सौदी अरेबियाच्या महिला आजही पुरुषांशिवाय या ५ गोष्टी करू शकत नाहीत

नुकताच सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुकताच सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यात आला.

गेल्या काही महिन्यांमध्ये सौदी अरेबिया हा देश महिलांना स्वातंत्र्य देण्याच्या नव्या निर्णयांमुळे सर्वच माध्यमांच्या बातम्यांमध्ये झळकला आहे.

या देशात महिलांना आता फुटबॉलचे सामने पाहता येणार आहेत, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये सहभागी होता येणार आहे. (युद्धभूमीपासून मात्र त्यांना सध्या दूरच राहावं लागणार आहे). तसंच, इथे नुकतीच खास महिलांसाठी सायकल स्पर्धाही भरवण्यात आली होती.

पण सगळ्यांत जास्त चर्चेत राहिला निर्णय होता तो महिलांना वाहन चालवण्यासाठी परवानगी देण्याचा. 24 जून पासून ही आता महिला ड्रायव्हिंग सीटवर दिसल्या तर त्यात काही गैर नसेल.

नुकतंच इथे महिलांना पहिल्यांदाच वाहन चालवण्याचा परवाना देण्यात आला. तर महिला हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या महिलांच्या एका गटाला गेल्या महिन्यात सुरक्षा आणि स्थैर्याला धोका म्हणून अटक करण्यात आली.

अजूनही पुरुषसत्ताकच...

सौदीचे 32 वर्षांचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान इथले प्रमुख नेते असून त्यांनी या देशाला आधुनिक बनवण्याचा निर्धार केला आहे. मध्यममार्गी इस्लामकडे देशाची वाटचाल करण्यात येणार असल्याचं सूतोवाचही त्यांनी केलं आहे.

महिलांबाबत सध्या घेतलेले निर्णय हे 'विजन 2030' या संकल्पनेअंतर्गत आखलेल्या मोठ्या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

चॅथम हाऊस या थिंकटॅंकच्या वरिष्ठ संशोधक जेन किन्नीमाँट यांनी 2017 अखेरीस आपली काही निरीक्षणं मांडली. त्यांच्यामते या उचलेल्या पावलांचा आणि राजकारणातील उदारीकरणाचा तसा कोणताही ताळमेळ नाही.

सौदीचे ३२ वर्षीय राजपुत्र मोहम्मद बिन सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदीचे प्रमुख नेते 32 वर्षांचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आहेत.

महिलांच्या हक्कांवर बंधनं घालणाऱ्या प्रमुख देशांपैकी सध्या सौदी अरेबिया हा एक देश आहे. 'World Economic Forum 2017'च्या जागतिक लिंग तफावत निर्देशांकात सौदीचा 144 देशांपैकी 138वा नंबर लागतो.

या रुढीवादी विचारसरणीच्या देशात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महिला स्वतःहून करू शकत नाहीत. उदाहरणार्थ या पाच गोष्टी -

१. बँकेत खातं उघडणे

सौदी अरेबियातल्या महिला त्यांच्या पतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही बँकेत खातं उघडू शकत नाहीत. पुरुष पालकत्वाची प्रथा सौदीमध्ये असल्याने हा नियम या देशात पाळला जातो.

सौदीच्या स्थापनेपासूनच वहाबी पंथाकडे हा देश झुकलेला आहे. वहाबी पंथ हा इस्लामच्या कठोर अमलबजावणीला प्राधान्य देतो.

सौदीमध्ये मतदान करणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दोन वर्षांपूर्वी मतदानाचा अधिकार मिळाल्यावर सौदीतल्या महिलांनी पुरुषांप्रमाणे मतदानाला हजेरी लावली.

वहाबी पंथानुसार, प्रत्येक महिलेला पुरुष पालक असणं आवश्यक असून तो स्वतः त्या महिेलेसाठीचे महत्त्वाचे निर्णय घेईल. या पालकत्वाच्या प्रथेची खूप समीक्षा करण्यात आली आहे.

Human Rights Watch या संस्थेनं देखील ही समीक्षा केली असून, या प्रथेमुळे महिला या कायद्याच्या दृष्टीनं अजूनही लहानच असल्याचं भासत आहे, ज्या स्वतःसाठीचे महत्त्वाचे निर्णयही घेऊ शकत नाही.

२. परदेश प्रवास

हे या पालकत्वाच्या प्रथेचं अजून एक उदाहरण आहे. देश सोडून जाण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्यासाठी सौदीमधल्या महिलांना त्यांच्या पुरुष पालकाची परवानगी घ्यावी लागते.

