धर्माच्या नियमांना खेळात जागा नाही : सौम्या स्वामीनाथन

व्हीडिओ कॅप्शन, इराणममध्ये होणाऱ्या 'एशियन नेशन्स कप चेस चँपियनशिप' खेळायला तिनं नकार दिला आहे.
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पुण्याची 29 वर्षांची महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन सध्या चर्चेत आहे. कारण तिनं कोणत्या जिंकलेल्या स्पर्धेचं नाही आहे, तर एका स्पर्धेत खेळायला तिनं दिलेल्या नकाराचं आहे.

इराणमध्ये 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 'एशियन नेशन्स कप चेस चँपियनशिप'मध्ये खेळायला तिनं नकार दिला आहे. कारण इराणमध्ये कायद्यानं महिलांना हेडस्कार्फ वापरून डोकं झाकण्याची सक्ती आहे. पण केवळ इराणच्या नागरिक असलेल्या महिलांनाच नव्हे तर बाहेरच्या देशांतून येणाऱ्या महिलांनाही हा नियम पाळावाच लागतो.

पण सौम्याला हा तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो आहे.

हेडस्कार्फ, बुरखा, हिजाब घालायचं की नाही, हे स्वातंत्र्य खेळाडूंना असायला हवं आणि खेळ ही धार्मिक नियम आणण्याची जागा नाही, अशी ठाम भूमिका सौम्याने घेतली आहे. तिनं तिची भूमिका फेसबुक पोस्टवरही लिहिली आहे.

सौम्याच्या या निर्णयाची केवळ भारतीय खेळजगतातच नव्हे तर जागतिक पातळीवर चर्चा होते आहे. 'बीबीसी मराठीच्या' मयुरेश कोण्णूर यांनी तिला तिच्या या निर्णयाबद्दल अधिक बोलतं केलं.

प्रश्न : हेडस्कार्फ घालण्यास सक्ती हे इराणमध्ये न खेळण्याचं एकमेव कारण होतं?

सौम्या : हो. एकच कारण होतं की मला हेडस्कार्फ जबरदस्तीनं घालायचा नव्हता. इतर कोणी हेडस्कार्फ परिधान केला तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण जबरदस्तीनं मला तो घालायचा नव्हता. म्हणून मी इराणला न जाण्याचा निर्णय घेतला.

सौम्या स्वामीनाथन

फोटो स्रोत, Soumya Swaminathan

फोटो कॅप्शन, सौम्या स्वामीनाथन

प्रश्न : 'खेळ आणि धर्म असे एकत्र करता येणार नाही' असं तू तुझ्या पोस्ट मध्ये म्हणतेस. तुला नेमकं काय म्हणायचंय?

सौम्या : मी सगळ्या धर्मांचा समान आदर करते. कोणत्याही धार्मिक स्थळांवर जायचं असेल तर मी तिथल्या योग्य मर्यादांचं पालनही करते. पण खेळामध्ये मात्र त्याला काही जागा नाहीये. अर्थात माझ्या स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होतो. कारण जबरदस्तीनं मी काही का करावं, हा खरा प्रश्न आहे.

प्रश्न : खेळांमध्ये महिलांसाठी असलेले ड्रेस कोड हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. अनेक खेळाडू उघडपणे बोललेही आहेत. तुझं त्याबद्दल मत काय आहे?

सौम्या : खेळांमध्ये काही ड्रेस कोड असतात. पण ते खेळाच्या अनुषंगानं असतात. आम्ही त्यांचं पालन करतो. पण धार्मिक अंगानं ते का असावेत हा प्रश्न आहे. खेळाडू तिथं खेळण्यासाठी गेले आहेत. त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व ते करताहेत. खेळासंबंधित जे ड्रेस कोड आहेत ते आम्ही नक्की फॉलो करू.

बुद्धिबळ

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / AFP / Getty Images

प्रश्न : सौदी अरेबियामध्येही असे नियम आहेत. पण त्या देशानं बाहेरच्या खेळाडूंसाठी ते शिथिल केले होते. तुझी भूमिका काय?

सौम्या : मी आतापर्यंत 30 देशांमध्ये खेळण्यासाठी गेले आहे आणि कोणत्याही देशात मला असं अनाकलनीय नियम फॉलो करावे लागले नाहीत. हे चांगलं झालं की सौदी अरेबियानं गेल्या वर्षी अपवाद केला होता आणि असे अनेक देश आहेत जिथं असे नियम नाहीत. इराणमध्येही खेळांसाठी हे असे नियम बाजूला केले तर खूप चांगलं होईल.

प्रश्न : तुझी ही भूमिका नेमकी कशासाठी आहे? खेळासाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी की धार्मिक विचारांसाठी?

सौम्या : खेळाडूंचे अधिकार टिकवले गेले पाहिजेत, असं माझं मूळ म्हणणं आहे. ते करण्यासाठी तुम्ही काहीही केलंत तर ते चांगलं होईल. तेवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही.

हा व्हीडिओ पाहिलात का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सोंगट्यांना हात न लावता खेळा बुद्धिबळ

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)