शबरीमला मंदिर प्रवेश : केरळमध्ये बंद, हिंसाचारात एकाचा मृत्यू

शबरीमला मंदिर प्रवेश

फोटो स्रोत, Getty Images

शबरीमला मंदिरात 2 महिलांनी प्रवेश केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

शबरीमला कर्मा समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थकांमध्ये हिंसाचार उसळला. त्यात 54 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

बुधवारी दोन महिलांनी शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर इथं हिंसाचार उसळला होता. शुद्धिकरणाचं कारण देत पुजाऱ्यांनी दोन तास मंदिर बंद ठेवलं होतं. या सर्व प्रकारानंतर वाढलेल्या तणावामुळे केरळमधये बंद पुकारण्यात आला आहे.

शबरीमला कर्मा समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या दगडफेकीत 54 वर्षीय चंद्रन उन्नीथन जखमी झाले होते. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

"याप्रकरणी आम्ही दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अटकेची औपचारिकता पार पाडण्यात येईल. चंद्रन हे कर्मा समितीचे समर्थक होते की नाही, याचीही चौकशी सुरू आहे," अशी माहिती पतनमथिट्टा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख टी. नारायण यांनी दिली आहे.

कर्मा समितीचे कार्यकर्ते आक्रमक

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी केलेल्या प्रवेशानंतर कर्मा समिती या हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निषेध व्यक्त करताना हे कार्यकर्ते हिंसकही झाले. कर्मा समितीच्या अन्य काही कार्यकर्त्यांनाही याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

भाजप समर्थित कर्मा समितीनं गुरुवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद पुकारला आहे. तर काँग्रेस या हिंसाचाराच्या निषेधार्थ 'काळा दिवस' पाळणार आहे.

शबरीमला मंदिर प्रवेशः

फोटो स्रोत, Getty Images

आरोग्य सेवा, दूध, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक सेवा वगळता केरळमध्ये कडेकोट बंद पाळण्यात येत आहे. तामिळनाडू आणि केरळाच्या शेजारील राज्यांनी केरळात जाणारी वाहतूक हिंसाचाराच्या भीतीनं पूर्णपणे बंद ठेवली आहे. कर्मा समितीच्या समर्थकांनी तामीळनाडूमधून येणाऱ्या बसेस राज्याच्या सीमेवरच अडवल्या होत्या.

दरम्यान, महिलांना गाभाऱ्यात जाण्यासाठी मदत केल्यावरून भाजप आणि काँग्रेसने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केली आहे.

त्या महिला भाविक म्हणून मंदिरामध्ये गेल्या होत्या, सरकारी अधिकारी म्हणून नाही. प्रत्येक भाविकाला मंदिरामध्ये प्रार्थना करण्याची सोय उपलब्ध करुन देणं हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं.

'फूट पाडण्याचे राजकारण'

केरळ सरकार न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत असल्याचं विजयन यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. आपलं सरकार न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरवेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

ु

फोटो स्रोत, Getty Images

मात्र न्यायालयाचा आदेश हा हिंदू धारणांवरचं आक्रमण असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला होता.

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना शबरीमलाचा विषयही तापत चालला आहे. हिंदू मतदारांचा अनुनय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माचा वापर करून फूट पाडणारं राजकारण करत आहेत, अशी टीकाही विरोधक करत आहेत.

शबरीमला मंदिरामध्ये 10 ते 50 वर्षें वयोगटाच्या महिलांना प्रवेशाला बंदी आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. अय्यपा हा देव ब्रह्मचारी असल्यानं मासिक पाळी येणाऱ्या महिला मंदिरात जाऊ शकत नाहीत, अशी धारणा आहे.

बिंदु अम्मिनी आणि कनकागिरी या दोन अनुक्रमे 40 आणि 39 वर्षें वयाच्या महिलांनी बुधवारी मंदिरात प्रवेश करण्यात यश मिळवलं.

महिलांच्या मुलभूत अधिकारांचं पालन हे महिलांविरोधात भेदभाव करणाऱ्या परंपरेपेक्षा अधिक महत्त्वाचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं.

या निर्णयानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश करून द्यायला विरोध होत होता. मात्र बुधवारी दोन महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर नवा वाद उफाळून आला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)