‘हो मी नागा आहे आणि याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही’

नागालँड हे पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक राज्य आहे. या राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. बीबीसीच्या शालू यादव आणि शरद बढे यांनी तिथल्या लोकांशी त्यांना सामोरं जाव्या लागत असलेल्या भेदभावाबद्दल त्यांची मतं जाणून घेतली.
अले मेथा, 35
मी अनेक शहरांत काम केलं आहे. मी नागालँडची आहे असं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते म्हणतात, "अच्छा म्हणजे तू कुत्रा खात असशील, तू नक्की साप खात असशील." ते म्हणतात, "हे अतिशय हिंसक आहे."
ते म्हणतात, "तुम्ही डुकराचं मांस कसं काय खाऊ शकता, हे अतिशय किळसवाणं आहे."
"मी डुकराचं मांस खाते हे मी नाकारत नाही. ते अतिशय चविष्ट असतं."
मग मला असं लक्षात आलं की दुर्लक्ष केल्यामुळेच लोक आम्हाला पारखत असतात. म्हणून मी त्यांना आमच्या आयुष्याबद्दल आणि संस्कृतीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते.
आणि हो मी कुत्र्याचं मांस खात नाही. मला ते फार आवडतात. मी त्यांचं मांस का खाऊ?
काही लोक इतर संस्कृतीचा अभ्यास करण्यास उत्सुक असतात. ते प्रयोग करायला तयार असतात. काही भारतीयांनी ईशान्य भारताचा दौरा केल आहे आणि त्यांनी या क्षेत्राचा अभ्यास केला आहे. आमच्या पाहुणचाराचं ते कौतूक करतात.
मी भारतीय नाही, असं मला कधीच वाटलं नाही. नागालँड हे भारताच्या नकाशावर आहे.
हो मी नागा आहे आणि याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही. इतरत्र राहणाऱ्यांना जे भारताबद्दल वाटतं तेच मला वाटतं.
मला हे सांगायला आवडत नाही, पण ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांशी भारतीय लोक भेदभाव करतात.
कामाच्या ठिकाणीसुद्धा आमच्याबरोबर भेदभाव होते. मी दिल्लीत एका कंपनीत काम केलं आहे. जे लोक माझ्यापेक्षा कमी शिकलेले आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलं नाही त्यांना बढती मिळाली.
पण माझा स्वत:वर विश्वास होता. कारण मी जशी आहे तशी आहे. शेवटी मला माझ्या कामाचं फळ मिळालं.
याकुझा सोलो, 31
मी कोलकात्याच्या पूर्व भागात आठ वर्षं राहिलो, पण मला कधीच भेदभावाचा सामना करावा लागला नाही.

जसं ते माझ्यापेक्षा वेगळे आहेत, तसं मी थोडा वेगळा आहे हे मी स्वीकारलं आहे.
शाई यंग, 74
मी शेतकरी आहे आणि मला सहा मुलं आहे. मी नागालँडच्या बाहेर कधीही प्रवास केला नाही.
मी आणि माझं कुटुंब नागालँडमध्ये राहिलो आहे. मी नागालँडच्या बाहेरचा भारत कधीही पाहिला नाही. मला माझ्या मुलांना नागालँडच्या बाहेर कधीही पाठवायचं नाहीये. कारण त्यांच्याबरोबर भेदभाव होईल अशी भीती मला वाटते.

माझी नागा आणि भारतीय अशी वेगळी ओळख नाही. मी खूप खूश आहे आणि मी माझ्या मरण्याची वाट बघतो आहे.
अटो रिचा, 30
मी कर्नाटकाच्या दक्षिण भागातील मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो. मी तिथे सहा ते सात वर्षं होतो. मी भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रवास केला आहे.
भारतीय अशीच माझी ओळख आहे. मी जेव्हा बाहेरच्या जगात जातो तेव्हा माझी हीच ओळख आहे. नागा असणं माझ्या रक्तात आहे. माझा वर्ण, माझं घराणं, अशीच माझी ओळख आहे.

पण मी ईशान्य भारतातल्या लोकांबद्दल होणाऱ्या भेदभावाच्या कथा ऐकतो तेव्हा मला वाईट वाटतं. तेव्हा मला थोडं दुरावल्यासारखं वाटतं.
असं असलं तरी माझे मुंबई आणि बेंगलुरूमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो आणि एकमेकांना भेटतो.
आम्हाला व्यवस्थित समजून घेतलं जात नाही म्हणून आमच्याबरोबर भेदभाव होतो. आम्ही वेगळे दिसतो. बहुतांश लोकांना नागालँड आणि त्याच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नसतं, शाळेतसुद्धा या भागाबद्दल कधीही शिकवलं जात नाही.
अखुई, 80
मी मिर्च्या, संत्री, शेंगा आणि केळी विकण्याचा व्यवसाय करतो. मी माझ्या आयुष्याबाबत समाधानी नाही. मला शंभरी गाठण्यासाठी आता फक्त वीस वर्षं आहेत.

जेव्हा तुम्ही नागालँडला याल तेव्हा तुम्हाला मी इथेच दिसेन. आम्ही कुठेच बाहेर जात नाही. मला भारताबद्दल काहीही माहिती नाही. मला फक्त नागा लोक माहिती आहे. भारतीय म्हणजे काय याचा मी जास्त विचार करत नाही. मी माझ्या साध्या आयुष्याबाबत सुखी आहे.
अफान, 80
मला भारताबद्दल काहीही माहिती नाही. मी माझ्या कुटुंबीयांनी कधीही नागालँडच्या बाहेर प्रवास केला नाही.
मला माझ्या मुलांना इथून बाहेर पाठवायचं नाही. कारण मी जेव्हा मरेन तेव्हा मला माझी मुलं माझ्याजवळ हवी. जर ते बाहेरच्या शहरात गेले तर ते वेळेत परत येऊ शकणार नाहीत.

भारत, नागालँड, म्यानमार सगळं एकच आहे. (ते लुंगवा नावाच्या एका खेड्यात राहतात. जे म्यानमारच्या सीमेवर आहे.)
मी इथे सुखी आयुष्य जगतो आहे. मी मस्त खातो, पितो, गाणी ऐकतो, गातो आणि जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी एका स्त्रीचं स्वप्न बघायचो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








