न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी : सर्वोदयी कार्यकर्त्यांचे 'बाबा'

फोटो स्रोत, सुदर्शन साखरकर
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं गुरुवारी पहाटे तीन वाजता नागपूरमध्ये निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
नागपूरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.
धर्माधिकारी यांनी दिलेले अनेक निकाल महत्त्वपूर्ण ठरले होते. समाजसेवेमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 ला तत्कालीन मध्य प्रदेशमधील रायपूर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील दादा धर्माधिकारी यांच्याकडून त्यांना गांधीवादी विचारांचा वारसा लाभला. विद्यार्थीदशेत ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
'देशातील गांधीवादी विचारांचा आधार'
देशाच्या समाजजीवनावर दीर्घकाळ प्रभाव पाडणारे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी गांधीवादी विचारांचा आधार होते अशा शब्दांमध्ये माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.बीबीसी मराठीला त्यांनी सांगितले, "प्रत्येक न्यायाधीशाला त्याच्या विचारांची एक पार्श्वभूमी असते आणि ही पार्श्वभूमी तयार होण्यासाठी काही संस्कार त्यावर झालेले असतात. चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांच्यावर प्रथम संस्कार झाले ते त्यांच्या वडिलांचे म्हणजे दादा धर्माधिकारींचे.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी वकिलीला नागपूरमध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांची वकिली उत्तम सुरु होती. तेव्हाच त्यांचा संबंध 1942 च्या लढ्य़ाशी त्यांचा संबंध आला. विद्यार्थी संघटना तयार करणे आणि त्यामार्फत स्वातंत्र्य चळवळीचे काम करणाऱ्या नागपूरमधल्या तरुणामध्ये त्यांचा समावेश होता.

फोटो स्रोत, सुदर्शन साखरकर
वकिली करत असतानाच अनेक कामगार संघटनांचे काम त्यांनी केले. म्हणजे संघटना बांधण्याचाही त्यांचा अनुभव होता. इंटकशी तर त्यांचे जवळचे संबंध होते. पुढे देशातील गांधीवादी संस्थांशी त्यांचा संबंध आला. बजाज फाऊंडेशन, वर्धा, पवनारमधील संस्था, महारोगी सेवामंडळाचे त्यांनी पुष्कळ वर्षे काम केले.
जळगावातील गांधीतीर्थाशी त्यांचा संबंध मार्गदर्शक म्हणून आला. महाराष्ट्राच्या समाजजीवनात चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अजून एका संस्थेला योगदान दिले ते म्हणजे नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठान. या संस्थेचे बरीच वर्षे अध्यक्ष होते.
सुरुवातीया काळात माझा त्यांचा परिचय झाला तो इतर कारणांमुळे. आम्ही एकाच गांधीवादी विचारातले असल्यामुळे अनेक निमित्ताने त्यांचा संबंध येई.
मी मुंबई उच्च न्यायालयात गेल्यावर मला त्यांचे काम पाहता आले. परंतु त्यांच्यासमोर प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली ते औरंगाबादला अभ्यागत न्यायाधीश (व्हीजिटिंग जज) म्हणून येत असत तेव्हा.
आपल्या निर्णयावर किंवा निर्णयशक्तीवर एकांगी विचाराचा परिणाम होऊ नये यासाठी न्यायाधीश प्रयत्न करत असतात. त्यापैकीच धर्माधिकारी होते. माणसाच्या, संघटनेच्या स्वातंत्र्यांची भलावण ते करत असत. औरंगाबादमधून जाणाऱ्या एका मोर्चाला सरकारने प्रतिबंध केल्यावर त्याविरोधात दाद मागण्यात आली.
तेव्हा धर्माधिकारी यांनीच सरकार मोर्चाला प्रतिबंध करू शकत नाही असा निर्णय दिला. निवृत्तीनंतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. गांधीवादी विचारांच्या लोकांसाठी ते आधार होते."
सर्वोदयी कार्यकर्त्यांचे 'बाबा'
चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी सांगितलं, "आयुष्यभर गांधीजींच्या रचनात्मक कार्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी काम केलं. सामाजिक संस्थांना मार्गदर्शन, जातीनिर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामदान अशा कामांमध्ये धर्माधिकारी यांचे विशेष योगदान होतं."

फोटो स्रोत, सुदर्शन साखरकर
"सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्ये ते न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणून कमी आणि 'बाबा' म्हणूनच जास्त ओळखले जायचे. सर्वोदयी चळवळीतूनच माझा आणि त्यांचाही परिचय झाला. आधी त्यांच्या व्याख्यानं आणि लिखाणांमधून मी त्यांना ओळखत होतो. कालांतराने त्यांच्यासोबत काम करण्याचीही संधी मला मिळाली," असं काकडे यांनी म्हटलं.
काकडे यांनी म्हटलं, "विनोबा भावे यांच्या ग्रामदान या संकल्पनेचा, संपत्तीच्या सामूहिकतेचा विचार त्यांनी मांडला. दारुबंदीसाठी त्यांनी काम केलं. मात्र दारुबंदीचा प्रवास हा दारुमुक्तीच्या दिशेनं जाणं आवश्यक आहे ही कायम धर्माधिकारींची भूमिका होती. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे ते अनेक वर्षें मार्गदर्शक होते. केवळ हीच संस्था नाही तर सर्वोदय आश्रम, गांधी स्मारक निधी अशा संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं."
गांधीवादी विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवला
"मुळात वर्ध्यामधील सेवाग्राम आश्रमात अनेक वर्षे महात्मा गांधींचं वास्तव्य असल्यामुळे गांधीवादी विचारसरणी नागपूमध्ये रुजली होती. तेच संस्कार चंद्रशेखर धर्माधिकारींवरही झाले होते. गांधीवादी विचारसरणी नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये चंद्रशेखर धर्माधिकारींचा मोलाचा वाटा होता. आज गांधीवादी, सर्वोदयी विचारसणीचा वारसा जपणारी फार कमी ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वं हयात आहेत. अशा परिस्थितीत चंद्रशेखर धर्माधिकारींचं निधन ही सर्वोदयी चळवळीची हानी आहे," अशी भावना पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








