अबब... आंध्र प्रदेशात एकाच दिवशी 36,000 विजांचं तांडव

वीज, नैसर्गिक आपत्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंध्र प्रदेशात विजांचा तडाखा बसला

आंध्र प्रदेशात मंगळवारी निसर्गाचा प्रकोप अनुभवायला मिळाला. वातावरणात झालेल्या अभूतपूर्व बदलांमुळे या राज्यात तब्बल 36,000 हून अधिक विजा पडल्याचं स्पष्ट झालं आहे. अवघ्या 13 तासात 36,749 विजा जमिनीवर पडल्याची अविश्वसनीय आकडेवारी समोर आली आहे.

हा आकडा अतिरंजित वाटू शकतो, मात्र हवेच्या दाबांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यानं आंध्र प्रदेशात विजांचं तांडव पाहायला मिळालं. आंध्र प्रदेश राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांनी या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

विजेच्या तडाख्यात नऊजणांनी जीव गमावला आहे. देशात मान्सूनच्या हंगामात विजा कडाडणं, गडगडणं सर्वसामान्य आहे, मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणावर विजा पडणं दुर्मीळ आहे.

पावसाचा हंगाम जूनमध्ये सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. आंध्र प्रदेशात पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी विजांचा कडकडाट होतो असं आंध्र प्रदेशच्या आपत्कालीन केंद्राचे प्रमुख किशन संकू यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात याच सुमारास वीज पडण्याच्या साधारण 30,000 घटना घडल्या होत्या.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वीज कडाडणे तसंच वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

वीज पडण्याच्या घटना का वाढत आहेत?

आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यावर वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. या भागातून तुफान पाऊस पडतो.

"या भागात वीज पडण्याच्या घटना घडतातच मात्र यंदा यामध्ये वाढ झाली आहे. अरबी समुद्रातून येणारे थंड वारे आणि उत्तरेकडून येणारे उष्ण वारे यांच्या एकत्रीकरणामुळे वातावरणात बदल घडून येऊन मोठ्य़ा प्रमाणावर ढग निर्माण झाले. एरव्हीच्या तुलनेत या ढगांची संख्या खूप असल्याने वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली," असं संकू यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "पाण्यानं भरलेल्या ढगांनी 200 किलोमीटरपर्यंतचा परिसर व्यापला होता. साधारणत: अशा ढगांची व्याप्ती 15-16 किलोमीटरपर्यंत असते. म्हणूनच मंगळवारी विजांनी दिलेला तडाखा दुर्मीळ आहे."

वीज पडल्यानं किती मृत्यू होतात?

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2005 नंतर वीज पडण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी सुमारे 2,000 नागरिकांनी जीव गमावला आहे.

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशात वीज पडण्याच्या घटनांमुळे 2016 मध्ये 93 लोकांचा मृत्यू झाला.

विकसित देशांच्या तुलनेत वीज पडण्याच्या घटनांमुळे जीव गमावण्याचं प्रमाण भारतात तुलनेनं खूप जास्त आहे. अमेरिकेत वीज पडून दरवर्षी 27 लोकांचा मृत्यू होतो.

वीज पडण्यासंदर्भात विश्वासार्ह अशी सार्वजनिक उद्घोषणेची यंत्रणा नसल्यानं मृत्यूचं प्रमाण वाढतं. अन्य देशांच्या तुलनेत, भारतात बंदिस्त क्षेत्राबाहेर काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. म्हणूनच वीज पडण्याच्या घटनांचा थेट परिणाम या लोकांवर होतो.

वीज पडण्याच्या धोक्यासंदर्भात नागरिकांना आम्ही पुरेशी माहिती दिली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून व्हॉट्सअप तसंच टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांना संदेश देण्यात आले तसंच टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या. विजांचं तांडव सुरू असताना लोकांनी शक्यतो घरातच राहावं यादृष्टीनं आम्ही उपाययोजना केल्या, असं संकू यांनी सांगितलं. मात्र शेतात काम करणाऱ्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, कारण त्यांच्याकडे काम करताना फोन नसतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल वापरणाऱ्यांसाठी सतर्कतेचा मेसेज मिळण्यासाठी सबस्क्रिप्शन व्यवस्था कार्यान्वित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विजांचं तांडव सुरू असताना काय करावं?

  • एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये किंवा गाडीत आश्रय घ्या.
  • खुल्या जागांपासून दूर जा. उंच टेकडीसदृश जागेपासून दूर व्हा.
  • जवळपास जाण्यासाठी जागा नसेल, तर पाय जवळ घेऊन खाली बसा. हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोकं खालच्या दिशेनं झुकवा.
  • झाडांखाली आश्रय घेऊ नका.
  • तुम्ही पाण्याजवळ असाल तर लवकरात लवकर किनाऱ्याजवळ जा.

स्रोत- रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ अॅक्सिडंट्स

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त