मराठा आरक्षण : 'आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणार'

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे झेंडे

फोटो स्रोत, PRASHANT NANAVARE

"मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवून कायदा करेल," अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीनंतर केली.

मराठा आरक्षणावरून राज्यभरात होत असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली.

मुंबईत पार पडलेल्या या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. तसंच, मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली होती.

यानंतर, लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह आले आणि त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली.

फडणवीस यावेळी म्हणाले, "मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन हा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची विनंती केली आहे. आयोगाचा अहवाला आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल आणि मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात येईल. याबाबत सरकारकडून कोणतीही दिरंगाई करण्यात आलेली नाही. त्रुटी दूर करून आणि वैधानिक प्रक्रियेनंच प्रश्न सोडवला जाईल."

'गुन्हे मागे घेऊ'

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "हिंसक आंदोलन करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. तरीही, आंदोलन काळात पोलिसांवरील हल्ले, गाड्यांची जाळपोळ, गाड्या फोडल्या, मारहाण केली हे गुन्हे वगळता इतर गुन्हे परत घेण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. विनाकारण कोणालाही अडकवण्यात येणार नाही. मात्र, नागरिकांनीही हिंसेला थारा देऊ नये."

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

'सरकारने ठोस पावले उचलावीत'

दरम्यान, या बैठकीत मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईसाठी सरकारने दिलेल्या कारणांवर विरोधी पक्ष समाधानी नसल्याची माहिती विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ट्वीट करुन दिली.

यावेळी विशेष अधिवेशनाच्या मागणीसह निरपराध नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील विखे-पाटील यांनी केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

'मुख्यमंत्र्यांनी आगीत तेल ओतलं'

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तेल ओतण्याचे काम सत्तेवर असलेल्या प्रमुखांनी केल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर मध्ये केला.

शरद पवार

फोटो स्रोत, TWITTER

पवार म्हणतात, "मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाला. मात्र आताच्या सरकारने सत्तेपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे नंतर सत्तेवर आल्यावर ते आश्वासन पूर्ण केलं नाही. मराठा समाजाचे मोर्चे हे जगात शांत आणि संयमाचा आदर्श ठरले होते. मात्र आश्वासन पूर्ती न झाल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली."

"त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये साप सोडण्याचा मराठा समाजावर आरोप करणारी विधान केल्याने परिस्थिती चिघळली. मुख्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतल्याने संताप व्यक्त होत मराठा तरुणांकडून टोकाची भूमिका घेतली गेली,"असंही पवार म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे. घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं. त्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्य घेण्याची अपेक्षा असेल तर मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे असेही पवार म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

सध्या सरकारची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या हिताची नाही. असं सांगतानाच राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत सामान्य नागरिंकाना चुकवावी लागू नये. त्यामुळं आक्रमक होताना तरुणांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.

राज्यातल्या परिस्थिती वरून राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याची हालचाल सुरू आहे अशी चर्चा आहे त्यावर मुख्यमंत्री बदलण्याची गरज वाटत नाही. मात्र त्यांनीच योग्य रीतीने काम करावे अशी अपेक्षा आहे, असं सांगत पवारांनी मुख्यमंत्री बदलाचा निर्णय सत्ताधारी पक्षाचा आहे असं स्पष्ट केलं.

आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं यावर बोलताना पवार म्हणाले आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी आपण आजही आग्रही आहोत. मात्र तसं करताना सरसकट आरक्षण द्यायला हवे. ते आरक्षण कुणी घ्यावं आणि कुणी घेऊ नये याचं तारतम्य प्रत्येकानं बाळगायला पाहिजे असंही पवार यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांना अजून थेट निवडणुकीला सामोरं जायचं आहे असा टोला लगावत पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अपघाताने संधी मिळलेल्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये असा खोचक सल्लाही पवार यांनी पाटील यांना दिला.

आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या

कोल्हापूरमध्ये दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. शरद पवार यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली.

शरद पवार

फोटो स्रोत, BBC/swatirajgolkar-patil

फोटो कॅप्शन, कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला शरद पवारांनी भेट दिली.

आंदोलनस्थळी बोलताना पवार म्हणाले, "घटना दुरुस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. असं सांगत गरज असली तर संसदेत आपण स्वतः याबाबत पुढाकार घेऊ. राज्यत आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. त्यावर बोलताना आंदोलनात फूट पडण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांच्यापासून सावध राहत लढाई सुरू ठेवा."

(या बातमीसाठी बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून स्वाती राजगोळकर-पाटील यांनी दिली.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)