You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल - 'सिंदखेड राजामध्ये केजरीवालांच्या सभेनं इतरांची झोप नक्कीच उडाली असेल'
भीमा कोरेगावमध्ये झालेली दंगल भाजपनं घडवली असून, हे दंगल घडवणारं सरकार आहे, अशी खरमरीत टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.
जिजाऊंच्या 420व्या जन्मदिनानिमित्त ते बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी, म्हणजे सिंदखेड राजामध्ये आले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सोबतच त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
"दिल्लीत आम्ही 3 वर्षांत 300 शाळा सुरू केल्या. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की, ज्या महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, दलितांची पहिली शाळा सुरू झाली, त्याच महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करत आहेत", असं केजरीवाल सभेत म्हणाले.
तसंच, "अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच," अशी घोषणा यावेळी 'आप'कडून करण्यात आली.
दरम्यान, बीबीसी मराठीनं याच विषयावर सोशल मीडियावर वाचकांना विचारलं होतं की -
अनेक वाचकांनी "हो, केजरीवालांच्या आजच्या सभेमुळे त्यांना राज्यात फायदा होईल", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी केजरीवाल अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही मोजक्या वाचकांनी आम्हाला याबद्दल काहीच वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वैभव देशपांडे यांच्या मते, "केजरीवालांना सिंदखेड राजामधल्या सभेमुळे राज्यात नक्कीच फायदा होईल. कारण वाढतं बिल, ऑड-ईव्हन कार बंदी, शाळेच्या प्रेवेशावेळी डोनेशन न देणे, या सारख्या मोहिमांची महाराष्ट्राला गरज आहे. सोबत, "केजरीवाल कुठल्याही घराणेशाहीतून आलेले नाहीत," असं ही त्यांनी नमूद केलं आहे.
तर विशाल नवेकर सांगतात, "केजरीवालांनी महाराष्ट्रवर फक्त वरवरचं प्रेम दाखवून काहीही उपयोग होणार नाही आहे. मुळात त्यांचा हेतू महाराष्ट्रात बस्तान बसवणं आहे की फक्त काही भाजपविरोधी मतं फोडणं आहे, हे स्पष्ट नाही. दुसरी शक्यता जास्त वाटते. पण केजरीवालांना दोघांपैकी एकही गोष्ट मिळवण्यात यश मिळेल, असं वाटत नाही."
"प्रगतीसाठी केजरीवालशिवाय देशाला पर्याय नाही," असं मत मुकेश वरारकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत मांडलं आहे. तर दीपक पवार म्हणतात, "या सभेचा केजरीवालांना फायदा होईल की नाही, हा नंतरचा भाग, पण इतरांची झोप नक्कीच उडाली असेल."
"भविष्यात 2019 मध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, 'आप'ला महाराष्ट्रात खूप चांगला निकाल नक्की मिळणार," असा विश्वास योगेश तरंगे यांनी व्यक्त केला आहे. तर पराग भोसले यांनी केजरीवालांना आधी दिल्ली सांभाळा, असा सल्ला दिला आहे.
विवेक दिवे आणि पल्लवी नंदेश्वर म्हणतात, "केजरीवालांना या सभेचा फायदा नाही होणार, पण भाजपलाही फायदा होऊ देणार नाही."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)