महात्मा गांधी सनातनी हिंदू आणि दुटप्पी होते, असं आंबेडकरांना का वाटायचं

फोटो स्रोत, Getty Images
लोकशाहीबाबत बाबासाहेब आंबेडकरांच्या एक्सक्लूझिव्ह मुलाखती नंतर बीबीसीच्या अर्काइव्हमधून आम्ही तुमच्यासाठी बाबासाहेबांची आणखी एक एक्सक्लूझिव्ह आणि स्फोटक मुलाखत घेऊन आलो आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 फेब्रुवारी 1955ला बीबीसी रेडिओला दिलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीत महात्मा गांधी यांच्या भूमिकेबाबत परखड मतं व्यक्त केलं होती. ही मुलाखत ऐकण्यासाठी इथं क्लिक करा आणि हीच मुलाखत शब्दरुपात खाली वाचा.

मुलाखतकार: त्यांनी [गांधींनी] दृष्टिकोनामध्ये मूलभूत बदल घडवला, असं तुम्हाला वाटत नाही?
आंबेडकर: अजिबातच नाही. किंबहुना, त्यांनी कायम दुतोंडीपणा केला. त्यांनी दोन नियतकालिकं चालवली : इंग्रजीमधून 'हरीजन', त्याआधी 'यंग इंडिया' आणि गुजरातमध्ये आणखी एक 'दीनबंधू' का अशाच कोणत्यातरी नावाचं पत्र त्यांनी चालवलं होतं. ही दोन वर्तमानपत्रं तुम्ही वाचलीत, तर श्री. गांधी लोकांना कसं फसवत होते, ते तुमच्या लक्षात येईल. इंग्रजी वर्तमानपत्रात त्यांनी जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा विरोधक असल्याचा आणि लोकशाहीवादी असल्याचा पवित्रा घेतला. पण तुम्ही त्यांचं गुजराती नियतकालिक वाचलंत, तर त्यांच्यातील सनातनी माणूस आपल्याला दिसतो. जातिव्यवस्था, वर्णाश्रमधर्म आणि सर्व युगांमध्ये भारताला जखडून ठेवलेल्या सनातनी तत्त्वांचं समर्थन ते या गुजराती पत्रातून करत होते.
खरंतर, 'हरीजन'मधून गांधींनी केलेली विधानं आणि गुजराती वर्तमानपत्रामधून त्यांनी केलेली विधानं, यांचा तुलनात्मक अभ्यास करून कोणीतरी गांधींचं चरित्र लिहायला हवं. त्यांच्या या वर्तमानपत्रीय लेखनाचे सात खंड आहेत. पाश्चात्त्य जगामध्ये केवळ इंग्रजी पेपर वाचला जातो, तिथे आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी गांधींनी इंग्रजी पेपरमधून लोकशाही आदर्शांचं समर्थन करत असल्याची भूमिका घेतली. पण देशी भाषेतील वर्तमानपत्रात ते लोकांशी प्रत्यक्षात काय बोलत होते, तेही आपण बघायला हवं. त्याचा कोणी संदर्भही देताना दिसत नाही. त्यांची सर्व चरित्रं 'हरीजन' आणि 'यंग इंडिया'ला आधारभूत मानून लिहिलेली आहेत, त्यात गांधींच्या गुजराती लेखनाचा संदर्भ घेतलेला नाही.
मुलाखतकार: मग अनुसूचीत जाती आणि रचनांसाठी देवाप्रमाणे वागण्यामागे त्यांचा नक्की कोणता हेतू होता.
