'वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या लोकांची संघाशी हात मिळवणी'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयदीप हर्डीकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस वर्किंग कमिटीची (CWC) एक महत्त्वाची बैठक गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राममधील सर्व सेवा संघाच्या परिसरात असलेल्या 'महादेव स्मारक भवनात' होत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातली काँग्रेसची सेवाग्रामच्या ऐतिहासिक परिसरातली बहुतेक पहिलीच CWC ची बैठक असेल. 2014 नंतर डबघाईला आलेल्या काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ आणि उदयोन्मुख नेते आणि सर्व सामान्य कार्यकर्ते त्या निमित्तानं त्यांच्या पक्षाच्या परंपरेबद्दल शिकतील अशी अपेक्षा आहे.
मात्र या बैठकीपूर्वी काँग्रेसला सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं गांधी आश्रम किंवा आश्रमासमोरील यात्री निवासात बैठकीस जागा देण्यास परवानगी नाकारली आणि १९७५ नंतर सर्वोदय आणि काँग्रेसमधील संबंधात आलेला दुरावा परत एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे.
कमकुवत झालेल्या काँग्रेस पक्षाला सेवाग्राम आश्रम चालवणाऱ्या आजच्या कार्यकारिणीने परवानगी नाकारून गहजबच केला आहे. एकेकाळी महात्मा गांधींच्या नेतृत्वातील या लोक-चळवळीचा असा अपमान अलीकडे खचितच झाला असेल. मात्र ह्या बैठकीच्या निमित्तानं सर्वोदयात १९७५ नंतर माजलेली दुफळी सुद्धा समोर आली आहे.
'संघाशी हात मिळवणी'
आचार्य विनोबा भावे यांचे निकटचे अनुयायी आणि सध्या रायगडच्या गागोदे आश्रमात सर्वोदयाचं काम अव्याहतपणे सुरु ठेवणारे ज्येष्ठ सर्वोदयी विजय दिवाण यांनी तर आश्रमाच्या सध्याच्या कार्यकारिणी विरोधात दोन-पानी पत्रकच काढलं आहे. आश्रम प्रतिष्ठाननं काँग्रेस पक्षाला बैठक घेण्यास नकार दिला तो चुकीचा आहे, असं त्यांचं मत आहे.

फोटो स्रोत, BBC/JaideepHardikar
त्या पत्रकात त्यांनी आजचे सेवा संघाचे आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे लोक नेहरू-विनोबा यांचे प्रखर विरोधक असून ते सर्व जयप्रकाश नारायण यांच्या तालमीत तयार झाले आहेत आणि त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी हात मिळवणी केली आहे, असा आरोप केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना दिवाण म्हणाले, "खंत वाटते हो, काही दोन-पाच लोक काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला, ज्याला बापू आणि विनोबा दोघांचाही वारसा आहे, एवढे हतबल करतात. सर्वोदयी सुद्धा आपल्या मार्गापासून भरकटले आणि काँग्रेसने सुद्धा आपला वारसा गमावला, आपला मूळ विचार सोडला, नाहीतर सर्वोदय आणि काँग्रेस हे सहोदर होते, विरोधक नव्हे."
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं एक आठवड्यापूर्वीच असं ठरवलं की पक्षाच्या CWCची बैठक सेवाग्राममध्ये घ्यावी. तसे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला देण्यात आले होते. प्रदेश कमिटीनं मग त्यांच्या वर्ध्यातल्या स्थानिक नेत्यांना तयारी करण्याचे आदेश दिले.
वर्ध्याचे नेते, जे खचितच सेवाग्राम आश्रमाकडे भ्रमण करतात, ते आश्रम प्रतिष्ठानच्या दारात उभे राहिले. मात्र त्यांना सांगण्यात आले की आश्रमात कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांची बैठक घेता येणार नाही. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी बैठकीसाठी आश्रम आणि यात्री निवास देण्यास असहमती दर्शवली.
सेवाग्राममध्ये गांधींचा वारसा सुरु ठेवणारे पाच प्रतिष्ठान आहेत. त्यांचा स्वतःचा परिसर आहे. या सर्व ट्रस्टचं मिळून सेवाग्राम कॉम्प्लेक्स तयार होतं. बापू सेवाग्राम-आश्रमात १९३६ च्या एप्रिलमध्ये वास्तव्याला आले, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचा महत्वाचा टप्पा इथूनच संचालित झाला. त्या सगळ्या इतिहासाचा हे आश्रम प्रांगण साक्षीदार आहे.
काँग्रेस पक्षाचा आग्रह होता की त्यांची CWCची बैठक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या प्रांगणात - म्हणजे जिथं महात्मा गांधींची कुटी आणि त्यालगत अन्य कुटीर आहेत - किंवा आश्रमासमोरील यात्री निवासमध्ये व्हावी.
लगतच्या नई तालीम समितीच्या प्रांगणात शांती भवन आहे - जिथं पहिली 'आंतरराष्ट्रीय शांती बैठक' पार पडली होती, तिथं ही बैठक झाली असती, मात्र ते भवन आधीच दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी आरक्षित होतं आणि आमच्याकडे तशी बैठक शांती भवनात घेण्यासंबंधी प्रस्तावही आला नाही, असं नई तालीम समितीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ गांधीवादी डा. सुगंठ बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, कार्यकारिणीच्या निमित्तानं येणाऱ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जेवायची सोय आमच्याकडे असेल. काही कार्यकर्ते त्यांच्या प्रांगणात असलेल्या भवनात राहतील सुद्धा. मात्र कार्यकारिणीची बैठक आता महादेव भवनात होईल.
