पंतप्रधानांच्या वडनगरमध्ये दलिताची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती

गुजरातमधील वडनगर तालुक्यातल्या शेखपूर गावात प्राथमिक शाळेत 'मध्यान्न भोजन' प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या दलित व्यक्तीने आत्महत्या केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ घर वडनगरमध्ये आहेत.

पोलिसांना 6 फेब्रुवारीला संध्याकाळी शेखपूर गावातील एका विहरीत महेशभाई चावडा यांचा मृतदेह मिळाला.

शाळेतल्याच तीन शिक्षकांच्या छळाला कंटाळून महेशभाईंनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या या तीन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याच शाळेत महेशभाईंची पत्नी इला बेन या मध्यान्ह भोजन बनवण्याचं काम करतात.

मेहसाणाचे पोलीस अधीक्षक रवींद्र मांडलिक यांनी बीबीसीला सांगितलं की, "पोलीस उपअधीक्षक स्तरावरील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई होईल."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

जिल्हा प्रशासनासमोर ठेवलेल्या मागण्या प्रशासनानं मान्य केल्याची माहिती महेशचा लहान भाऊ पीयूष व्यास यांनी दिली. 35 वर्षांच्या इला यांना सरकारी नोकरी देण्यात यावी आणि कुटुंबाला त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी, या मागण्यांचा यात समावेश होता.

महेशभाईंच्या मुलीच्या दप्तरात पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली आहे.

गेल्या एक-दीड वर्षांपासून शाळेतील तीन शिक्षक महेशला सातत्याने त्रास देत असल्याचं त्या चिठ्ठीवरून लक्षात येतं. मोमीन हुसैन अब्बास भाई, अमाजी अनारजी ठाकोर आणि प्रजापती विनोदभाई या शिक्षकांविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि दलित शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे शिक्षक महेशभाईंशी भेदभावानं वागायचे. नाश्ता आणण्यासाठी पाठवायचे, पण पैसेच द्यायचे नाहीत. नाश्ता आणला नाही तर छळही करायचे, असे आरोप करण्यात आले आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)