औरंगाबाद : 'दंगलीस जबाबदार कोण? हिंदू-मुस्लीम वाद की आर्थिक-राजकीय व्यवहार'

दंगल

फोटो स्रोत, Ameya pathak/bbc

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली त्याला आठवडा झाला. तो विषय अजूनही संपलेला नाही. शनिवारी शिवसेनेनं हिंदू शक्ती मोर्चाही काढला. त्यानिमित्तानं औरंगाबादमधली अस्वस्थता नेमकी कशामुळे आहे, हे जाणून घेण्यासाठी केलेली हा प्रयत्न.

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. गेल्या शुक्रवारी रात्री कशावरून वाद झाला आणि नेमकी दंगल का उसळली, याची सध्या चौकशी होत आहे.

औरंगाबादमध्ये धार्मिक तेढ आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होणं, हे काही नवीन नाही. या तणावाचं मूळ मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळातील आहे, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे.

रझाकार कोण होते?

"15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला पण मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता. भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा पर्याय संस्थानांना देण्यात आला पण हैदराबादच्या निजामांनी दोन्ही देशांमध्ये सामील होण्याऐवजी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. काहीही करून आपल्या हाती सत्ता राहावी असं निजामाला वाटत होतं. भारतावर दबाव टाकण्यासाठी निझामाने रझाकार या संघटनेची स्थापना केली," अशी माहिती औरंगाबाद येथे राहणारे लेखक आणि इतिहासाचे अभ्यासक रफत कुरेशी यांनी दिली.

"कासिम रिझवी हे या संघटनेचे नेते होते. या संस्थेनी आपलं म्हणणं मांडण्याऐवजी हिंसेचा आणि बळाचा वापर केला. मराठवाड्यातील लोकांनी देखील त्यांचा विरोध केला. त्यातून संघर्षाला सुरुवात झाली. शेवटी, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय लष्कर पाठवून रझाकारांना नियंत्रणात आणलं. भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन पोलोमध्ये कासिम रिझवी यांना अटक करण्यात आली. 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये विलीन झाला," असं कुरेशी सांगतात.

"सर्वच मुस्लीम रझाकारांच्या विचारधारेशी सहमत नव्हते. सामान्य मुस्लिमांना रझाकारांविषयी सहानुभूती नव्हती. पण कालांतराने सर्वच लोक या गोष्टी विसरले आणि दोन समुदायातली दरी वाढली," असं कुरेशी सांगतात.

'1986च्या आधी औरंगाबाद शांत होतं'

"1948 ते 1986 या काळात औरंगाबाद शहर शांत होतं. 1986नंतर दोन समुदायांमध्ये तेढ वाढली," असं मत राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ज्ञ डॉ. जयदेव डोळे यांनी मांडलं.

"औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा होत असत. त्यामध्ये ते मुस्लिमांवर कडाडून टीका करत असत. काँग्रेसकडून मुस्लिमांचं लांगूलचालन होत आहे असा त्यांच्या भाषणाचा सूर असे," असं डॉ. जयदेव डोळे यांचं म्हणणं आहे.

"1988मध्ये शिवसेनेला महानगरपालिकेत 27 जागा मिळाल्या होत्या, त्याचं बीज हे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणात आहे," असं डोळे सांगतात.

याबाबत बीबीसीनं शिवसेनेची बाजू जाणून घेतली. "बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंचं संघटन केलं हे सत्य आहे. जर एखादा समुदाय आक्रमक होत असेल तर त्या विरोधात एकजूट होण्यामध्ये गैर काहीच नाही," असं मत शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

"1986ला औरंगाबादमध्ये शिवसेना स्थापन झाल्यापासून आम्ही स्थानिक प्रश्न मांडले. लोकांना ते पटले त्यामुळेच शिवसेनेला महानगर पालिकेमध्ये 27 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेना वाढली," असं दानवे सांगतात.

दंगलीची कारणं आर्थिक किंवा राजकीय

औरंगाबादमध्ये होणाऱ्या दंगली या वरवर धार्मिक समुदायातल्या दंगली वाटत असल्या तरी या दंगलींची कारणं आर्थिक किंवा राजकीय असतात, असं काही अभ्यासकांचं मत आहे.

"1986ला दंगल भडकली तिची सुरुवात बाजारातील दुकानदारांमध्ये झालेल्या वादविवादातूनच झाली होती," असं औरंगाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी सांगितलं.

"शहागंज भागात तेव्हादेखील दुकानासमोर हातगाड्या लावल्या जात असत. बहुसंख्य हातगाड्या या मुस्लीम व्यावसायिकांच्याच मालकीच्या होत्या. त्यामुळे पाठीमागे असलेली हिंदूंची दुकानं चालत नव्हती. त्यातून वाद निर्माण होऊन भांडणं होत असत. त्यावेळी झालेली दंगल ही व्यावसायिक कारणामुळं झाली होती. दंगलीच्या पाठीमागे व्यवसाय हेच मुख्य कारण आहे," असं उन्हाळे यांचं निरीक्षण आहे.

"हिंदू ओबीसी आणि मुस्लिमांचे 'व्हेस्टेड इंटरेस्ट' (हितसंबंध) एकच आहेत. त्यांच्यात असणाऱ्या स्पर्धेचं पर्यवसन भांडणात आणि नंतर दंगलीत होताना दिसतं," असं उन्हाळे यांचं मत आहे.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

औरंगाबादमध्ये होणाऱ्या दंगलींना राजकीय कारणं देखील असतात असं उन्हाळे सांगतात.

प्रस्थापितांविरोधातला पक्ष म्हणून शिवसेनाचा उदय

"1986 आधी शहरावर काँग्रेसच्या उच्चवर्णीय नेत्यांची आणि उच्चशिक्षित मुस्लीम नेत्यांची सत्ता होती. त्यामुळे त्यांना प्रतिक्रिया म्हणून शिवसेनेचा उदय झाला. एकगठ्ठा मतदान मिळावं म्हणून त्यांनी मुस्लीम आणि दलितांचा अनुनय केला त्याचाच फायदा शिवसेनेला झाला," असं उन्हाळे यांनी सांगितलं.

"1988 ला औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यात शिवसेनेला 27 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या होत्या. मुस्लीम लीगच्या साथीनं त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर शहरात संघर्ष झाला होता," असं उन्हाळे सांगतात.

"गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेसच्या राजकारणाला शिवसेनेनी उत्तर दिलं तसं शिवसेनेच्या राजकारणाला MIMनं उत्तर दिलं," असं उन्हाळे सांगतात.

औवेसी

फोटो स्रोत, Pti

राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष

"आजही मतदार निवडणुकीच्या वेळी मतदान करताना आपल्याच जाती-धर्माच्या उमेदवारांची निवड करताना दिसतात. त्यामुळे शहरात एका वॉर्डात शिवसेना तर शेजारच्या वॉर्डात MIMचा उमेदवार दिसतो. आपल्या धर्माचा उमेदवार निवडून आला तर आपण सुरक्षित राहू असा विचार उमेदवार करतात," असं उन्हाळे सांगतात.

औरंगाबाद

फोटो स्रोत, BBC/AmeyaPathak

फोटो कॅप्शन, औरंगाबादमध्ये शनिवारी काढण्यात आलेला हिंदू शक्ती मोर्चा.

"दोन वेगवेगळे समुदाय आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यातूनच या दंगली घडत आहे," असा चिंताजनक सूर औरंगाबाद टाइम्सचे व्यवस्थापकीय संपादक शाकेब खुस्रो यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)