मराठा आंदोलनाची पहिली प्रतिक्रिया मराठवाड्यातूनच उमटते कारण...

facebook/KakasahebShinde

फोटो स्रोत, facebook/KakasahebShinde

फोटो कॅप्शन, काकासाहेब शिंदे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात मराठवाड्यातून झाली. याच आंदोलनात पहिला जीव हा मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांचाच गेला. त्यात मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून सर्वप्रथम मराठवाड्यातल्याच आमदारानं राजीनामा दिला. यामुळे मराठा आंदोलनाची पहिली प्रतिक्रिया मराठवाड्यातच का उमटते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

त्यासाठी 4 महत्त्वाची कारणं आहेत, असं जाणकारांना वाटतं.

1. कुणबी प्रमाणपत्र नाही

विदर्भात आणि इतर अनेक ठिकाणी कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं, पण मराठवाड्याला त्याचा फारसा फायदा झाला नाही.

औरंगाबादमधले ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सांगतात, "60च्या दशकात पंजाबरावांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा 'कुणबी' आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्रं मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र 'आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का?' असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे, तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे."

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale

फोटो कॅप्शन, संजीव उन्हाळे

"विदर्भातल्या मराठा शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुखांच्या प्रयत्नानं कुणबी प्रमाणपत्र मिळालं. आज तिथल्या शेतकऱ्यांना सवलती मिळत आहेत, ते त्याचा लाभही घेत आहेत. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळालं नाही. त्यामुळे आता त्यांच्यात असलेली घुसमट या आंदोलनाच्या निमित्तानं बाहेर येत आहे," असं 'सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड सांगतात.

2. नामांतर चळवळ

"नामांतर चळवळीदरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. यामुळे आंबेडकरांचा 'शहराकडे चला' हा मंत्र ऐकत दलितांनी खेडी सोडली. शेतात राबणारा मजूर वर्ग गावातून निघून गेला. हे स्थलांतर एवढं मोठं होतं की मराठवाडयातील मराठ्यांच्या तुलनेत दलितांचं प्रमाण खूप कमी झालं. याचा परिणाम असा झाला की शेतातल्या कामांसाठी मजूर मिळेनासे झाले. परिणामी शेतीचं एकप्रकारे नुकसान झालं," उन्हाळे नामांतराच्या परिणामाबद्दल सांगतात.

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale

फोटो कॅप्शन, जयदेव डोळे

"निजामशाहीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी सर्व जाती एकत्रितपणे लढल्या होत्या. पण, आंबेडकरांचं स्वातंत्र्य लढ्यात contribution नाही असं म्हणत मराठ्यांनी नामांतर चळवळीला विरोध केला. त्यानंतर अनेक ठिकाणी दंगली घडल्या आणि अॅट्रॉसिटीचे सर्वांत जास्त गुन्हे परभणी, नांदेड इथल्या मराठयांवर नोंदवले गेले. त्यामुळे जातीजातींत फूट पडली, दलित कुटुंबांनी शहरांमध्ये स्थलांतर केलं आणि आता ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. पण त्या तुलनेत मराठा समाज गावाकडे राहून पारंपरिक व्यवसाय करत राहिला. आता मात्र या समाजात आपण एकाकी पडल्याची भावना निर्माण झाली आहे आणि त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे," जयदेव डोळे सांगतात.

3. शेतकरी अल्पभूधारक

"मराठवाड्यातील 90 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. यात मराठा शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्येही सर्वाधिक मराठा शेतकरी आहेत. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकऱ्या नाही. शिवाय आपल्याच समाजातील सत्ताधारी आपल्या काही कामाचे नाहीत, ते फक्त मतं मागायला येतात, अशी भावना मराठा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ते बहुसंख्येनं रस्त्यावर उतरत आहेत," असं संजय वरकड सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

संजीव उन्हाळे म्हणतात "मराठवाड्यातील शिक्षणात दर्जा नाही. मराठवाड्यात एकही मोठा उद्योग नाही. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसतोय. मराठवाड्यातल्या जिल्हा बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत, साखर कारखाने बंद पडले आहेत. यामुळे मराठवाड्यातील मराठा शेतकरी शेती, शिक्षण, रोजगार आणि सहकार या चारही गोष्टींमध्ये बॅकफूटवर आला आहे. त्यातून या समाजाच्या तरुणांमध्ये नैराश्य आलं आहे आणि ते आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत."

संजय वरकड

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bngale

फोटो कॅप्शन, संजय वरकड

तर, "मराठवाडा पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. इथल्या जमिनीला कस नाही आणि गोदावरी ही एकच मोठी नदी आहे. शिवाय जेवढं औद्योगिकीकरण झालं ते फक्त औरंगाबादमध्ये झालं. मराठवाडयात बाजारपेठ नाही, औरंगाबाद वगळता मराठवाड्यातल्या जिल्ह्यांत रोजगार उपलब्ध नाही आणि चांगल्या दर्जाचं शिक्षणही मिळत नाही. शिक्षणासाठी मराठवाड्यातील मुलं पुणे, मुंबई या शहरांत जातात. यामुळे शेती, सहकार आणि शिक्षणाच्या बाबतीत इथला मराठा समाज मागास राहिला आहे," असं ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी स्पष्ट केलं.

4. शिक्षणाचा अभाव

"कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणासाठी मोठी चळवळ उभी केली. मराठवाड्यात अशी चळवळ उभी राहिली नाही. निझामानं उर्दू शाळा सुरू केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केल्यामुळे मुस्लीम आणि दलित समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटलं. पण त्या तुलनेत शिक्षणाचे फायदे मराठा शेतकऱ्यांपर्यँत पोहोचले नाही. आपण मराठा आहोत, आपण कशाला नोकरी करायला हवी, असा विचार करत बहुसंख्य मराठा शेतकऱ्यांनी नोकरी नाकारली. पण कालांतराने कुटुंबाची विभागणी झाली, जमिनीचे तुकडे पडले, गरजा वाढत गेल्या आणि मराठा शेतकरी अल्पभूधारक झाला. आता हाताला काम नसल्यानं तो अस्वस्थ झाला आहे आणि आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे," उन्हाळे त्यांचं मत नोंदवतात.

मराठा

फोटो स्रोत, Getty Images

जयदेव डोळे सांगतात, "मराठा समाजातील लोकांचा एक पाय शेतीत आणि एक पाय शिक्षणात अशी संभ्रमावस्था झाली. मराठ्यांच्या तुलनेत ब्राम्हण आणि दलित समाजानं शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याचं महत्त्व जाणून घेतलं. त्याउलट मराठा समाजाला बदलतं वर्तमान आणि आर्थिक राजकारण कळलं नाही. आम्ही मराठा म्हणून महाराष्ट्र घडवणारे आहोत, याच कोशात मराठा समाज अडकून पडला आणि आज या समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आली."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)