आंबेडकर: त्यांना केवळ [अस्पृश्यता निर्मूलन करायचं होतं, पण] हे पाहा, अनुसूचीत जातीबाबत दोन मुद्दे आहेत. एक तर, अस्पृश्यतेचं उच्चाटन करावं, असं आम्हाला वाटतंच. पण त्याचसोबत आम्ही इतर वर्गांच्या पातळीला यावं यासाठी आम्हाला समान संधीही मिळायला हवी, केवळ अस्पृश्यता पुसून टाकल्याने हे होणार नाही. गेली दोन हजार वर्षं आपण अस्पृश्यता टिकवून ठेवली आहे, कोणालाही त्याची काहीच फिकीर वाटत नाही, हे लक्षात घ्या, कोणालाही त्याबद्दल फिकीर वाटलेली नाही. हां, काही अकार्यक्षमता उद्भवतात, त्या अतिशय हानिकारक आहेत- उदाहरणार्थ, लोकांना पाणी घेता येत नाही, लोकांना जमीन पिकवता येत नाही आणि उपजीविका कमवता येत नाही. पण त्याहून महत्त्वाच्याही काही बाबी आहेत- या देशात त्यांना समान दर्जा असायला हवा आणि त्यांनाही उच्च पदं भूषवण्याची संधी मिळायला हवी, जेणेकरून त्यांची प्रतिष्ठा वाढेल, एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक सामरिक स्थानही यातून मिळेल, असं मी म्हणत होतो. तर, गांधींनी त्याला पूर्ण विरोध केला, अगदी पूर्ण विरोध केला.
मुलाखतकार: मंदिरप्रवेशासारख्या गोष्टींवर ते समाधान मानत होते.
आंबेडकर: त्यांचं सगळं काही फक्त मंदिरप्रवेशासाठी चाललं होतं. खरंतर आता कोणालाही त्या हिंदू मंदिरांची फिकीर नाही. मंदिरात जाऊन काहीही उपयोग नाही, या वस्तुस्थितीची अस्पृश्यांना आता जाणीव झालेली आहे. ते मंदिरात गेले किंवा नाही गेले, तरी त्यांना अस्पृश्यांच्याच वसाहतींमध्ये राहावं लागणार आहे.
लोक, म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीच्या काळातले लोक विटाळ होऊ नये म्हणून अस्पृश्यांना रेल्वेतून जायची परवानगी देत नसत. आज त्यांची अशा प्रवासाला हरकत नसते, कारण रेल्वेने अशासाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही. आज ते ट्रेनमधून एकत्र प्रवास करतात, पण याची तुलनात गावातील हिंदू जीवनाशी केली, तर त्यातील भेदाभेद कायम राहिल्याचं दिसतं. एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे हिंदू आणि अस्पृश्य रेल्वेस्थानकावर उतरले की आपापल्या मूळ भूमिकांमध्ये शिरतात, हे लक्षात घ्यायला हवं.
मुलाखतकार: म्हणजे गांधी हे सनातनी हिंदू होते, असं तुम्ही म्हणताय.
आंबेडकर: होय, ते पूर्णतः सनातनी हिंदू होते. ते कधीही सुधारक नव्हते, त्यांच्यात तशी कोणतीही प्रेरक शक्ती नव्हती. अस्पृश्यतेविषयीच्या त्यांच्या सगळ्या गप्पा अस्पृश्यांना काँग्रेसकडे आकर्षून घेण्यापुरत्याच होत्या, हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट अशी की, अस्पृश्यांनी आपल्या स्वराज्याच्या चळवळीला विरोध करू नये, अशी त्यांची इच्छा होती. याहून अधिक काही उन्नतीकारक हेतू त्यांच्या मनात होता, असं मला वाटत नाही.

फोटो स्रोत, Other
मुलाखतकार: गांधींशिवाय राजकीय स्वातंत्र्य मिळालं असतं, असं तुम्हाला वाटतं का?
आंबेडकर: होय, नक्की. मला खात्रीने वाटतं तसं. कदाचित संथ गतीने प्रमाण वाढत गेलं असतं. पण, मला व्यक्तीशः असं वाटतं की, भारतात संथ गतीने स्वराज्य आलं असतं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ झाला असता. अनेक अडथळ्यांनी ग्रासलेल्या प्रत्येक समुदायाला वा प्रत्येक गटाला, ब्रिटिशांकडून सत्तेचं हस्तांतरण सुरू असतानाच्या प्रत्येक टप्प्यात स्वतःचं दृढीकरण करता आलं असतं. आज, सगळ्या गोष्टी पुरासारख्या कोसळल्या आहेत. लोक त्यासाठी तयार नव्हते. लेबर पक्ष हा इंग्लंडमधला सर्वांत मूर्ख पक्ष आहे, असं मला कायम वाटतं.
