#BeyondFakeNews : विश्वासार्ह माहितीची लोकांना गरज - टोनी हॉल

बीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' (#BeyondFakeNews) या उपक्रमाला सुरुवात झाली. भारतातल्या नवी दिल्ली, पुणे, अमृतसर, हैद्राबाद, लखनौ, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये आज दिवसभर वेगवेगळ्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं.
बीबीसीनं भारतात केलेल्या सखोल संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष तसंच फेकन्यूजला आळा कसा घालता येईल, त्यावर काय उपाय आहेत यावर आजच्या परिषदेत चर्चा झाली. सोशल मीडियाचे प्रतिनिधी, समाजसेवेत कार्यरत असेलेली मंडळी, विद्यार्थी, अभ्यासक आणि राजकीय नेते यांनी सोमवारी दिवसभर मंथन झालं.
भारतात फेक न्यूज कशा पसरतात आणि कुठल्या मुद्द्यांवर ते सर्वाधिक अवलंबून आहे याबाबतचा बीबीसीनं केलेला सखोल रिसर्च मराठीमध्ये वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
या रिसर्चसंदर्भातील संपूर्ण माहिती आणि तपशिलवार विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी लोकांना विश्वासार्ह माहिती मिळणं आवश्यक आहे, असं मत व्यक्त केलं.
अहमदाबाद इथं 'बियाँड फेक न्यूज'मध्ये बोलतान गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी गुजरातमध्ये फेक न्यूजविरोधात कायदा करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. तर चेन्नईमध्ये 'बियाँड फेक न्यूज'मध्ये बोलताना भाजप नेते नारायण तिरुपती यांनी फेक न्यूज पसरवण्यात माध्यम प्रतिनिधींचाही भूमिका असते, असं मत व्यक्त केलं.

सायंकाळ 4.20 :फेसबुकवर फक्त काँग्रेस, भाजप हीच भाषा - विश्वंभर चौधरी
फेसबुकवर फक्त भाजप आणि काँग्रेस या दोनच भाषांमध्ये बोललं जात आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी दिली. #BeyondFakeNewsच्या पुण्यातील उपक्रमात ते बोलत होते. चौधरी म्हणाले, "जे नियम माध्यमांना लागू आहेत. तेच नियम सोशल मीडियावर फॉर्वड होणाऱ्या संदेशांना लागू असले पाहिजेत." निवडणूक जाहीरनाम्यात जी अभिवचनं दिलं जातात, त्यांना ग्राहक कायद्याच्या परिघात आणलं पाहिजे, असं ते म्हणाले

या चर्चेत चौधरी आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाग घेतला. तांबे यांनी काँग्रेस सकारात्मक बातम्यांचा प्रसार करत असा दावा केला.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
काँग्रेसची चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी जी माहिती प्रसारित केली जाते त्यात 10 टक्के फेकन्यूज असतात, पण त्यातीतील एकही माहिती काँग्रेसच्या अधिकृत पेजवर नसते,असं ते म्हणाले. ट्रोलिंगला ट्रोलिंगने उत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

दुपारी 3.30 ट्रोलिंग मोठी समस्या - अर्जुन सिद्धार्थ
ट्रोलिंगही मोठी समस्या आहे. तुम्ही तुमचं मत जरी व्यक्त केलं तर लोक तुम्हाला ट्रोल करतात. काँग्रेस समर्थकांच्या तुलनेत भाजप समर्थकांची भाषा अधिक शिवराळ भाषा वापरतात असं दिसून आलं आहे. गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार उर्विश कोठारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल्सना का फॉल करतात, असा प्रश्न विचारला होता. त्यांना उत्तर देताना भाजपचे गुजरातच्या आयटी सेलचे प्रमुख पंकज शुक्ला यांनी हा प्रश्न भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलला विचारावा, असं उत्तर दिलं होतं. - अर्जुन सिद्धार्थ, Alt News

