नवऱ्याने बायकोला अडकवलं ड्रग्सच्या जाळ्यात

ड्रग्स

फोटो स्रोत, VIk Kanth

    • Author, रविंदर सिंग रॉबिन
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी अमृतसरहून

ड्रग्सच्या आहारी गेलेल्या एका नवऱ्याने त्याच्या बायकोलाही ड्रगच्या विळख्यात अडकवल्याची घटना पंजाबमधील अमृसरमध्ये घडली आहे. कारण काय तर त्याच्याकडचे पैसै संपले आणि बायकोच्या माहेरून ड्रग्ससाठी पैसै मिळतील या अपेक्षेने त्याने बायकोलाही ड्रग्सच्या गर्तेत ढकललं.

नातेवाईकांनी त्यांच्या वागणुकीतला बदल लक्षात आल्यामुळे हा सगळा प्रकार उजेडात आला आणि आता नवरा आणि बायको दोघंही पुनर्वसन केंद्रात उपचार घेत आहेत.

अमरजित सिंग (नाव बदललं आहे) व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहेत. ते पंजाब आणि राजस्थानच्या पट्टयात ट्रक चालवतात. त्यांच्या कामाच्या वेळा अनिश्चित आणि दीर्घ असतात. कामाच्या निमित्ताने ते अनेक ट्रक ड्रायव्हर्सना भेटायचे.

अमरजित यांना 12 ते18 तास ड्रायव्हिंग करावं लागायचं. हा थकवा घालवण्यासाठी त्यांनी गांजा घ्यायला सुरुवात केली. नंतर गांजाची जागा अफूने घेतली. ड्रायव्हिंग करताना सतर्क राहण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली.

ड्रग्स

फोटो स्रोत, Getty Images

"एकदा एका ड्रायव्हरने मला हेरॉईन दिलं. मी आधी नकार दिला पण त्याने खूपच आग्रह केला त्यामुळे मी घेतलं. त्या दिवशी हेरॉईनशी माझा पहिल्यांदा संपर्क आला. पण तो अतिशय आनंददायी अनुभव होता. मला वाटलं की, माझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि मी जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे," अमरजित आपल्या हेरॉईनच्या पहिल्या अनुभवाबद्दल सांगतात.

हळूहळू त्यांना हेरॉईनचं व्यसन लागलं आणि ते रोज 2 ग्रॅम हेरॉईन घेऊ लागलं. हेरॉईनच्या नादात त्यांच्याकडचे सगळे पैसे संपायला सुरुवात झाली.

बायकोसमोर ड्रग्सचं सेवन

आधी अमरजित इतर ट्रक ड्रायव्हरबरोबर किंवा कधी एकट्याने हेरॉईनचे डोस घ्यायचे. मात्र त्यांना इतकं व्यसन लागलं की ते बायकोसमोरही हेरॉईन घ्यायचे. त्यांची बायको पूजा (नाव बदललं आहे) त्यांच्या व्यसनामुळे चिडायची. तिने आपल्या नवऱ्याचं हे व्यसन सोडवण्याचा निर्णय घेतला.

त्या त्यांच्या पतीबरोबर बसून ड्रग्सचे दुष्परिणाम त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायच्या. पण काही काळानंतर त्यांनाच हेरॉईनचा गंध आवडायला लागला. नकळतपणे त्यांना ड्रग्स घेण्याची सवय लागली.

आणि एक दिवस पूजा यांनीसुद्धा अॅल्युमनिअम फॉईल पेपर घेतला, त्याला खालून जाळत हेरॉईन चा 'फुल डोस' घेतला.

"तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुर्दैवी दिवस होता. ड्रग्सच्या व्यसनामुळे माझ्या नवऱ्याची नोकरी गेली. आम्हाला आमच्या मुलांच्या शाळेची फी भरायलासुद्धा पैसै नव्हते. मला रोज हेरॉईन लागायचं," पूजा सांगत होत्या.

पूजा त्यांच्या भावाकडून नवऱ्यासाठी आणि स्वत:साठी पैसे उसने घेऊ लागल्या. एकदा त्यांचा भाऊ घरी आला. बहिणीच्या घरातील दोन्ही पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचं त्यांना लक्षात आलं. त्याचप्रमाणे बहिणीच्या वागणूकीत बदल झाल्याचं त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. भावाने दोघांनाही वैद्यकीय मदत घ्यायला सांगितलं.

कुत्र्यांचाही मृत्यू

त्यांचे दोन्ही कुत्रे पॅसिव्ह स्मोकर झाले असावेत असं पूजा यांच्या भावाला वाटलं. कारण ते दोघं ज्या खोलीतच हेरॉईन घ्यायचे त्याच खोलीत हे दोन्ही कुत्रे होते. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

ड्रग्स घेण्याच्या अनुभवाबद्दल पूजा सांगतात की जेव्हा त्या ड्रग्स घेत असत तेव्हा आयुष्य फार सोपं झालं आहे असं त्यांना वाटायचं. मात्र तो एक भास होता असं त्यांच्या लवकरच लक्षात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)