राज ठाकरे उत्तर भारतीयांना म्हणाले, 'नातेवाईकांना सांगा, भाईसाब अब मत आना'

फोटो स्रोत, Getty Images
तुमच्या राज्यात विकास का झाला नाही, हा प्रश्न तुमच्या राजकारण्यांना विचारा. इतर राज्यांत अपमानित होताना तुमचं रक्त का उसळत नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमात केला.
उत्तर भारतीयांच्या समोर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलत असल्याने ते काय बोलतील याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी त्यांचं भाषण हिंदीत केलं.
"मी कोणताही खुलासा करण्यासाठी आलेलो नाही तर माझी भूमिका मांडण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणाले. जिथं जाल त्या राज्याचा मान राखला पाहिजे, असं ते म्हणाले. महाराष्ट्रात नोकऱ्या असतील त्या प्राधान्याने महाराष्ट्रातील लोकांना मिळाल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. तुमच्या राज्यात विकास का झाला नाही, हा प्रश्न तुमच्या राजकारण्यांना का विचारत नाही, इतर राज्यांत जाऊन तुम्हाला अपमानित व्हावं लागतं यावर तुमचं रक्त का उसळत नाही?" असा सवालही त्यांनी केला.
"एक दिवस मी घरी बसलो होतो तर संदीप देशपांडेनी सांगितलं विनय दुबेंना भेटायचं आहे. त्यांना काही आमंत्रण द्यायचं आहे. लोकांच्या मनातले गैरसमज आहेत ते दूर करावेत अशी विनंती केली," असं ते म्हणाले.
"जास्तीत जास्त लोकांना समजावं म्हणून प्रथमच हिंदीत भाषण करत आहे. वडिलांमुळे आणि चित्रपटामुळे हिंदी सुधारलं," असं ते म्हणाले.

"देशाचा कायदा समजून घेतला पाहिजे. देशातील कोणत्याही राज्यात जाण्याची मुभा आहे. पण हा कायदा समजून घेतला पाहिजे. दुसऱ्या राज्यात गेलो तर आधी पोलिसांत नोंद करावी लागेत. कुठं काम करणार हेही सांगावं लागतं," असं ते म्हणाले. मी कोणाताही खुलासा देण्यासाठी आलेलो नाही, मी फक्त माझी भूमिका सांगण्यासाठी आलो आहे," असं ते म्हणाले.
"मी काही वेगळं सांगत नाही, महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध असतील तर महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना पहिली संधी मिळाली पाहिजे यात काय चुकीचं आहे, बिहारमध्येही उद्योग सुरू झालं तर तिथंही बिहारींना रोजगार मिळालं पाहिजे, असं ते म्हणाले. माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा दाखला त्यांनी दिला. ते म्हणाले राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, 'स्थानिक लोकांना त्यांच्या भागातच काम मिळायला हवं.' स्थानिक लोकांचे रोजगार हिसकावले जाऊ नये,असं दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींना वाटत होतं. तर मी काय वेगळं सांगत आहे," असं ते म्हणाले. पूर्वी मुंबईत दक्षिणेतून लोक यायचे, पण तिथंच रोजगार मिळाल्याने दक्षिणेतील लोंढे यायचे थांबले, असा दाखला त्यांनी दिला.
"70-80 टक्के पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातील मतदार संघातून निवडून आले आहेत. जवाहर लाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातूनच निवडून जाऊन पंतप्रधान झाले. विचारा पंतप्रधान होण्यासाठी आमचा प्रदेश चालतो तर उद्योगांसाठी का नाही, हा प्रश्न त्यांना विचारा," असं ते म्हणाले.

"महाराष्ट्राचे चित्र दिल्लीत बसलेल्या मीडियाने बिघडवलं आहे. गोव्यातील एका मंत्र्याने बिहारवरून येणाऱ्या रेल्वेला भिकाऱ्यांची रेल्वे नको असं म्हटलं होतं. आसाममध्ये बिहाऱ्यांना मारलं होतं. इतकंच काय तर गुजरातमध्येही उत्तर भारतीयांना हुसकून लावण्यात आलं होतं, ही बातमी किती दिवस आली," असा सवाल त्यांनी केला. फेरीवाल्यांच्या नेत्यांनी वापरलेल्या भाषेमुळे संघर्ष झाला, असं ते म्हणाले.
"मनसेचं पहिल्यांदा आंदोलन रेल्वे भरतीला आलेल्या मुलांविरोधात झालं. राज्यात नोकऱ्या होत्या पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेश-बिहारमध्ये देण्यात आली होती," असं ते म्हणाले.
आमच्या आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेत नोकरीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आणि त्या-त्या राज्यांच्या भाषांत परीक्षा घेण्याचे आदेश दिले. मी हेच सांगत होतो," असं ते म्हणाले.

"उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि बांग्लादेश बॉर्डर वर सर्वाधिक तपास चालू आहे, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात सुसंस्कृत भूमी तयार झाली, म्हणून इथं उद्योग धंदे आले आणि स्थिरावले, उत्तर भारतात सुसंस्कृत लोक नाहीत असं नाही, पण तिथं उद्योगांसाठी भूमी का निर्माण झाली नाही, याचं आत्मपरीक्षण करावं, असंही ते म्हणाले. लोक शिक्षणासाठी, नोकरीसाठी येतात ते चालेल पण गुन्हेगारांना खपवून घेतलं जाणार नाही,". रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाला बाहेरून लोक आले होते, त्या आंदोलनात महिलांची छेड काढली, पोलीस व्हॅन जाळली," असं ते म्हणाले.
"इथं इतकी गर्दी झाली आहे की तुम्ही लोकांना सांगा 'भाईसाब मत आना' असं ते म्हणाले. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथं काम नाही, रोजगार नाही. तिथल्या उद्योगांत स्थानिकांना काम नाही मिळालं तर संघर्ष होणार, हा साधा मुद्दा आहे," असं ते म्हणाले.
उत्तर भारतीय महापंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला काशी येथून पुरोहितांना बोलवण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम झाला. राज ठाकरे यांच्या आगमनाबद्दल उपस्थितांता मोठी उत्सुकता असून अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. श्रीकांत मिश्रा यांनी पाच नद्यांचे पाण्याचे कलश देऊन स्वागत केले. उत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा आणि तलवार भेट देण्यात आली. महापंचायतच्या महिला शाखेच्या सारिका मिश्रा यांनी त्यांचं स्वागत केलं.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
कांदिवली येथील भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. पहिल्या मजल्यावर राज ठाकरे हा कार्यक्रम झाला. दुसऱ्या मजल्यावर एलईडी स्क्रीनवरून राज यांचं भाषण दाखवण्यात नियोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.
व्यासपीठावर फक्त राज ठाकरे यांच्याच बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. कार्यक्रमस्थळी येणाऱ्यांची काटेकोर नोंद ठेवली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








