शिवस्मारक बोट दुर्घटना : 'खलाशाने घेतला खडकाळ शॉर्टकटने जाण्याचा निर्णय'

फोटो स्रोत, Mumbai Coast Guard
मुंबईजवळ अरबी समुद्रात बोट उलटून एकाचा जीव गेला आहे. या घटनेचे साक्षीदार आणि PTIचे पत्रकार निखिल देशमुख यांनी BBC मराठीला सांगितलं...

दुपारी 3च्या सुमारास आम्ही गेट वेला पोहोचलो, तेव्हा लक्षात आलं की शिवस्मारकाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी ३ बोटींचं नियोजन करण्यात आलं होतं. एका बोटीतून विनायक मेटे आणि सरकारी अधिकारी आधी कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. एका बोटीतून पत्रकार, भटजी, काही सरकारी अधिकारी आणि नऊवारी साडी नेसलेल्या मुली कार्यक्रमस्थळी जाणार होत्या. ही बोट मोठी होती आणि यामध्ये ३५ ते ४०जण होते.
तिसऱ्या बोटीमध्ये मेटे यांचे कार्यकर्ते आणि काही सरकारी अधिकारी असं २३ ते २४ जण होते. या बोटीची क्षमता २० जणांची होती.
चारच्या सुमारास ही बोट गेट वे ऑफ इंडिया येथून कार्यक्रमस्थळी निघाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक लांबचा मार्ग आहे. या मार्गाने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी किमान दीड तास लागतो. तर दुसऱ्या मार्गाने गेलं तर अर्धा तासच लागतो. पण हा मार्ग खडतर असून इथं पाण्यात मोठे खडक आहेत.
काही अनुभवी खलाशीच येथून बोट नेऊ शकतात. या मार्गाला प्राँज लाईट हाऊसचा मार्ग असं म्हणतात. हे मुंबईचं दक्षिण टोक आहे. ही बोट जेव्हा गेट वे ऑफ इंडियातून निघाली तेव्हा बोटीवर उत्साहाचं वातावरण होतं. मेटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंद होता.
या बोटीच्या खलाशाने हा जवळचा मार्ग निवडला. बोटीवरील कार्यकर्त्यांना कधी एकदा कार्यक्रमस्थळी पोहोचू असं वाटतं होतं. बोट सुटून २० मिनिटांचा वेळ झाला असेल. किनाऱ्यापासून बोट किमान ४०० मीटर अंतरावर आली असावी. यावेळी खलाशाचा अंदाज चुकला आणि बोट खडकावर आदळली. त्यामुळे बोटीच इंजिन बंद पडलं. शिवाय बोटीत पाणी शिरू लागलं. नेमकं काय झालं, याचा अंदाज बोटीवरील लोकांना आला नव्हता. त्यामुळे बोटीवरील लोक बावचळून गेले.

फोटो स्रोत, Nikhil Deshmukh
बोटीवरील एक कार्यकर्ते सिद्धेश पवार इतरांना मदत करत होते. बोटीत येणारे पाणी बाहेर फेकण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. हे सुरू असतानाच बोटीवरील काही कार्यकर्त्यांनी मदतीसाठी फोन करायला सुरुवाता केली.
हा गोंधळ सुरू असतानाच तिथं जवळ असणारी डॉल्फिन नावाची बोट मदतीसाठी आली. ही बोट पाहताच बंद पडलेल्या बोटीवर गोंधळ सुरू झाला. या बोटीतून बाहेर पडून तातडीने सुरक्षित अशा डॉल्फिन बोटीवर जाण्यासाठी सर्वच लोक पुढे सरसावले आणि बोटीच्या काठाला आले. त्यामुळे ही बोट अचानकपणे कलंडली. त्यामुळे काही जण पाण्यात फेकले गेले तर सिद्धेश पवार बुडालेल्या बोटीच्या खाली गेले.
हा प्रकार सुरू असताना आमची बोट फार दूरवर होती. आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचणारच होतो, तोवर मेटे यांनी स्वतःच कार्यक्रम रद्द झाल्याचं कळवलं. मेटेंनी असं सांगताच काही तरी मोठी घटना घडली आहे, असं आम्हाला वाटून गेलं.

इकडे बुडालेल्या बोटीजवळ डॉल्फिन बोटीच्या मदतीसाठी इतर लहान नौकाही तोवर आल्या होत्या. शिवाय २ हेलिकॉप्टरही पोहोचले होते. त्यांच्या साह्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढता आलं. पण सिद्धेश पवार मात्र सापडत नव्हते. बरीच शोधमोहीम राबवल्यानंतर सिद्धेश यांचा मृतदेह मिळाला. हे बचावकार्य जवळपास १ तास सुरू होतं.

