'ब्रँड व्हॅल्यू तयार करणारे उद्योग राज्यात क्वचित पाहायला मिळतात'

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, CMO Maharashtra/Twitter

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उद्योग आणि गुंतवणुकीसाठी देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य आहे असं विधान केलं आहे. अर्थात इतर राज्यांनीही असे दावे केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होतो की, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक.

अमेय जोशी लिहितात, "मुंबई-पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसारख्या वाढणाऱ्या शहरांमधील संधी, अनेक शिक्षणसंस्था, त्यामुळे लगेच उपलब्ध होऊ शकणारं कुशल मनुष्यबळ, एमआयडीसी, सहकार्य करणारे स्थानिक अशा अनेक सकारात्मक बाबी पाहता महाराष्ट्र राज्य नंबर वन यापूर्वीच झाले पाहिजे होते."

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, Facebook

"इतर राज्यांचा विचार केला तर गुजरात हे उद्योग क्षेत्रात आपल्या कितीतरी पटीने अधिक प्रगतीशील आहे, तसंच कर्नाटक आपल्याला या क्षेत्रात तोडीस तोड आहे. मोठे उद्योग जे ब्रॅण्ड व्हॅल्यू तयार करतात असे महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळतात," असं मत व्यक्त केलं आहे प्रसाद वाळीव यांनी.

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, Facebook

संदेश बच्छाव म्हणतात, "माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे तसंच औद्योगिक विकासातही पुढे आहे. पण फडवणीस सरकार सध्या महाराष्ट्र आणि मुंबई गुजरातला दत्तक देऊ बघतंय. त्यामुळे त्यांनी मुंबई मधील मराठी उद्योजकांना त्रास देऊन त्यांना गुजरातमध्ये गुंतवणूक करायला लावलंय."

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, Facebook

"महाराष्ट्र औद्योगिक धोरण व कुशल मनुष्यबळ उपलब्धता ह्या दोन गोष्टीमुळे अग्रेसर आहे. या तुलनेत महाराष्ट्राच्या तोडीला फक्त तामिळनाडू आहे. तुलनेत गुजरात व कर्नाटक राज्य केमिकल, आय टीसारख्या फक्त काही क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, असं मत व्यक्त केलं आहे गुरुदत्त देशपांडे यांनी.

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, Facebook

"मात्र अनेक राज्यं आता आपलं धोरण उद्योगपरिपूर्ण करून आव्हान निर्माण करत आहेत जसे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. महाराष्ट्राला जर अग्रस्थान कायम ठेवायचे असेल तर पायाभूत सुविधा, वीज व पाणी उपलब्धता आणि कुशल मनुष्यबळ पुरवठा याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल," असंही ते पुढे लिहितात.

"या कार्यक्रमात राज्याची उत्तम मार्केटिंग व्यूहरचना करणे हे उद्दिष्ट ठेवून मुख्यमंत्री बोलत होते," कौस्तुभ जोशी म्हणतात.

मॅग्नेटिक महाराष्ट्र

फोटो स्रोत, Facebook

"समजा झारखंडचे मुख्यमंत्री अशा कार्यक्रमात बोलत आहेत तर ते म्हणतील का की आमचं राज्य अत्यंत मागास आहे, खाणकाम वगळता विशेष काहीही नाही. असं होतं नसतं ! आपल्याला पैसे आणायचे आहेत. बोलायला लागणारच !", असं ते लिहितात.

सचिन नरवडे म्हणतात, "आज तरी असं सांगता येणार नाही. पण महाराष्ट्रासारखं मनुष्यबळ उर्वरित महाराष्ट्रात मिळणं कठीण."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)