जे. डे हत्याकांड : छोटा राजन आणि इतर 8 दोषींना जन्मठेपेची शिक्षा

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं पत्रकार जे. डे हत्याकांड प्रकरणी छोटा राजन आणि इतर आठ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पत्रकार जिग्ना व्होरा आणि जोसेफ पॉलसन यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष मकोका न्यायालायानं आज दुपारी छोटा राजनसह 10 जणांना हत्या आणि हत्येचा कट रचल्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. तर दोन जणांची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे.

दोषी ठरवलेल्या 10 आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे तर एकाला फरार घोषीत करण्यात आलं आहे.

...म्हणून छोटा राजन दोषी

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या संदर्भात सांगितलं की, "एकंदर बारा आरोपींवर खटला चालला. बारा आरोपींपैकी दहा जणांना दोषी धरण्यात आलं आहे. त्यांच्यावर खुनाचा आणि संघटित टोळीच्या गुन्हेगारीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपी क्रमांक एक, सतीश कालिया याच्यावर हत्यारविरोधी कायद्या अंतर्गतही गुन्हा सिद्ध झाला आहे."

"छोटा राजनच्या विरोधात फिर्यादी पक्षानं जो पुरावा सादर केला त्यात महत्त्वाचे दोन पुरावे होते. छोटा राजनचं मनोज शिवदासानी नावाच्या व्यक्तीशी संभाषण होत होतं, मृत आरोपी विनोद आसरानी (विनोद चेंबूर) याच्या तब्येती संदर्भात झालेलं संभाषण पोलिसांनी इंटरसेप्ट केलं. ते संभाषण या गुन्ह्याचा पुरावा म्हणून वापरण्यात आलं. तिहार जेलमध्ये असताना छोटा राजनचा सॅम्पल व्हॉईस घेण्यात आला होता. त्या आवाजाची या संभाषणाशी तुलना करण्यात आली त्यावेळी तो आवाज एकच आहे हे फिर्यादी पक्षानं सिद्ध केलं," असं घरत म्हणाले.

"दुसरा पुरावा म्हणजे छोटा राजननं परदेशात असताना काही वरिष्ठ पत्रकारांना, टीव्ही चॅनेल्सना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली होती. जे डेंची हत्या मी केली आणि मला त्याला का मारावं लागलं. त्यानं असं बोलावं असा कोणताही दबाव त्याच्यावर नव्हता, त्याच्यावर कोणीही जबरदस्ती केली नव्हती. त्यानं स्वतःहून फोन करून सांगितलं. हा कबुलीजबाब त्यांच्या विरुद्ध गेला असावा," असंही घरत यांनी स्पष्ट केलं.

तर, "जिग्ना व्होरा यांच्यासंदर्भात आम्ही सादर केलेला पुरावा का ग्राह्य धरला गेला नाही याचं कारण निकालाची प्रत हाती येईल तेव्हाच स्पष्ट होईल," असं घरत म्हणाले.

आघाडीचे क्राईम रिपोर्टर होते जे. डे

मुंबईतल्या मिड-डे वृत्तपत्राचे वरिष्ठ क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय डे हे 'जे. डे' या टोपणनावानंही ओळखले जायचे. 11 जून 2011 रोजी पवईतल्या त्यांच्या निवासस्थानाजवळच त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

जे डे मोटरसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले होते. या हत्येनंतर महाराष्ट्रात पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मुंबईतील पत्रकारांनी सरकारकडे अधिक सुरक्षिततेची मागणीही केली होती.

विशेष म्हणजे जागतिक पत्रकार अभिस्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच जे डे यांच्या हत्येप्रकरणी निकाल आला आहे.

ज्योतिर्मय डे यांची गणना मुंबईतल्या आघाडीच्या क्राईम रिपोर्टर्समध्ये केली जायची. त्यांनी इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्तान टाइम्ससारख्या आघाडीच्या वृत्तपत्रांसाठीही काम केलं होतं. मिड-डे मध्ये ते शोधपत्रकारिता संपादक म्हणून काम करत होते.

2011 साली हत्या झाली, तेव्हा ज्योतिर्मय डे 56 वर्षांचे होते. डे यांची हत्या आणि त्यानंतर त्याप्रकरणी आणखी एक पत्रकार जिग्ना व्होरा यांना झालेली अटक यामुळे देशभरातील पत्रकारांना मोठा धक्का बसला होता.

त्या काळी प्रसारीत झालेल्या वृत्तांनुसार मृत्यूपूर्वी डे यांनी मुंबईत भेसळयुक्त पेट्रोल विकणाऱ्या 'ऑईल माफिया'विषयी बातम्या लिहिल्या होत्या.

कोण आहेत आरोपी

डे यांच्या हत्येप्रकरणी 12 आरोपींमध्ये कथित अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे अर्थात छोटा राजन आणि मुंबईतील पत्रकार जिग्ना व्होरा या दोघांचा समावेश आहे. जिग्ना व्होरा या त्यावेळी 'द एशियन एज' या वृत्तपत्राच्या डेप्युटी ब्युरो चीफ होत्या.

या खटल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा राजनवर डे यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप आहे. तर व्होरा या त्यादरम्यान राजनच्या संपर्कात होत्या आणि त्यांच्यावर डे यांच्या हत्येसाठी राजनला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

छोटा राजन सध्या नवी दिल्लीच्या तिहार मध्यवर्ती कारागृहात आहे. 2015 साली इंडोनेशियातल्या बालीमधून त्याचं प्रत्यार्पण केलं जाण्यापूर्वी 20 वर्षं तो फरार होता. छोटा राजनवर डे यांच्या हत्येसह किमान 17 हत्यांचा आरोप आहे.

त्याशिवाय छोटा राजनवर खंडणी, ड्रग्सची तस्करी आणि बेकायदा हत्यारं बाळगणे आणि त्यांचा वापर करण्याचाही आरोप आहे.

मुंबईत लहानाचा मोठा झालेला छोटा राजन लहानमोठे गुन्हे करत संघटित गुन्हेगारीमधला म्होरक्या बनला होता.

जे डे यांच्या हत्येप्रकरणी रोहित थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतिश कालिया (शार्पशूटर), अरूण जनार्दन डाके, सचिन सुरेश गायकवाड, अनिल भानुदास वाघमोडे, नीलेश नारायण शेंडगे ऊर्फ बबलू, मंगेश दामोदर आगवणे, दीपक सिसोदिया, जोसेफ पॉलसन आणि विनोद आसरानी ऊर्फ विनोद चेंबूर यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते.

विनोद चेंबूर हा डे यांचा खबरी म्हणून काम करायचा आणि त्यानंच हल्लेखोरांना जे-डेंची ओळख पटवून दिली होती असा आरोप होता. पण 2015 साली विनोद चेंबूरचा हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक मृत्यू झाला.

तपास आणि खटला कसा पुढे सरकला?

ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कायद्याखाली तपास केला. छोटा राजनच्या अटकेनंतर सीबीआयही तपासात सहभागी झालं होतं.

मुंबईतील विशेष मकोका न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. एकूण 155 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, पण या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)