ग्राउंड रिपोर्ट : 'सेव्ह गर्ल चाइल्ड'चं चित्र काढणाऱ्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ग्राउंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

काळोख असलेल्या त्या खोलीत पोहोचण्यापूर्वीच एका भींतीवर नजर पडते. या भींतीवर एक पेंटिंग आहे. जे मॉडेल असलेल्या एका युवतीचं आहे. त्यावर लिहिलंय सेव्ह गर्ल चाइल्ड. त्याखाली लिहिलं आहे - I AM BEST.

पेंटिंग उंचावर असल्यानं ते पाहण्यासाठी पंलंगावर चढावं लागलं. याच पिवळ्या भींतीवर अनेक पेंटिंग लागवल्या होत्या. एका पेंटिंगमध्ये वाहत्या नदीवर सूर्य उगवताना दाखवला होता.

ज्या हातांनी ही चित्रं रेखाटली होती ती मात्र निर्विकार दिसत होती.

14 वर्षीय कविता (बदललेलं नाव) आता 70 टक्के भाजलेलं शरीर आणि 100 टक्के गमावलेल्या विश्वासानं दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

मेरठ जवळील सरधना भागात दाखल झालेल्या FIR नुसार, 17 ऑगस्टला 6 मुलं कविताच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला जिंवत जाळायचा प्रयत्न केला.

यातल्या 5 लोकांना अटक करण्यात आली आहे.

गाणी आणि रंगांवर प्रेम असणारी कविता याही परिस्थितीत आपल्या अभ्यासासाठी चिंता करत आहे.

कविताचं घर

सफदरजंग दवाखान्यातल्या बर्न वॉर्डमध्ये पोहोचल्यानंतर कविताच्या वडिलांना आम्ही फोन केला.

"सरळ चालत या. जिथं गर्दी दिसेल तिथेच मी उभा आहे," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.

काही पावलांच्या अंतरावर लोकांनी एका माणसाभोवती गर्दी केली होती. त्यातली काही न्याय, कायदा आणि फाशी यावर बोलत होती आणि या सर्वांच्या मधोमध बसलेली एक व्यक्ती हे सर्व ऐकत होती.

सफदरजंग हॉस्पिटल

ही सर्व मंडळी स्वत:ला नवयुवक शक्ति संघटनेचे कार्यकर्ते म्हणवून घेत होती आणि विरोध निदर्शनात कविताच्या वडिलांनी भाग घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

शिवपाल (बदललेलं नाव) यांनी आपल्या मुलीच्या हल्लेखोरांना फाशी देण्याची मागणी करावी, अशी त्यातल्या काही लोकांची मागणी होती.

शिवपाल शांतपणे बसले होते आणि जे माझ्या मुलीसोबत घडलं ते कुणाच्याही मुलीसोबत घडू नये, इतकंच म्हणत होतं.

कविताचे वडील

काही वेळानंतर आम्हाला शिवपाल यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.

"जवळपास 60 ते 70 टक्के शरीर भाजलं आहे तिचं. चेहरा सर्वांत जास्त भाजला आहे. या अवस्थेतही तिला आमच्याशी बोलावं वाटत आहे."

15 मिनिटांच्या संभाषणात शिवपाल यांना तीनदा फोन कॉल आले. मुलीबरोबर काय झालं, हे तिन्ही वेळेला त्यांनी तीन वेगवेगळ्या लोकांना सांगितलं.

मध्येच काही लोक त्यांच्याकडे येत आणि आता पुढे काय करायचं, असं विचारत. त्यावर थोडा वेळ थांबा असा ते इशारा करत आणि पुन्हा बोलायला सुरुवात करत.

कवितावर हल्ला करण्यात आला तेव्हा शिवपाल दुकानात होते. फोनवरून त्यांना ही घटना समजताच त्यांनी घर गाठलं.

तेच घर ज्याच्या पिवळ्या भींतीवर कवितानं आपल्या हातांनी काढलेली चित्रं लावली आहेत.

कविताचं घर

"कविताचं रंगांवर खूप प्रेम आहे. पेंटिंग करणं, निरुपयोगी वस्तूंपासून रोषणाईच्या वस्तू बनवायला तिला आवडतं," हे सांगतांना कविताच्या आईची नजर कवितानं बनवलेल्या घरातल्या श्रीकृष्णाच्या पेंटिंगवर गेली आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

"तिचं शरीर भाजलं आहे. तरी ती म्हणते की, आई मी आता इंजिनियर कशी होणार? उपचारासाठी पैसे कुठून येणार?"

