यंदाची 'अक्षय्य तृतीया' सोने खरेदीसाठी सर्वांत महागडी आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, देविना गुप्ता
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सोनं खरेदीच्या बाबतीत भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. दरवर्षी 'अक्षय्य तृतीयेच्या' दिवशी ही मागणी वाढत जाते. कारण भारतात अक्षय्य तृतीयेचा दिवस सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. पण गेल्या आठवड्यातले कल पाहता यंदाची 'अक्षय्य तृतीया' सोने खरेदीसाठी सर्वांत महागडी ठरू शकते.
यंदा 11 एप्रिललाच 24 कॅरेट सोन्याचा दर 31,524 रुपयांच्या पुढे गेला. गेल्या मंगळवारी हा दर थोडा खाली आला होता. पण तरी खरेदीदार या वेळी सोने खरेदीसाठी गर्दी करतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
निर्मल बँगच्या कमोडिटीज आणि करन्सी रिसर्च विभागाचे प्रमुख कुणाल शहा बीबीसीला सांगतात, "पत धोरणाबाबतची अनिश्चितता, या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेलं भूराजकीय संकट, पाश्चात्य अर्थव्यवस्थांमध्ये अगामी काळात महागाई येण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मार्च 2018 च्या शेवटी जागतिक बाजारपेठेत सोन्याचा दर 1450 डॉलरपर्यंत होता आणि मार्च 2019 ला हा दर 1600 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे."
सोन्याच्या दरात वाढ का?
गुंतवणुकीसाठी सोनं हा नेहमी सोपा पर्याय मानला जातो. यंदाचं वर्षं हे अनिश्चिततांनी घेरलेलं आहे. कारण व्यापाराच्या आघाडीवर अमेरिका चीनशी युद्ध करण्याच्या बेतात आहे. तसंच सीरियातील तणावही वाढीस लागल्याने जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे गुंतवणूकदार स्टॉक मार्केटपासून काहीसे दूर चालले आहेत. हे गुंतवणूकदार सोन्याचा पर्याय निवडत असल्याने जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढता आहेत आणि याचा परिणाम भारतासारख्या देशांवर होत आहे.
भारताचं नेमकं स्थान कुठे आहे?
2016 मध्ये नोटाबंदी झाल्यानंतर आणि गेल्या वर्षी वस्तू आणि सेवा कराची (GST) अंमलबजावणी झाल्यानंतर सोन्याच्या मागणीला फटका बसला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत या मार्च महिन्यात सोन्याची आयात 40 टक्क्यांनी घसरून 2.4 अब्जांवर आली आहे. याचा सोने उद्योगाला फटका बसला आहे.
पण आता सोन्याची मागणी पुन्हा वाढेल असा सकारात्मक विचारप्रवाह सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षी चांगला मान्सून झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली. देशातल्या सोन्याच्या एकूण मागणीत ग्रामीण भागाचा वाटा दोन-तृतीयांश आहे.
यापूर्वीच्या अक्षय्य तृतीयेला काय कल होते?
आजवरच्या अक्षय्य तृतीयेच्या सणांवरून सोन्याचे दर कसे वाढत गेले याचा अंदाज येऊ शकेल. 2010 मध्ये अक्षय्य तृतीयेला 10 ग्रॅम सोन्यासाठी 18,167 रुपये मोजावे लागत होते. पण गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला एवढ्याच सोन्यासाठी 29,860 रुपये मोजावे लागले.
आतापर्यंत होऊन गेलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचे सोन्याचे दर पुढीलप्रमाणे -
तसंच, सोन्याच्या बाबतीत अजून गोष्ट बोलली जाते की, तुम्ही एकदा सोनं खरेदी केलं असेल तर तुम्हाला तुमच्या ठेवींमध्ये वाढ झाल्यासारखी वाटते.
ही सोने खरेदीची उत्तम वेळ आहे का?
याबाबत तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत. कॉमट्रेण्ड्झ रिसर्च या संस्थेचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन सांगतात की, "सोन्याचा दर जर 30,000च्या वर गेला असेल तर अशा वेळी सोनं विकण्याकडे लोकांचा कल असतो. पण सध्या सोन्याच्या किमती स्थिरावत आहेत. माझ्या मते या वर्षी अखेरीस सोन्याच्या किमती वाढतील. त्यामुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यास हरकत नाही."
तर, AVP कमोडीटी रिसर्च, SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या वंदना भारती सांगतात, "सध्याचं या व्यापारातील वातावरण वेगळं आहे. त्यामुळे मी काही महिने थांबवण्याचा सल्ला देईन. सप्टेंबर-ऑक्टोबर महिना ही सोने खरेदीसाठी चांगली वेळ असून या काळात सोन्याच्या किमतीत 5 ते 6 टक्क्यांचा फरक पडलेला असेल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








