वैमानिक झाल्यावर त्याने गावकऱ्यांना घडवली हवाई सफर

विमानप्रवास, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर. पर्यटन

फोटो स्रोत, Sat Singh

फोटो कॅप्शन, विमान प्रवासाने हरखून गेलेले गावकरी

मानवी नातेसंबंधांची वीण घट्ट असली की काय किमया घडू शकते याचा प्रत्यय हरयाणा राज्यातल्या हिसारजवळच्या सारंगपूरमध्ये नुकताच आला.

हिसार शहरापासून सारंगपूर गाव 15 किलोमीटर अंतरावर आहे. याच गावचे विकास बिश्नोई काही दिवसांपूर्वीच पायलट झाले. सध्या ते इंडिगो एअरलाइन्स या विमानसेवा पुरवणाऱ्या खाजगी कंपनीसाठी कार्यरत आहेत.

पायलट झाल्याचा आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने विकास यांनी माणुसकीचंही दर्शन घडवलं. गावातल्या 22 ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी दिल्ली ते अमृतसर अशी हवाई सफर घडवून आणली. या हवाई सफरीच्या माध्यमातून गावातल्या या ज्येष्ठांनी सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर आणि जालियनवाला बाग अशा ठिकाणांना भेट दिली.

या सगळ्या मंडळींनी आयुष्यात कधीही गावाची वेस ओलांडली नव्हती. या सगळ्यांमध्ये 80 वर्षीय जैता देवी यांचाही समावेश होता.

त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास केला. सहा मुलांच्या आई असणाऱ्या जैता देवींनी आपल्या या अनुभवाबद्दल विस्तृतपणे सांगितलं. 3 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत तीन वेळा जन्म अनुभवला असं त्या म्हणतात.

सुवर्णमंदिर याचि देही याचि डोळा पाहिलं. वाघा बॉर्डरला भेट दिली. भारतमाता की जयचा जयघोष सातत्याने सुरू होता. पारंपरिक घागरा कुर्ता पेहरावात असलेल्या जैता देवी उत्साहाने सांगतात. आता मी जगाचा निरोप घेतला तरी हरकत नाही. आता आयुष्यात करण्यासारखं, पाहण्यासारखं जे होतं ते बघून झालं, असं त्या कृतार्थ मनाने सांगतात.

विमानप्रवास, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर. पर्यटन

फोटो स्रोत, Sat Singh

फोटो कॅप्शन, सुवर्णमंदिरात गावकरी

"माझ्या शेतातून रोज विमानं दिसतात. पण खरं विमान कसं असतं हे कधीच पाहिलं नव्हतं. मात्र प्रत्यक्षात विमान म्हणजे 1000 हत्तींएवढं मोठं असतं. पारंपरिक वेशातले आम्ही सगळेजण तिथे पोहोचलो तेव्हा विमानतले सगळे आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. आम्ही हरयाणाचे आहोत. आम्ही धनधान्याची निर्मिती करतो आणि सैनिक घडवतो असं मी सांगितलं," असं 70 वर्षांच्या ककरी देवी यांनी सांगितलं.

या अशा रंजक गोष्टी हा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडे आहेत. फोटोत दिसावं यासाठी प्रत्येकजण हातात बोर्डिंग पास घेऊन सज्ज होते.

वेगळ्याच विश्वाची सफर

या सगळ्या चमूत 65 वर्षीय बिमला देवी सगळ्यांत तरुण म्हणायला हव्यात. साधारण महिनाभरापूर्वी विकासने आम्हा 22 लोकांना या प्रवासाविषयी सांगितलं. त्यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. विमानप्रवासात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं. मात्र तसं काही झालं नाही.

विमानप्रवास, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर. पर्यटन

फोटो स्रोत, Sat Singh

फोटो कॅप्शन, सगळी ज्येष्ठ मंडळी विमान प्रवासानंतर

हरयाणवी भाषेत या महिला आपल्या अद्भुत प्रवासाविषयी सांगतात. आम्ही घर, शेतवाडी आणि गायी-म्हशी सगळं पाहिलं आहे. विमानप्रवास, सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर हे सगळं आमच्यासाठी स्वतंत्र विश्व आहे. दुसऱ्याच एखाद्या जगात आल्यासारखं वाटलं.

