'26 जानेवारीच्या कार्यक्रमाला गेलात तर गोळ्या घालीन'

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
- Author, माजिद जहांगीर
- Role, बीबीसी हिंदीसाठी
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दोन कथित शस्त्रधारी व्यक्ती विद्यार्थिनींना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला न पाठवण्याची धमकी शाळेच्या मुख्याध्यापकांना देताना दिसत आहेत.
हे प्रकरण पुलवामाच्या गर्व्हनमेंट गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलचं आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मोहिउद्दीन शेख यांनी या व्हीडिओस दुजोरा दिला. ते म्हणाले, बुधवारी सकाळी त्यांच्या घरात दोन व्यक्ती शिरल्या. त्यांनी मुख्याध्यापकांना माफी मागायला सांगितली. त्या दोन कथित शस्त्रधारी व्यक्तींनी विद्यार्थिनींना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पाठवण्यावरुन नाराजी व्यक्त केली.
मुख्याध्यापकांना धमकी
मुख्याध्यापक शेख सांगतात, "ही घटना सकाळी सात वाजताची आहे. माझ्या घरात आलेल्या त्या दोन शस्त्रधारी तरुणांनी मला, तुम्ही विद्यार्थिनींना 26 जानेवारीच्या परेडसाठी तयार करत आहात, तसं करू नका, असं सांगितलं. मी त्यांना म्हणालो की, मी सरकारी कर्मचारी आहे. पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. धमकी देऊन गेले."

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
या घटनेनंतर तुम्ही काय केलंत या प्रश्नावर मुख्याध्यापक शेख सांगतात, "मी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. मी सध्या शाळेतून दोन दिवसांची सुटी घेतली आहे."
पुलवामाच्या या गर्ल्स स्कूलमध्ये 1000 पेक्षा जास्त मुली शिकतात.
गोळ्या घालू, घर जाळू
दक्षिण काश्मीर कट्टरतावाद्यांचा गड मानला जातो. मागच्या काही वर्षांत कट्टरतावाद्यांचे अनेक कमांडर मारले गेले.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दोन कथित बंदूकधारी काश्मिरी भाषा बोलत आहेत. त्यात ते मुख्याध्यापकांना "त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी जर 26 जानेवारीच्या कार्यक्रमात भाग घेतला, तर त्यांना गोळ्या घालू आणि त्यांचं घर जाळू," असा इशारा देताना दिसतात.

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
त्यानंतर हे शस्त्रधारी मुख्याध्यापक शेख यांना सांगतात, "तुम्ही जनतेची माफी मागायला हवी. शिवाय, विद्यार्थिनींना सांगा की, कोणीही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जायचं नाही."
काश्मीर बंदचं आवाहन
फक्त 40000 रुपयांसाठी ते असं का करत आहेत का, असंही त्यांनी मुख्याध्यापकांना विचारल.

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुलवामाचे पोलीस अधीक्षक चौधरी असलम यांनी सांगितलं की "व्हीडिओत दिसणारे लोक कट्टरवादी असू शकतात. घटनेची चौकशी सुरू आहे."
भारत प्रशासित काश्मीरच्या फुटीरतावाद्यांनी प्रजासत्ताक दिनाला काश्मीर बंदची हाक दिली आहे आणि जनतेला 26 जानेवारी हा काळा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
फुटीरतावाद्यांनी नमाजनंतर शांततापूर्वक निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, BILAL BAHADUR/BBC
त्या पार्श्वभूमीवर, काश्मीरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. जागोजागी गाड्यांची तपासणी सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