दुपारी 3.15 बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल विद्यार्थ्यांशी संवाद
नागरिक म्हणून विश्वास ठेवता येईल, अशा माहितीची आपल्याला गरज आहे. चांगली पत्रकारिता, माहिती महत्त्वाची आहे. सध्याच्या गोंधळाच्या स्थितीत लोकांना अशी माहिती कुठं मिळलं हे लोकांना माहिती करायचं असतं. नक्की काय सुरू आहे, हे सांगणारा लहानसा आवाज कुठं ऐकता येईल, हे नारिकांना शोधायचं असतं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
विश्वासार्ह माहितीशिवाय भविष्याबद्दल आपण चांगले निर्णय घेऊ शकत नाही. ध्रुवीकरण झालेल्या आणि संतप्त जागतिक वातावरणात हे जास्त महत्त्वाचं आहे. - टोनी हॉल, डायरेक्टर जनरल, बीबीसी.

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी गुजरातमध्ये कायद्याचा विचार : नितीन पटेल, उपमुख्यमंत्री, गुजरात

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी गुजरात सरकार कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं आहे. त्यामाध्यमातून दिशाभूल करणाऱ्या, लोकांना चेतवणाऱ्या किंवा लोकांच्या उद्योगाचं आणि व्यापाराचं नुकसान करणाऱ्या बातम्यांना अळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच यामागे असलेल्या लोकांविरोधात कठोक कारवाई कशी करता येईल हे सुद्धा पाहिलं जाईल असं त्यांनी अहमदाबादमधल्या परिषदेत सांगितलं आहे.

दुपारी 2 : गुगल न्यूज इनिशिएटिव्ह वर्कशॉप
पुण्यातील परिषदेत सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे प्रा. सुशोभन पाटणकर यांनी पुणे फेक न्यूज कशी ओळखावी आणि त्यासाठी वाचक तसंच प्रेक्षकांना सक्षम करण्यासाठीची काही कारता येईल याची माहिती दिली.

दुपारी 2. 40 : फेक न्यूज पसरवण्यात माध्यमांचीही भूमिका : नारायण तिरुपती, भाजप नेते
फेक न्यूज, राजकारणाच्या माध्यमातूनच पसरतात. यामुळेच सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तणाव वाढून तेढ निर्माण होते. बीफ बॅनमागचा उद्देश सोयीस्कररीत्या लपवण्यात आला आणि हा संपूर्ण विषय चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. चुकीची माहिती पसरवण्यात काही माध्यम प्रतिनिधींचीही भूमिका होती. नोटबंदी घोषणेवेळी, मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती शेअर करण्यात आली. यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये भरतील, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आले. - नारायण तिरुपती, भाजप नेते

दुपारी 2.15 : समाजात तेढ वाढवण्यासाठी फेक न्यूजचा प्रसार - खुशबू

बहुतांशवेळा फेक न्यूजचा प्रसार धार्मिक तसेच जातीय पातळ्यांवरून जाणीवपूर्वक केला जातो. लिन्चिंग असेल किंवा बीफ खाण्याचा मुद्दा- समाजातली तेढ वाढेल अशा पद्धतीनेच फेक न्यूजचा प्रसार केला जातो. त्यांच्या मजकुराच्या वैधतेबाबत किंवा त्यांच्या हेतूबाबत कोणी प्रश्न विचारणार नाही याची खात्री असल्याने फेक न्यूज
कर्त्यांचं फावतं. माझ्याबाबतही अनेक फेक न्यूज पसरवण्यात आल्या आहेत. - खुशबू, राष्ट्रीय प्रवक्त्या, काँग्रेस