सौदीमधल्या विमानतळावर काही महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, परदेश प्रवासासाठी सौदीतल्या महिलांना पुरुष पालकाची परवानगी लागते.

पालकाची परवानगी घेण्याची ही प्रथा महिलांच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या घटनांशीही जोडली गेली आहे. म्हणजे काम करणं, शिक्षण आणि काही आरोग्य सोयीसुविधा मिळवण्यासाठीही महिलांना पुरुषांची परवानगी घ्यावी लागते.

हा पुरुष पालक महिलेचा नवरा, वडील, भाऊ किंवा एखादा पुरुष नातेवाईक, आणि विधवा असल्यास त्या महिलेचा मुलगाही असू शकतो.

३. लग्न करणे किंवा घटस्फोट घेणे

विवाह करण्यासाठी आणि घटस्फोट घेण्यासाठीही इथल्या महिलांना पुरुष पालकाची परवानगी घ्यावी लागते.

तसंच इथल्या महिलांना घटस्फोटानंतर मुलगा (7 वर्षांपेक्षा मोठा) आणि मुलगी (9 वर्षांपेक्षा मोठी) असेल तर त्यांचा ताबा घेण्यासाठी मोठा त्रास सहन होतो. आपल्या पुरुष नातेवाईकांच्या मेहेरनजरेवर इथल्या महिला अवलंबून आहे.

पतीसोबत सोने खरेदी करताना सौदीमधली महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इथल्या महिलांचं आपल्या पुरुष नातेवाईकांच्या मेहेरनजरेवर पुढचं आयुष्य अवलंबून आहे.

दुसरीकडे पुरुष पालकांना महिलांनी मागितलेली कोणतीही परवानगी धुडकावण्याचा अधिकार आहे.

महिलांना त्यांचा पगारही पालकाकडे द्यावा लागतो. त्यांना लग्न करण्यापासून अडवलं जातं किंवा त्यांचं लग्नही जबरदस्ती लावून दिलं जातं, यावरून महिलांचा छळ होत असल्याच्या तक्रारीही सौदीतल्या महिलांनी केल्या आहेत.

४. पुरुष सहकऱ्यासोबतची कॉफी

सौदीमध्ये प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी दोन वेगवेगळे काउंटर असतात आणि त्यामध्ये भिंती असतात.

मॅकडॉनल्डमध्ये खाद्यपदार्थ स्वतंत्रपणे घेताना सौदीतल्या महिला आणि पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इथल्या रेस्टॉरंटमध्ये महिला आणि पुरुषांसाठी दोन स्वतंत्र विभाग आहेत.

त्यामुळे कुटुंब आणि एकटे पुरुष यांना दोन वेगवेगळ्या विभागात जाऊन बसावं लागतं. तर महिलांना केवळ कुटुंबांसाठी राखीव असलेल्या जागेतच प्रवेश मिळतो.

५. कपडे कोणते घालायचे?

लोकांमध्ये वावरताना महिलांना त्यांचा चेहरा झाकण्याची गरज नसते. पण डोक्यापासून पायापर्यंत अंग मात्र झाकलेलं असावं लागतं. या कपड्याला अबाया म्हणतात, जो काहीसा सैल आणि अंगभर असतो.

ज्या महिला हे नियम पाळणार नाहीत, त्यांना धार्मिक व्यवस्थापन पाहणाऱ्या पोलिसांकडून दंड केला जातो.

शॉपिंग सेंटरसारख्या काही ठराविक ठिकाणीच महिला त्यांचा अबाया पूर्णतः काढू शकतात.

अबाया परिधान करून चालणाऱ्या महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिलांना समाजात वावरताना पूर्ण अंग झाकलेला अबाया हा वेश परिधान करावा लागतो.

यावर्षी इथल्या एका धार्मिक व्यवस्थापनाशी निगडित व्यक्तीनं सांगितलं की, "महिलांना अबाया परिधान करण्याची आवश्यकता नाही."

या वक्तव्यानं सौदीतल्या कायद्याचं भविष्य व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

मूळ सौदीच्या नसलेल्या महिलांसाठी हे नियम अजून शिथिल होणार आहेत. त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे परिधान करण्याची मुभा आहे. त्या जर मुस्लीम नसतील तर त्यांना त्यांचे केस न झाकण्याचीही परवानगी आहे.

व्हीडिओ कॅप्शन, सौदी स्त्रिया: अजूनही पुरुषसत्ताक पद्धतीत अडकलेल्या आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)