'त्या' बोटीत मी बसणार होतो...
झी 24 तासचे पत्रकार दीपक भातुसे अपघातग्रस्त बोटीत बसणार होते. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी हकिगत सांगितली -
साधारणतः दुपारी साडे तीन वाजता आम्ही इंडिया गेटवर जमलो होतो. शिवस्मारकाच्या कार्यक्रमासाठी इथं दोन स्पीड बोटी आणि दोन साध्या बोटी ठेवण्यात आल्या होत्या. आम्ही आलो तेव्हा त्यातली एक बोट रवाना झालेली होती. त्यात शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि काही पत्रकार होते. आमची बोट त्यानंतर जाणार होती.
एका स्पीड बोटमध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि राज्याचे मुख्य सचिव रवाना झाले. जी स्पीड बोट समुद्रात बुडाली त्याच बोटीत आम्हाला जाण्याची विनंती काही अधिकाऱ्यांनी केली. आम्ही स्पीड बोटमध्ये बसण्यासाठी साध्या बोटीतून उतरलोसुद्धा होतो. कार्यक्रमस्थळी विनायक मेटे आणि अधिकारी आधीच रवाना झालेले असल्याने आम्ही तिथं लवकर पोहोचायच्या प्रयत्नात होतो.

पण स्पीड बोटमध्ये आधीच गर्दी झालेली होती. त्यात पुन्हा आम्ही बसलो तर जास्त वजन व्हायचं, असा विचार मनात आला आणि मी आणि सोबतचे पत्रकार पुन्हा माघारी फिरलो. पुन्हा साध्या बोटीत बसलो.
आम्हीसुद्धा जर त्या बोटीत असतो तर या अपघातात अडकणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असती आणि कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. आम्ही सुदैवी ठरलो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
जी बोट पाण्यात बुडाली ती स्पीडबोट आमच्या आधी रवाना झाली. त्यानंतर आमची साधी बोट निघाली. अर्धा तास प्रवास झाल्यानंतर आम्हाला कळले की ती स्पीड बोट पाण्यात अडकली आहे. त्यानंतर माझ्या कार्यालायातून फोन आला की बोट समुद्रात बुडाली आहे. बुडालेल्या बोटीत सतीश परब होते, त्यांच्याशी मी बोललो.
आम्ही साधारणतः त्या बोटीपासून एक ते दीड किलोमीटर दूर होतो. स्पीड बोट असल्याने ती बोट किनाऱ्याजवळून जात होती. त्यामुळेच कदाचीत हा अपघात झाला असावा. मी काही प्रत्यक्षदर्शींशी बोललो तर त्यांच म्हणणं होतं की सुरुवातीला आम्हाला एक मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर बोटीत पाणी घुसायला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाणी उपसायला सुरू केलं. पण तेही किती पाणी उपसणार.
अपघात घडल्यावर तुमची समयसूचकता फार महत्त्वाची असते. एका अधिकाऱ्याचं प्रसंगावधान कामी आली. कदाचित त्यामुळेच बोटीतील 25 पैकी 24 जणांचे प्राण वाचले असावेत. बोटीला अपघात झाल्यावर अनेकांनी कोस्ट गार्डला आणि पोलिसांना फोन केले. पण त्यांची मदत वेळेत पोहचू शकली नाही.
त्याचवेळी बोटीत असलेले अधिकारी श्रीनिवास जाधव यांना सुचले आणि त्यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना फोन केला. मुंबई ते अलिबाग भागात त्यांच्या बोटी चालतात. जयंत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता इथल्या कॅप्टनला फोन केला. 'तातडीने स्पीड बोटी काढा.. शक्य तेवढ्या स्पीडने बोटी घेऊन जा' अशा सूचना त्यांनी कॅप्टनला केल्या.
किनाऱ्यावरून तेवढ्याच वेगाने या बोटी घटनास्थळाकडे रवाना झाल्या. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत ते घटनास्थळी पोहचले. जयंत पाटील यांच्या निरोपानंतर घटनास्थळी बोट पोहोचली तेव्हा अपघातग्रस्त बोट पाण्यात अर्धी बुडालेली होती. तत्काळ इथं मदतकार्य सुरू करण्यात आलं.

फोटो स्रोत, MAHARASHTRA DGIPR
विचार करा श्रीनिवास जाधव यांनी फोन केला नसता किंवा जयंत पाटील यांच्या बोटी आल्या नसत्या तर कदाचित आज चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आम्हाला 4.35 वाजता कन्फर्म झालं की बोट बुडाली आहे. त्यानंतर आकाशात कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर दिसले. या अपघातात सुरुवातीला दोन जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यांचा शोध कोस्टगार्ड घेत होते. पण पाणबुडे असते तर या अपघातात मृत्यू झालेल्या एकमेव व्यक्तीचाही वेळेवर शोध घेता आला असता.
हा अपघात झाला त्यादरम्यान समुद्रात लाटा वाढलेल्या होत्या. आमची साधी बोटही प्रचंड हालत होती. आमच्यातील एका पत्रकाराने मेटे यांना फोन केला. त्यांनी अपघात झाल्याचे कन्फर्म करत पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करत असल्याचं सांगितल. आम्ही अर्ध्या रस्त्यातून परत फिरलो. परत येताना आणखी हेलीकॉप्टर दिसले.
या अपघातातून जे वाचले त्यांच्याशी बोललो. प्रत्येकाला धक्का बसला होता. ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी पत्रकार योगेश नाईक यांच्याशी बोललो. योगेशने मला सविस्तर घटना सांगितली. कोणाला काय करायचं ते कळत नव्हतं, असं तो म्हणाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