त्यानंतर कविताची आई आतल्या खोलीत गेली आणि तिचे दोन फोटो आणून त्यांनी ते माझ्या हातात ठेवले, "बघा हे फोटो. तुम्हाला वाटतं का माझी मुलगी असं-तसं काही काम करेल?"

कविताचं घर

तिला फक्त दोनच गोष्टींची आवड होती. अभ्यासाची आणि पेंटिंगची. अभ्यासा करून थकल्यानंतर हाच टीव्ही सुरू करायची. खोली बंद करून डान्स करायची. घरातलं काहीच काम आम्ही तिच्याकडून करून घेत नसे.

कविता यांच्या आईनं हिंदीत पीएचडी केली आहे. घटनेच्या दिवसाबदद्ल त्या सांगतात, "रोहित आणि त्याचे काही मित्र बऱ्याच दिवसांपासून कविताला त्रास देत होते. पण 16 तारखेला जेव्हा ती ट्यूशन संपवून घरी येत होती तेव्हा त्या लोकांनी बळजबरीनं तिच्या हातात मोबाईल दिला आणि रात्री फोनवर बोलायला सांगितलं."

दुसऱ्या दिवशी सकाळीच कविताच्या वडिलांनी त्या मुलाच्या घरी जाऊन तक्रार केली. पण तेव्हा कविताच्या कुटुंबीयांनी हा अंदाज नव्हता की, या बाबीमुळे त्यांच्या मुलीचं जीवन धोक्यात येईल.

कविताई आई आणि आजी

तक्रारीनंतर काही वेळातच 3 जण कविताच्या घरी आले आणि त्यानंतर त्यांनी अजून 3 जणांना बोलावून घेतलं.

"माझी मुलगी याच बेडवर बसून गणितं सोडवत होती. तेव्हा अचानक ते लोक या खोलीत आले. मी या कोपऱ्यात तर माझ्या सासूबाई तिकडे अंतरावर बसल्या होत्या. त्यांनी खोलीत प्रवेश करताच कविताला शिव्या द्यायला सुरुवात केली.

मी कविताला वरच्या खोलीत जायला सांगितलं तर त्यांनी मला धक्का दिला. त्यानंतर त्यांनी रोहितला बोलावलं. पुढच्या काही क्षणांत त्यांनी रॉकेल ओतून माझ्या मुलीला आगीच्या हवाली केलं."

इथेच आगीची घटना घडली.
फोटो कॅप्शन, इथेच आगीची घटना घडली.

सविता (बदललेलं नाव) यांनी मग आम्हाला कवितावर रॉकेल टाकण्यात आलं ती जागा दाखवली. इथंच ती उभ्या-उभ्या जळत होती आणि ते लोक पळून गेलो होत, असं त्या म्हणत होत्या.

कुणीच त्यांना येताना पाहिलं नाही?

"या भागात माकडांची दहशत आहे. त्यामुळे अनेक लोक घराचं दार बंद करून ठेवतात. तसंच बरेच लोक नोकरी करतात. ते एकदा सकाळी गेले की रात्रीच परत येतात. अशात कोण आलं, कोण गेलं, हे कळत नाही," असं कविताच्या शेजारी राहणारे भूपेश (बदललेलं नाव) सांगत होते.

"आम्ही कुणाला येताना तर नाही पाहिलं, पण जेव्हा मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा आम्ही बाहेर आलो. तिच्या वडिलांना फोन केला आणि मग लगेच आम्ही दवाखान्यात गेलो."

सरधना

कविताच्या घरातून निघाले तेव्हा आतापर्यंत शांत असलेली तिची आजी मला म्हणाली, "माझ्या मुलीसाठी प्रार्थना कर. ती ठिक व्हायला हवी."

पदरानं डोळे पुसत नंतर त्यांनी घराचं दार बंद केलं.

शिवपाल यांनी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली होती. यातल्या 6 आरोपींपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सरधना पोलीस स्टेशनचे एसएचओ दिलीप सिंह यांनी सांगितलं की, "सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा गंभीरतेनं तपास करत आहेत."