मुलाखतकार: हा गांधींचा उतावीळपणा म्हणायचा की काँग्रेस पक्षाचा?
आंबेडकर: अॅटली स्वातंत्र्य द्यायला इतके अचानक सहमत कसे झाले, हेच मला कळत नाही. या गुपिताचा खुलासा कदाचित अॅटली त्यांच्या आत्मचरित्रात कधीतरी करतील. म्हणजे त्यांनी हा निर्णय का घेतला, ते स्पष्ट होईल. अचानकपणे हा बदल घडेल, असं कोणालाही अपेक्षित नव्हतं.
कोणालाच कधीच असा अंदाज आला नव्हता. बहुधा, दोन गोष्टींमुळे लेबर पक्षाला हा निर्णय घ्यायला लागला असावा. एक, सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिंद सेना. या देशात काहीही होऊ दे, राजकारणी वर्ग काहीही करू दे, पण लोकांची निष्ठा काही बदलणार नाही, या ठोस विश्वासाने ब्रिटिश या देशावर राज्य करत होत. या एका आधारावर त्यांनी स्वतःचं प्रशासन सुरू ठेवलं होतं. पण ब्रिटिशांनाच उडवून लावण्यासाठी अगदी सैनिकांनाही आकर्षून घेण्यात आलंय, आणि त्यांचं पथक उभारण्यात आलंय, हे कळल्यावर त्यांचा विश्वास पुरता कोलमडला. अशा वेळी भारतावर राज्य करायचं असेल तर केवळ ब्रिटिश सैन्य राखूनच ते करता येईल, हा निष्कर्ष ब्रिटिशांनी काढला असावा, असं मला वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय सैनिकांनी १८५७ साली ईस्ट इंडिया कंपनीविरोधात बंड केलं, तेव्हाचं उदाहरण त्यांच्यासमोर होतंच. परंतु, भारतावरचा ताबा टिकवण्यासाठी इकडे पुरेशी युरोपीय दलं पाठवणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असावं.
दुसरं मला वाटतं, म्हणजे माझ्याकडे काही पुरावा नाहीये, पण मला वाटतं की, ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या नागरी रोजगाराकडे परत जायचं होतं, त्यामुळे सैन्यातून त्यांना तत्काळ सेवामुक्त करावं अशी त्यांची इच्छा होती. सैन्याला टप्प्याटप्प्याने मोकळं केल्यामुळे सेवामुक्त न झालेल्यांच्या मनात किती रोष असेल, ते तुम्ही पाहा. सेवामुक्त झालेले लोक त्यांच्या नोकऱ्यांवर जात असतील आणि आपलं काय होईल, अशा विचारात ते असणार. त्यामुळे भारतावर वचक ठेवण्यासाठी पुरेसं ब्रिटिश सैन्य पाठवण्याचा विचार करणंही त्यांना शक्य नव्हतं.
शिवाय, आणखी एक तिसरी गोष्टही यात असावी, असं मला वाटतं- शेवटी ब्रिटिशांना भारताकडून होणारा लाभ व्यापारी स्वरूपाचा होता, त्यात नागरी सेवकांचा पगार वा सैन्याचं उत्पन्न यांचा काही फारसा हातभार नव्हता. या छोट्या गोष्टी होत्या. व्यापार आणि वित्तीय व्यवहार या अधिक नफादायक बाबी टिकवण्यासाठी इतर गोष्टींचा त्याग करणं त्यांना कधीही श्रेयस्कर होतं. भारत स्वतंत्र झाला किंवा अस्वीकारार्ह वसाहतीच्या स्वरूपात राहिला किंवा त्याहून वेगळं काही खालचं स्थान मिळालं, तरी व्यापार आणि वित्तीय व्यवहार आधीसारखेच चालू राहाणार होते. तर, लेबर पक्षाचं मनोविश्व हे असं चालत होतं, असं मला व्यक्तीशः वाटतं; मला काही हे बोलण्याचा अधिकार आहे असं नव्हे, पण मला माझ्यापुरतं असं वाटतं.