"आम्हाला आश्रमात कुठलाही राजकीय विवाद नको आहे, त्यामुळेच आम्ही इथे कुठलाही राजकीय कार्यक्रम होउ देत नाही," असं बीबीसी मराठीशी बोलताना आश्रम प्रतिष्ठानचे प्रभू म्हणाले. पक्षाचे नेते मात्र आश्रमात सकाळी प्रार्थनेत सहभागी होतील आणि वृक्षारोपण करतील, असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/JaideepHardikar
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानशी जुना संबंध असलेले एक वरिष्ठ गांधीवादी 'बीबीसी मराठी'शी नाव न घेण्याच्या अटीवर बोलले. त्यांचं म्हणणं होतं की समविचारी आणि तेही काँग्रेस सारख्या राजकीय पक्षास त्यांच्या कार्यकारिणीची बैठक नाकारण्यासाठी कुठलाही ठराव आश्रम प्रतिष्ठाननं घेतल्याची त्यांना कल्पना नाही. २००६-२००७ साली काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या काही प्रतिनिधींचं प्रशिक्षण याच परिसरात वर्षभर चालवलं गेलं होतं. पूर्वीच्या काँग्रेस आणि आत्ताच्या भाजप सरकारकडून आश्रम प्रतिष्ठानच्या नव्या भावनांच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य सुद्धा घेण्यात आलेलं आहे, मग यात्री निवासात ही बैठक होण्यास तशी काही अडचण नव्हती. पण तिथंही बैठक घेण्यास आश्रम कार्यकारिणीनं परवानगी नाकारली, हे आश्चर्यच आहे, असं ते म्हणाले.
महादेव स्मारक काय आहे?
ज्या भवनात आता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे, ते महादेव स्मारक भवन, गांधींचे जवळचे अनुयायी आणि स्वीय सचिव महादेव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलं.
महादेव देसाई यांची एक कुटी बापू कुटीच्या बाजूला आश्रम प्रांगणात सुद्धा आहे. महादेव देसाई यांचं निधन १५ ऑगस्ट १९४२ ला झालं. त्याचवेळी 'चले जाव' आंदोलनात गांधी आणि त्यांचे अनेक अनुयायी तुरुंगात गेले. मात्र, महादेव भवनाचं कार्य अव्याहत सुरूच राहिलं. तुरुंगातून सुटल्यावर महात्मा गांधींनी महादेव भवनात आपली पहिली सभा घेतली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजकुमारी अमृतकौर होत्या. याची नोंद 'बापू कुटी-सेवाग्राम आश्रम' ह्या माहिती पुस्तकात वाचायला मिळते.
जानेवारी १९४८ ला बापूंनी एक महत्त्वाची बैठक फेब्रुवारी महिन्यात बोलाविली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि सर्व रचनात्मक कार्यात मग्न असलेल्या त्यांच्या अनुयायांनी एकत्र येऊन 'लोक सेवक संघ' स्थापन करावा, अशी बापूंच्या मनात कल्पना होती, असे जुने सर्वोदयी सांगतात.
काँग्रेसमधल्या आणि गांधींच्या सुरु केलेल्या रचनात्मक कामांत गुंतलेल्या कार्यकर्त्यांना त्या बैठकीचं आमंत्रण होतं. मात्र ती बैठक पार पडण्यापूर्वी गांधींची हत्या झाली. मग ती बैठक १९४८च्या मार्च महिन्यात महादेव भवनात पार पडली. त्यात १२० हून अधिक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

फोटो स्रोत, BBC/JaideepHardikar
मौलाना अबुल कलाम आझाद, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, वगैरे वगैरे. याच महादेव भवनात - जिथं आता सर्व सेवा संघाचं राष्ट्रीय कार्यालय आहे - पंडित जवाहरलाल नेहरू आणि विनोबा भावे यांची पहिली भेट घडली.
नेहरू आणि विनोबा यांना बापूंनी प्रथम आणि द्वितीय सत्याग्रही घोषित केले होते. नेहरूंनी देशाची राजकीय धुरा सांभाळली, विनोबा बापूंच्या रचनात्मक कामाला पुढे घेऊन गेले. मात्र हे दोघेही बापू गेल्यानंतर १९४८ मार्च मधील त्या बैठकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच भेटले, असा इतिहास आहे. त्याच बैठकीत सर्वोदय समाज आणि सर्वोदय मंडळ, यांच्या स्थापनेबद्दल सर्वमत झालं. पुढे त्याची संस्थात्मक बांधणी झाली.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं काँग्रेसच्या बैठकीस परवानगी नाकारल्या नंतर सर्व सेवा संघानं त्यांच्या परिसरात असलेल्या या ऐतिहासिक महादेव स्मारक भवनात ही बैठक घेण्यास अनुमोदन दिलं आणि पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवात-जीव आला.
सेवाग्राममध्ये काँग्रेसला बैठक घेण्याची परवानगी नाकराल्यानंतर त्यासंबंधी प्रश्न विचारला असता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
ते म्हणाले, "ज्या ठिकाणी गांधी आहेत त्या ठिकाणी काही अडचणच येऊ शकत नाही. जिथं गांधी आहेत तिथं सत्याचा मार्ग आहे. प्रेमाचा मार्ग आहे. काँग्रेसची बैठक महादेव भवनात होईल असं त्यांनी सांगितलं. त्याच ठिकाणी 1948मध्ये तत्कालीन काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती. गांधींजीनंतरचा भारत कसा असेल या विषयावर पाच दिवस चिंतन करण्यात आलं."
"त्या बैठकीत नेहरू म्हणाले होते, 'बापूंच्या तत्त्वज्ञानावर हल्ला होत आहे. जर हा हल्ला आपण परतवून लावू शकलो नाही तर देश सर्वनाश होण्याच्या दिशेने जाईल' नेहरू यांचे हे शब्द आजही तितकेच लागू होतात,"असं सुरजेवाला म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










