EXCLUSIVE : 'भारतासाठी लोकशाही योग्य नाही' - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. भारतात समाजवादी लोकशाही हवी या विचारातून घटना समिती स्थापन झाली. घटनेच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद आंबेडकरांनी भूषवलं.
आणि पुढे घटना लागू झाल्यानंतर 1951मध्ये भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकाही पार पडल्या. तेव्हापासून देशात लोकशाहीबद्दल अनेक मतं व्यक्त होत आहेत.
बीबीसीला 1953मध्ये दिलेल्या एका एक्सक्लुझिव मुलाखतीत खुद्द डॉ. आंबेडकरांनीही लोकशाहीबद्दल वेगळं मत व्यक्त केलं होतं. भारतासाठी लोकशाही योग्य नाही, असं ते त्यात म्हणाले.
अर्थात त्यामागे काही कारणं आहेत. काय होती ती कारणे, काय म्हणाले होते डॉ. आंबेडकर... त्यांचं भारतीय लोकशाहीवरचं विश्लेषण वाचूया.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - भारतात लोकशाही चालेल असं तुम्हाला वाटतं का?
डॉ. आंबेडकर - नाही. इथं लोकशाही फक्त नावापुरती असेल.
प्रश्न - तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
डॉ. आंबेडकर - म्हणजे लोकशाहीशी संबंधित गोष्टी सुरू राहतील. निवडणुका होतील, पंतप्रधान ठरेल, या गोष्टी सुरूच राहतील.
प्रश्न - पण, लोकशाहीसाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत...
डॉ. आंबेडकर - असं नाही. जर त्यातून चांगला नेता निर्माण झाला तरच निवडणुका महत्त्वाच्या.

प्रश्न - निवडणुकांमुळे मतदारांना नेता बदलाचे हक्कही मिळतात...
डॉ. आंबेडकर - हो. खरं आहे. पण हे त्यांच्यासाठी ज्यांना आपलं मत सरकार बदलू शकतं हे माहीत आहेत. भारतात ही समज कुणाला नाही. आमची निवडणूक प्रक्रिया नेता निवडून देण्याइतकी सक्षम नाही. उदाहरण सांगायचं तर, मागच्या निवडणुकीत काँग्रेसनं लोकांना सांगितलं, बैलाला मत द्या. हा बैल कुणाचं प्रतिनिधित्व करतो याचा विचारच कुणी केला नाही. कुणी गाढव असेल जो बैलाचं प्रतिनिधित्व करत असेल. किंवा कुणी खरंच शिकलेली व्यक्ती असेल. पण, लोकांनी फक्त बैलाला मत दिलं.
प्रश्न - तुम्ही म्हणता तशी भारतात लोकशाही चालली नाही. तर दुसरा कुठला पर्याय तुम्हाला दिसतो?
डॉ. आंबेडकर - मला निश्चित सांगता येणार नाही. पण, साम्यवादाचा एखादा प्रकार इथं योग्य ठरू शकेल.
प्रश्न - साम्यवाद चालेल असं तुम्हाला का वाटतं? लोकांचं जीवनमान त्यामुळे सुधारेल का?
डॉ. आंबेडकर - हो. मला तरी तसंच वाटतं. या देशात निवडणुकांशी कुणाला देणंघेणं आहे? लोकांना खायला अन्न पाहिजे. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत.
अमेरिके सारख्या देशात लोकशाही ठीक आहे. मी नुकताच तिथं जाऊन आलो आहे. तिथे भविष्यात कधी साम्यवाद येईल असं वाटत नाही. कारण अमेरिकन माणसाचं सरासरी उत्पन्न भारतीयापेक्षा खूप जास्त आहे.
प्रश्न - भारतातली लोकशाही कोसळेल असं वाटतं का?
डॉ. आंबेडकर - हो. ती कोसळेल.
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