मुलाखतकार: आता थोडं मागे जाऊ- पुणे कराराच्या वेळेला तुम्ही पुढाकार घेतला होता, तेव्हा गांधी तुम्हाला काय म्हणाले आणि तुम्ही गांधींना काय म्हणाला, हे तुम्हाला आठवतंय का?
आंबेडकर: (हलक्याफुलक्या सुरात) हां, ओके ओके, मला माहितेय ते, चांगलंच माहितेय. हे बघा, ब्रिटिश सरकारच्या मूळ निवाड्यात, मॅकडोनाल्ड यांनी दिलेल्या निवाड्यात, त्यांनी माझी सूचना मान्य केली होती. अनुसूचित जाती आणि हिंदू यांच्यात विभक्ततेची भावना निर्माण व्हावी यासाठी इथल्या हिंदूंना सामायिक मतदारसंघ हवा आहे, असं मी सांगितलं. पण सामायिक मतदारसंघ असेल तर आम्ही त्यात बुडून जाऊ, असं आम्हाला वाटत असल्याचं मी स्पष्ट केलं. अशा रचनेत अनुसूचित जातींचे उमेदवार हे स्वतंत्र नसतील, तर हिंदूंचे गुलाम असतील. हे सगळं विषयसूत्र मी रॅम्से मॅकडोनाल्ड यांना थोडक्यात सांगितलं, त्यावर काय करता येईल तेही सांगितलं. आम्हाला वेगळा मतदारसंघ द्यावा आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आमचं वेगळं मत असावं, असंही मी सुचवलं. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या वेळेला वेगळं केलं, असं गांधींना बोलता आलं नसतं. माझा पहिला युक्तिवाद हा असा होता, पाहा. म्हणजे पाच वर्षं आम्ही हिंदूंपासून वेगळं राहावं, त्यात कोणताही सहसंबंध नको, परस्परांशी संदेशन नको, सामाजिक वा अध्यात्मिक असं काहीच नको, असं मी म्हटलं. विभाजनाच्या या चक्रातून सुटण्यासाठी सामायिक मतदारसंघ काय करेल? कित्येक शतकांमध्ये दृढ झालेले हे विभाजनाचे टणक खडक आहेत. दोन लोक एकाच मतदानकेंद्रात मत देत आहेत, म्हणजे त्यांची मनं बदलतील, असं मानणं मूर्खपणाचं आहे. तसलं काहीच नसतं. श्री गांधींमध्ये असा वेडेपणा होता. बरं, ते जाऊ दे. हे पाहा, अशा प्रकारच्या व्यवस्थेत अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार होता, त्यांना टक्केवारीनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळणार होतं, म्हणजे मतं आणि प्रतिनिधित्व यांनुसार त्यांना वजन प्राप्त झालं असतं. त्यामुळे गांधी आणि इतरांना तक्रारीला जागा नव्हती. तर, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी हे मान्य केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
हा निवाडा खरं तर माझ्या सूचनेची दखल घेऊन झाला होता. नेपल्सहून मी त्यांना पत्रं पाठवली होती. त्यांनी हे असं करावं, असं मला वाटत होतं. म्हणजे काही समस्या उद्भवली नसती. त्यांनीही हेच केलं- आम्हाला वेगळा मतदारसंघ दिला आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकारही दिला. परंतु, आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी निवडता येऊ नयेत, असं गांधींना वाटत होतं, त्यामुळे विभक्त मतदारसंघाच्या निवाड्याला त्यांनी विरोध केला आणि उपोषणाला बसले.