विमानाच्या खिडकीतून म्हणजेच उंचावरून खालचं दृश्य कसं दिसतं हे अनुभवण्यासाठी बहुतांशजण खिडकीजवळची सीट पकडून बसले होते, असं 78 वर्षांच्या अमर सिंह यांनी सांगितलं. त्यांना चार नातवंडं आहेत.

विमानप्रवास, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर. पर्यटन

फोटो स्रोत, Sat Singh

फोटो कॅप्शन, या सगळ्या ज्येष्ठांनी विमानप्रवासाचा आनंद लुटला

विमान हवेत झेपावलं तेव्हा कानांना थोडा त्रास जाणवला. मात्र नंतर काही झालं नाही. विमानाच्या खिडकीतून ढगांचा नजारा पाहताना मी लहान मुलांसारखा आनंदलो, असं अमर सिंह सांगतात.

71 वर्षांचे आत्राम अजूनही आपला बोर्डिंग पास कवटाळून बसलेले दिसतात. विमानातून प्रवास केला तो अनुभव गावकऱ्यांना सांगतो. काहींना अजूनही खरं वाटत नाही, असं ते म्हणतात.

आत्माराम यांनी सहा नातवंड आहेत. मी बोर्डिंग पास जवळच ठेवतो. गरज पडली तर पुरावा म्हणून कोणालाही केव्हाही दाखवू शकतो, असं ते सांगतात.

वडिलांकडून मिळाली शिकवण

या सगळ्या ज्येष्ठांच्या हवाईसफरीची आर्थिक जबाबदारी विकास यांनीच उचलली आहे. 2010मध्ये व्यावसायिक पायलट म्हणून कॅलिफोर्नियाहून परतल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही गोष्ट होती.

गावातल्या वयस्क बायका त्यांना म्हणायच्या, बाळा आता आमची निरोपाची वेळ झाली आहे. कधीतरी एकदा विमानात बसव.

कमर्शियल पायलट झालो म्हणजे दुसऱ्या दिवसापासून मी विमानं चालवू लागेन, असं त्यांना वाटलं होतं. 2017मध्ये मी पायलट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळीच या सगळ्या आजीआजोबांना विमानातून सफर घडवायची हे मी पक्कं केलं होतं.

या सगळ्यांसाठी विकास यांनी सव्वा महिना आधीच तिकीटं आरक्षित केली, जेणेकरून तिकिटांचे दर स्वस्त असतील. विकास यांचे वडील महेंद्र बिश्नोई हिसारमध्येच एका बँकेत अधिकारी आहेत. या सगळ्या वडीलधाऱ्यांनी एखाद्या युद्धावर जाण्यासारखी तयारी केली असं महेंद्र यांनी सांगितलं.

विमानप्रवास, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर. पर्यटन

फोटो स्रोत, Sat Singh

फोटो कॅप्शन, वैमानिक विकास बिश्नोई

ही सगळी मंडळी अमृतसरला पोहोचली तेव्हा त्यांनी कॉकपिट अर्थात वैमानिक बसतात तिथलं काम कसं चालतं हे दाखवण्याचा आग्रह केला. त्या सगळ्यांचा उत्साह पाहून त्यांना कॉकपीट पाहण्याची अनुमती देण्यात आली. कॉकपीट पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

"तीस वर्षांपूर्वी बाबांना नोकरी मिळाली तेव्हा त्यांनी गावातल्या वडीलधाऱ्यांना देशातल्या धार्मिकस्थळांची सैर घडवून आणली होती. त्यावेळी एवढ्या गावकऱ्यांसाठी बसची व्यवस्था करणंही अवघड होतं. मीही बाबांप्रमाणेच विचार केला. यशस्वी वाटचाल करायची असेल तर वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद मोलाचे असतात," असं विकास सांगतात.

या गावकऱ्यांचं काही महिन्यांपूर्वी तुफान पावसामुळे बाजरी आणि कापसाच्या शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. यामुळे ते नाराज होते. मात्र विकास यांनी केलेल्या या आयोजनामुळे गावकरी सुखावले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)