर्दीबद्दल वाटणारी भीती हेच राजकीय नेत्यांनी आपला आजार लपवण्यामागचं प्रमुख कारण असावं, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं. संजीव उन्हाळे यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "विलासराव देशमुखांना आपल्याला कॅन्सर झाल्याचं माहित होतं. मात्र त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. त्यांनीच नाही तर अनेक नेत्यांनी आपले आजार लपवले आहेत. आपली कारकीर्द धोक्यात येईल, समर्थकांमध्ये चलबिचल होईल या कारणामुळे आजारांची वाच्यता केली जात नाही. अलिकडच्या काळात सुषमा स्वराज याला अपवाद ठरल्या. त्यांनी आपल्या आजार आणि उपचाराबद्दल काहीही लपवलं नाही."

शरद पवार

फोटो स्रोत, GETTY IMAGES

संजीव उन्हाळे यांनी म्हटलं, "आपलं आजारपण न लपवता त्यातून मोठ्या हिंमतीनं बाहेर पडलेलं अजून एक नाव म्हणजे शरद पवार. त्यांनी कॅन्सरचं निदान, त्यावरचे उपचार याबद्दल काहीही दडवून ठेवलं नाही. 'डॉक्टरांनी मला तुमच्याकडे सहा महिनेच असतील असं सांगितलं होतं. तेव्हा मी म्हटलं, की असा मी असा सहजासहजी जाणार नाही,' असा किस्साही ते अनेकदा सांगतात. स्वतःला पुन्हा उभं करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा या बळांवरच ते आपल्या आजारातून बाहेर पडले आणि सक्रियही झाले. आजाराच्या भीतीवर मात करायला ती इच्छाशक्तीही प्रबळ लागते."

सामाजिक भावनिकतेचाही विचार हवा

राजकीय नेत्यांनी आपल्या आजारपणाबद्दल न बोलण्यामागे राजकारणासोबतच मानवी स्वभाव आणि भावनिक गुंतागुंत गोष्टींचा विचारही व्हायला पाहिजे, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी मांडली.

बीबीसीशी बोलताना केसरी यांनी म्हटलं, "सक्रिय राजकारणात असताना काही आजार झाला तर पक्ष संघटनेवर, कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आणि आपल्या करिअरवर परिणाम होईल ही भीती असतेच. त्याचबरोबर प्रबळ नेत्याच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता असते. जयललितांच्या आजाराबद्दल गोपनीयता बाळगण्याचं हेही एक कारण होतं."

अमेरिकेत लोकप्रतिनिधींना त्यांच्या आजाराबद्दल माहिती देणं बंधनकारक आहे. पण आपला समाज हा अधिक भावनाप्रधान आहे. कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या भावना नेत्यांशी जोडलेल्या असतात. दक्षिण भारतात नेत्याच्या निधनानंतर लोकांनी आपलं आयुष्य संपविल्याचीही उदाहरणं आहेत. नेत्यांचं आजारपण का लपवलं जातं, या प्रश्नाला हीदेखील एक बाजू आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)