माध्यमांकडून देशाच्या लोकशाहीचं खच्चीकरण - रवीश कुमार

कोणाला प्रश्न विचारू नये हे सध्याचा मीडिया आपल्याला शिकवत आहे. कोणतीही बातमी नसणं हीसुद्धा फेक न्यूज आहे. जेव्हा तुम्ही वास्तवातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता आणि जे गरजेचं नाही तेच तुम्हाला दाखवलं जातं हीसुद्धा एक प्रकारे फेक न्यूजच आहे. हिंदी वृत्तपत्रं काळजीपूर्वक वाचा. अनेक गुणी पत्रकारांचे हात बांधले गेले असल्याची जाणीव तुम्हाला होईल. अशा पत्रकारांना कामात स्वातंत्र्य मिळालं तर ते व्यवस्थेला, सरकारला, राजकारण्यांना प्रश्न विचारतील. आपण कष्टाने उभ्या केलेल्या लोकशाहीचं, आपल्या वृत्तवाहिन्या आणि एकूणच मीडिया अध:पतन करत आहेत. गेल्या चार वर्षांत हे मी अनुभवलं आहे. याआधीही लोकशाहीचं खच्चीकरण आपण अनुभवलं आहे. मी हे पूर्ण जबाबदारीने बोलतो आहे. तुम्ही वाचता त्या वर्तमानपत्रांचे संपादक, तुम्ही ज्यांच्या बातम्या वाचता ते पत्रकार तसंच माध्यमसमूहांचे मालक हे असे सगळे घटक एकत्र मिळून लोकशाहीचा विनाश करत आहेत. सजग नागरिक म्हणून तुम्ही वेळीच जागृत होऊन या खोट्या गोष्टींविरोधात संघर्ष केला नाहीत तर तुमचं भवितव्य कोण बदलवणार? वृत्तवाहिन्यांचं काय चाललं आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. हिंदू-मुस्लिम राजकारणाला ते खतपाणी घालतात. या अशा भारताचं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं का? : रवीश कुमार, ज्येष्ठ पत्रकार

दुपारी 1.25 - 'हा केवळ पूर्वग्रह नाही तर अजेंडा आहे'

फेक न्यूज संघटित पद्धतीने पसरवल्या जातात. त्यांना भक्कम असं पाठबळ असतं तसंच विशिष्ट असा अजेंडाही असतो. काही वर्षांपूवीच्या आणि आताच्या परिस्थितीत हा मोठा फरक पडला आहे. हा केवळ पूर्वग्रह नाही तर अजेंडा आहे. जबाबदारी किंवा बांधिलकीविना असलेला पूर्वग्रह आहे - स्वरा भास्कर

दुपारी 1 - मला फरक पडत नाही असं म्हणणं सोपं आहे - स्वरा भास्कर

मला फरक पडत नाही असं म्हणणं सोपं आहे, पण व्हिज्युअल मीडियम असं आहे की प्रत्येकाला फरक पडतो. मीम्समधून तुमचा चेहरा सहज ओळखू येतो. धमकी देणारा, घाबरवणारा व्यक्ती त्याची ओळख उघड करत नाही मात्र तरी लोकांना भीती वाटू शकते, असं मत प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी व्यक्त केलं आहे.

दुपारी 12.40 - 'वैयक्तिक माहिती ही स्वत:ची खाजगी मालमत्ता'
सोशल मीडियावर आपण खाजगी आयुष्याबद्दल मुक्तपणे माहिती देतो, शेअर करतो आणि त्यानंतर माहितीच्या गोपनीयतेविषयी तक्रारी करतो. वैयक्तिक माहिती ही स्वत:ची खाजगी मालमत्ता आहे. कृपया त्याची काळजी घ्या- सोनाली पाटणकर


दुपारी 12.40 - 'फेक न्यूजबाबत कायदेशीर पोकळी जाणवते'
रशियाकडून डेटा अर्थात माहितीमध्ये कशी फेरफार केली जात आहे हे आपल्याला समजलं आहे. फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणं कठीण का हे ब्रिजेश सिंग यांनी समजावून दिलं. कायदेशीरदृष्ट्या पोकळी जाणवते. भारतीय दंड संहितेमधील कलमं कमकुवत आहेत, असंही मत ब्रिजेश सिंग व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात पोलीस स्वतंत्रपणे काम पाहतात. मला कारकीर्दीत कधीही राजकीय दबाब सहन करावा लागला नाही. सोशल मीडिया कंपन्या दहशतवाद्यांना आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करू देतात. ते त्यांच्याविरोधात कारवाई का करत नाहीत. जाहिरातींच्या माध्यमातून ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती मिळवू शकतात, मग फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर या कंपन्या कारवाई का करू शकत नाहीत?-ब्रिजेश सिंग