मग हे सगळं माझ्यापर्यंत आलं. त्यांना निवाडा नाकारायचा असेल, तर आम्हाला काही आक्षेप नाही, असं ब्रिटिश सरकारचं म्हणणं होतं. पण आम्हीही निवाडा रद्द करू शकतो, आम्हीच मुळात हा निवाडा दिलेला आहे, सर्व गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत, आणि हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असं आम्हाला वाटतं. तुम्ही रॅम्से मॅकडोनाल्ड यांचं पत्र वाचायला हवं. आम्ही विभाजनाला गंभीर रूप देण्यासाठी काहीही केलं नव्हतं, उलट आम्ही तोडगा काढायचा प्रयत्न करत होतो, दोन घटकांना सामायिक मतदारवर्गामध्ये एकत्र आणायचा प्रयत्न करत होतो, हे त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. पण आम्हाला स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळायला नको, हा गांधींचा आक्षेपाचा मुद्दा होता, त्यामुळे आम्हाला मुळात प्रतिनिधित्व द्यायला नको, यावर त्यांनी भर दिला. याचसाठी त्यांचा गोलमेज परिषदांमध्ये समावेश झाला. हिंदू, मुस्लीम आणि शिख या तीनच समुदायांना आपण ओळखतो, असं ते म्हणाले, पाहा तुम्ही. या तीन समुदायांना राज्यघटनेमध्ये राजकीय प्रतिनिधित्व असेल. पण ख्रिस्ती, अँग्लो-इंडियन, अनुसूचीत जाती यांना राज्यघटनेत स्थान नसेल. त्यांनी सार्वत्रिक समुदायात सामावून जावं, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण त्यांचं वागणं किती मूर्खपणाचं आहे, हे त्यांचे सगळे मित्र त्यांना सांगत होते. या विषयावर त्यांचे मित्र त्यांच्याशी भांडलेही.

फोटो स्रोत, Other
हजारो पटींनी अधिक सामर्थ्य आणि राजकीय आणि आर्थिक ताकद असलेल्या शिखांना आणि मुसलमानांना विशेष प्रतिनिधित्व द्यायला गांधी तयार होते. मग अनुसूचीत जाती आणि ख्रिस्ती लोकांना असं प्रतिनिधित्व का नाकारायचं? तुम्हाला ही समस्या कळत नाहीये, एवढंच गांधींचं यावरचं उत्तर होतं. ते सतत एवढंच बोलत राहिले. त्यांची अगदी घनिष्ठ मैत्रीण अलेक्सांड्रियाही त्यांच्याशी या मुद्द्यावरून भांडली, असं त्यांनीच मला सांगितलं. त्यांची एक अनुयायी होती- तिचं नाव आठवत नाही- फ्रेंच महिला होती, पाहा. तिचंही त्यांच्याशी मोठं भांडण झालं. आम्हाला त्यांची वृत्तीच कळत नाहीये, असं ती म्हणाली. एकतर तुम्ही कोणालाच काहीच देणार नाही, असं म्हणा, मग सामायिक पट असू दे, ते आम्ही समजू शकतो, तसं करणं लोकशाहीला धरून असेल. पण, मुसलमानांना देऊ, शिखांना देऊ, पण अनुसूचीत जातींना देणार नाही, हे म्हणणं विसंगत आहे.
यावर गांधींकडे उत्तर नव्हतं, ते उत्तर देऊच शकले नाहीत. आम्ही ही पद्धत सुचवली. त्यांनी सुरुवातीला, म्हणजे पत्र लिहिलं तेव्हा असं काहीच केलं नव्हतं. अनुसूचीत जातींना काहीही मिळणार नाही, प्रतिनिधित्व मिळणार नाही, असं त्यांनी रॅम्से मॅकडोनाल्ड यांना सांगितलं. मग गांधींचेच मित्र त्यांना म्हणाले, हे फारच होतंय, या मुद्द्यावर तुम्हाला कोणी समर्थन देणार नाही, असंही त्यांनी गांधींना सांगितलं. मग मालवीय आणि इतर नेते माझ्याकडे आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करणार नाही का, असं विचारलं. ब्रिटिश पंतप्रधानांकडून जे काही मिळालं आहे ते सोडून देऊन ही समस्या सोडवण्याची माझी इच्छा नाही, असं मी सांगितलं.
मुलाखतकार: मग तुम्ही पुढे गेलात.