रोहित सैनीचं घर

या प्रकरणातील प्रमुख आरोपी रोहित सैनीचं घर कविताच्या घरापासून फार अंतरावर नाही. चार-पाच गल्ल्या ओलांडल्यानंतर त्यांचं घर येतं.

खरं तर रोहित यांची आई मला रस्त्यातच भेटली. खूप सारे प्रयत्न केल्यानंतर त्या बोलण्यास तयार झाल्या. जे काही बोलायचं आहे ते घरी येऊन बोला, रस्त्यावर नको, असं त्यांनी म्हटलं.

घरी पोहोचलो तर त्यांचा मोठा मुलगा अंघोळीची तयारी करत होता. त्यानंच दार उघडलं आणि म्हटलं,"32 वर्षांच्या वयात पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मार खाल्ला. माझ्या आईलाही स्टेशनमध्ये जावं लागलं. आता तर ना काही खायची शुद्ध आहे ना काही विचार करायची."

आपल्या भावानं असं काही केलं असेल यावर आम्हाला विश्वास बसत नाही, असं रोहितचा भाऊ सांगतात.

शपथपत्र

दुसरा आरोपी राजवंश बागडीच्या घराला कुलूप होतं. राजवंशची आई भाजपच्या सदस्य होत्या. काही अंतरावर त्याच्या मोठ्या काकाचं घर आहे, पण तेही बंद होतं.

नंतर शेजाऱ्यांनी सांगितलं की, संतोष यांचे लहान दिर इथंच जवळ राहतात. आम्ही त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी म्हटलं की, "मी माझ्या भाच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही, पण माझा भाऊ मात्र निर्दोष आहे." घटना घडली त्यावेळेस ते दुकानात होते.

सरधना

संतोष यांनी पोलिसांत एक शपथपत्र दाखल केलं आहे. कविता एका मुलावर प्रेम करत होती आणि ही बाब तिच्या घरच्यांना माहिती झाली होती, असा त्यांचा आरोप आहे. यामुळे घरचे कवितावर खूप रागावले. यानंतर कवितानं स्वत:वर रॉकेल ओतून आग लावली, असं या शपथपत्रात म्हटलं आहे.

आरोप प्रत्यारोपात एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे दोन्ही पक्षांकडून फोन रेकॉर्डिंगच्या चौकशीची मागणी होते आहे.

कविता दहावीत शिकते. शाळेत आम्ही या प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा पर्यवेक्षकांनी सांगितलं की, आमच्या शाळेत रोज कवितासाठी प्रार्थना होत आहे.

"सध्या कवितावर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 22 ऑगस्टला तिचे वडील शिवपाल यांनी आम्हाला सांगितलं होतं की, ती सध्या बोलू शकत आहे, पण बर्न केस असल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो."

कविताचं घर

ते मला ही गोष्ट सांगत असताना शेजारच्या मोटारसायकलवर बसलेली माणसं चर्चा करत होती. प्रशासनानं शिवपाल यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल, अशी ती चर्चा होती.

कविताच्या खोलीतल्या भींतीवर काही कप्पे बनवण्यात आले होते. त्यांना ट्रॉफीनं सजवण्याची तिची इच्छा होती.

सकाळपासून तीनदा माझा श्वास गुदरमला आहे, असं त्या खोलीकडे बघताना कविताची आई सांगते. "ती आता आमच्यात नाही राहिली, असं टीव्हीवाले चालवत होते तेव्हा तर माझ्या अंगातला प्राणच निघून गेलं होता," कविताची आई सांगते.

सेव्ह गर्ल चाइल्ड

या प्रकरणात दोन पक्ष आहेत. एक शिवपाल यांच्या कुटुंबीयांचं तर दुसरं आरोपींचं.

शिवपाल यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, आग मुलांनी लावली तर मुलीनं स्वत:हून आग लावली असं दुसऱ्या पक्षाचं म्हणणं आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधण्याअगोदर स्वत:च्या हातावर मेहंदी लावायची स्वप्न बघणारी कविता आज बर्न वॉर्डमध्ये दाखल आहे.

आणि तिथं मेरठमध्ये कवितानं बनवलेलं पेंटिंग भींतीवर लटकत आहे. ज्यावर लिहिलं आहे...सेव्ह गर्ल चाइल्ड...I AM BEST!

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)