दुपारी 12.10 - पुण्यातील दुसरे चर्चासत्र सुरू

सहभागी
- ब्रिजेश सिंग, आयपीएस, आयजी- सायबर अँड सेक्युरिटी आणि डीजी- माहिती आणि प्रसारण महासंचालनालय
- सोनाली पाटणकर, अध्यक्ष, रिस्पॉन्सिबल नेटिझन
- शहाजी शिंदे, संस्थापक, नवनिर्मिती संस्था, धुळे
- अभिजीत कांबळे, प्रतिनिधी, बीबीसी न्यूज मराठी
- समन्वयक : सम्राट फडणीस, संपादक, दैनिक सकाळ

दुपारी 12 - फेक न्यूज आणि सत्य यातला फरक शोधणं अवघड
अनेकदा फेक न्यूज आणि सत्य यातला फरक शोधणं अवघड असतं. सुशिक्षित माणसांनाही दोन्हीतला भेद उमगत नाही. खरं काय हे शोधताना लोकांचा गोंधळ होतो, असं वक्तव्य पर्यावरण कार्यकर्ते कालिदोस यांनी केलं आहे. ते चेन्नई येथील कार्यक्रमात बोलत होते.

सकाळी 11.51 - हे सगळं संघटित पद्धतीने होतं आहे - प्रकाश राज, अभिनेते
फेक न्यूजची संकल्पना सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. प्राचीन काळापासून फेक न्यूज आहेच. मात्र आता हे सगळं सुसंघटित पद्धतीने होतं आहे, त्यामुळे समाजातल्या बहुतांशांना त्याचा त्रास होतो असं चेन्नईतल्या कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज यांनी सांगितलं.

"काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज शेअर केला. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं निधन झालं असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. मी कलाम यांना ओळखत असल्याने त्या मेसेजची वैधता मी तपासून पाहू शकत होतो. कलाम यांचा मृत्यू झाला नसल्याचं मला समजलं. याबाबत मी पत्नीला विचारलं तर ती म्हणाली, जेव्हा एखादी माहिती आपल्यासमोर येते तेव्हा ते आपण शेअर करणं साहजिक असतं. त्यात चुकीचं काय? त्यावेळी मी तिला म्हणालो, एखादी बातमी किंवा मजकूर त्यातील तथ्यांशांची वैधता न तपासता शेअर करत असू तर त्याचा समाजाला त्रास होऊ शकतो."
"काही वेळेला ट्वीटरवर मला तीनशे मेसेज येतात. माझं ट्वीटर हँडल एका टीमतर्फे सांभाळण्यात येतं. पण हे सगळ्यांना शक्य नाही. थोडाही मागचापुढचा विचार न करता फेक न्यूज पाठवण्याचा ट्रेंड बोकाळला आहे."

सकाळी - 11.30 - 'फेकन्यूज रोखण्यासाठी मोठ्या पैशांची गरज'
फेक न्यूजचं आव्हान रोखण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आम्हाला खूप मोठ्या पैशांची गरज आहे, असं काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी नवी दिल्ली येथे बोलताना सांगितलं. काँग्रेस आपल्या सर्वोच्च नेत्याला पाठिंबा का देत नाही असा सवाल प्रतीक सिन्हा यांनी स्पंदना यांना विचारला. आमच्यापेक्षा तुमची विश्वासार्हता जास्त आहे असा टोला स्पंदना यांनी लगावला.

सकाळी 11.26 - फेक न्यूजमुळे समाजाचं ध्रुवीकरण होत आहे - माधव गाडगीळ, माजी केंद्रीय गृहसचिव
"फेक न्यूजमुळे समाजाचं ध्रुवीकरण होत आहे. फेक न्यूजसंदर्भात प्रसारमाध्यमांनी जबाबदार भूमिका घ्यायला हवी. बीबीसीने याप्रश्नी पुढाकार घेतला आहे परंतु इतर संस्थांनी असा प्रयत्न केलेला नाही."