आंबेडकर: (हलक्याफुलक्या सुरात) मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, मी पर्यायी सूत्र सुचवलं होतं. मी विभक्त मतदारसंघ सोडायला तयार नाही, पण काही सुधारणा करायला मी तयार आहे, असं मी मांडलं होतं. अंतिम निवडणुकीला अनुसूचीत जातींच्या वतीने उभे राहणारे उमेदवार पहिल्यांदा अनुसूचीत जातींमधून निवडून आलेले असायला हवेत, असं ते सूत्र होतं. त्यासाठी प्राथमिक निवडणूक व्हावी, मग त्यांनी चार लोकांना निवडावं, आणि ते चार लोक सार्वत्रिक निवडणुकीला उभे राहतील. मग सर्वोत्तम उमेदवार निवडून येऊ दे. तर, आम्ही काही आश्वासनं दिली आणि तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका, असं सुचवलं. असं झालं तर आम्हाला संसदेत आमचं मत व्यक्त करणारे काही लोक मिळतील. हे गांधींना मान्य करावं लागलं, त्यांनी मान्य केलं. आम्हाला याचा केवळ एकाच निवडणुकीत लाभ झाला - १९३७च्या मतदांनापुरतंच हे सूत्र अंमलात आलं. त्या वेळी फेडरेशनला निवडणुकीत मोठा विजय मिळाला. गांधींना त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता.
मुलाखतकार: मग, शेवटी त्यांनी स्वतःच्या बाजूने तीव्र वाटाघाटी केल्या का.
आंबेडकर: हो, अर्थातच त्यांनी वाटाघाटी केल्या. मी काहीच तडजोड करायला नकार दिला. तुम्ही जास्त कठोर भूमिका घेणार नसाल, तर मी तुमचा जीव वाचवायला तयार आहे. माझ्या लोकांच्या जगण्याची किंमत मोजून मी तुमचं जीवन वाचवायला तयार नाही. मी या सगळ्यासाठी कष्ट केले होते, मला यातली माहितीही होती. तर, त्यांच्या लहरीपणापायी या सगळ्याचा त्याग करायला माझी तयारी नव्हती. केवळ त्यांच्या समाधानासाठी आपल्या लोकांच्या हिताचा बळी देणं, मला मान्य नव्हतं. ही केवळ त्यांची लहर होती, पाहा. एक दिवसीय सार्वत्रिक निवडणुकीतून यात काहीच बदल होणार नाही.

फोटो स्रोत, Other
मुलाखतकार: मग ते यावर काय म्हणाले?
आंबेडकर: ओह्, ते काहीच बोलू शकले नाहीत. शिख आणि मुस्लिमांप्रमाणे अनुसूचीत जातींनाही स्वतंत्र संस्था मागितल्या जातील, अशी भीती त्यांना वाटत होती. तसं झालं तर या तीन घटकांच्या संयुक्त आघाडीशी लढण्यासाठी हिंदू एकटे पडतील, असं त्यांना वाटत होतं. हे त्यांच्या मनात दडलेलं होतं, हिंदूंना कोणत्याही मित्राविना सोडायला त्यांची तयारी नव्हती.
मुलाखतकार: म्हणजे त्यांनी क्वचितच..., त्यांनी कायम राजकारणी म्हणूनच कृती केली.
आंबेडकर: होय, राजकारणी म्हणूनच. ते कधीच महात्मा नव्हते. मी त्यांना महात्मा म्हणत नाही. हे पाहा, मी आयुष्यात कधीही त्यांना महात्मा असं संबोधलं नाही. ते या उपाधीला पात्र नाहीत, म्हणजे अगदी त्यांच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलंत, तरीही नाही.
'गांधींची भूमिका समन्वयाची'
ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या मते महात्मा गांधींची भूमिका दुटप्पी नाही तर समन्वयाची होती. बीबीसी मराठीशी या विषयावर बोलताना ते म्हाणले,
"गांधीजींचं इंग्रजीतलं लेखन आणि गुजरातीतलं लेखन यात खूप तफावत आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की गांधीजींनी अफ्रिकेतून येतानाच जो कार्यक्रम त्यांच्याबरोबर आणला होता तो अस्पृष्यता निवारणाचा होता. गाधीजींना परंपरावादी समाजाला बरोबर घेऊन अस्पृष्यतेच्या विरोधात वातावरण तयार करायचं होतं. म्हणून गांधीजी गुजरातीमध्ये लिहिताना या पंरपारवाद्यांचा अनुनय करत होते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