सकाळी 11.18 - सायबर सुरक्षा हा अभ्यासक्रमाचा भाग होणं आवश्यक
सायबर सुरक्षा हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग होणं आवश्यक आहे. डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन द्यायला हवं - नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळी 11.15 - अपराधी कोण हे शोधून काढा - पृथ्वीराज चव्हाण
फेक न्यूजचा प्रसार करणारा अपराधी कोण हे शोधून काढणं हे फेक न्यूज रोखण्यातलं महत्त्वाचं पाऊल असेल. सरकारने यासंदर्भात योग्य कार्यवाही करायला हवी. राज्यात लीन्चिंगसंदर्भात अफवा पसरत असताना सरकारनं तातडीने पावलं उचलायला हवी होती, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
देशात सध्या जे घडतं आहे ते अत्यंत क्रूर आहे. उजव्या विचारसरणीच्या वेबसाइट्स फेक न्यूज पसरवत आहेत. या गोष्टींना कोणीतरी प्रायोजित करत आहे. आयटी सेक्युरिटी अॅक्टनुसार पोलिसांनी अशा व्यक्तींवर कारवाई करणं आवश्यक आहे. पण पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पंतप्रधान कोण किंवा मुख्यमंत्री कोण हे फारसं महत्त्वाचं नाही - पृथ्वीराज चव्हाण

सकाळी 11.10 - सोशल मीडियावर देखरेख आणि नियंत्रण सोपं नाही - दिनेश शर्मा
सगळ्यांत आधी बातमी देण्याच्या स्पर्धेत चॅनेल्स विश्वासार्हता गमावू लागले आहेत असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी लखनौ येथे आयोजित #beyondfakenews परिषदेत बोलताना सांगितलं.

याचा अर्थ सगळे चॅनेल्स फेक न्यूजचा प्रसार करत आहेत असा होत नाही. फेक न्यूज प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडे कायदा तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र तसं झालं तर सरकार प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे अशा चर्चा रंगू लागतील. सोशल मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडया आणि प्रिंट मीडियाला मागे टाकलं आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. सोशल मीडियावर देखरेख आणि नियंत्रण सोपं नाही. आजचा तरुण प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे पाहतो, त्यांना वाटतं.

सकाळी 10.53 -पुण्यातील पहिल्या चर्चा सत्राला सुरुवात

चर्चासत्रात सहभागी झालेले मान्यवर
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- माधव गोडबोले, माजी केंद्रीय गृहसचिव
- समन्वयक : आशिष दीक्षित, संपादक, बीबीसी मराठी

सकाळी 10. 50 - प्रेक्षकांची उपस्थिती
वेगवेगळया क्षेत्रातले मान्यवर, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची परिषदेसाठी उपस्थिती.


सकाळी 10.30 - बीबीसीचा रिसर्च लोकांसमोर
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी बीबीसीनं केलेला रिसर्च उपस्थित लोकांसमोर मांडला. रिसर्चमधून आलेली महत्त्वाची माहिती त्यांनी संक्षिप्त स्वरुपात लोकांना समजावून सांगितली.


सकाळी 10.32 - अहमदाबादमध्ये फेकन्यूज पीडिताने मांडली व्यथा
राजस्थानातल्या कालबेलिया वाडी समाजातल्या शांतादेवी यांची जमावानं हत्या केली होती. मुलांना पळवणाऱ्या टोळीतल्या महिला असा समज करून अहमदाबादमध्ये लोकांनी त्यांना मारलं. पण, भिक्षा मागून गुजराण करणं यावर या समाजाची उपजिविका चालते. त्याच समाजाचे प्रतिनिधी त्यांची बाजू मांडताना.


सकाळी 10. 10 - देशातल्या 7 शहरांमध्ये #BeyondFakeNews परिषदेला सुरुवात


सकाळी 10 - बीबीसी मराठीच्या #BeyondFakeNews परिषदेला सुरुवात
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 3

तुम्ही फेकन्यूजपासून स्वतःला असं वाचवू शकता

सकाळी 9.30 वाजता - अमृतसरमध्ये तयारी पूर्ण


सकाळी 9 वाजता - कार्यक्रमाची तयारी पूर्ण

पुणे विद्यापीठात होणाऱ्या #BeyondFakeNews कार्यक्रमाची तयारी पूर्ण. ठिक 10 वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होईल. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर तुम्ही हे संपूर्ण चर्चासत्र दिवसभर लाईव्ह पाहू शकता.


हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










