#भीमा कोरेगाव दिवसभर ट्विटरवर चर्चेत

भीमा कोरेगाव परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभर दिवसभर उमटत होते. सोशल मीडियामध्ये 'टॉप टेन'पैकी सहा हॅशटॅग हे या घटनेशी संबधित होते. बुधवारी सकाळीसुद्धा हेच हॅशटॅग ट्रेंडमध्ये दिसले.
महाराष्ट्रात सोमवारी दुपारनंतर भीमा कोरेगावच्या घटनेवर आधारीत चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली. मंगळवारी याच अनुषंगानं फेसबूकवर मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता.
मुंबईतील काही भागात, मंगळवारी रास्ता रोका करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोशल मीडियात ही घटना आणि त्याअनुषंगानं आरोप-प्रत्यारोपांची चर्चा झडू लागली. एक-एक करत विविध हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागले.
ट्विटरवर साधारणतः दुपारी बारा ते एक वाजल्यानंतर #Chembur #DalitProtest हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले.
चेंबूरमधील रास्ता रोकानंतर तीनही हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर ट्रेंडमध्ये आले. एव्हाना महारष्ट्राबाहेरच्या लोकांनाही कोरेगाव भीमा इथली घटना कळलेली होती. #Chembur #DalitProtest या हॅशटॅगनं पोलीस त्याचप्रमाणे माध्यमकर्मी, सामाजिक चळवळीतल्या व्यक्ती, सेलिब्रिटी यांनी शांततेचं आवाहन करणारे ट्वीट केले.

फोटो स्रोत, TWITTER
#BhimaKoregaonViolence #Dalit #MaharashtraCasteClash हे तीन हॅशटॅग मंगळवारी दुपारपासून ट्रेंडीग होत आहेत. ट्विटरच्या टॉप तीन हॅशटॅगमध्ये भीमा कोरेगावच्या घटनेशी संबधित हे तीन हॅशटॅग होते. या हॅशटॅगअंतर्गत राजकीय वक्तव्य, आरोप-प्रत्यारोप केले जात होते.
मंगळवारी दिवसभर हे हॅशटॅग चालले. त्यानंतर बुधवारी सकाळीसुद्धा हेच हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये होते. टॉप टेन हॅशटॅगमध्ये भीमा कोरेगावच्या घटनेशी संबधित सहा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. यामध्ये #BhimaKoregaonViolence #Dalit Maharashtra, #Dalit, #KoregaonBhima, #Chembur आणि #Section 144 या हॅशटॅगचा समावेश होता. बुधवारी सकाळी महाराष्ट्रात यासोबतच #MaharashtraBandh हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता.

गुगलवरही Mumbai, Maharashtra Police, Bandh, Dalit, Maharashtra, Bhima River हे शब्द ट्रेंड होत होते. यामध्ये विशेषतः इंटरनेटवर भीमा कोरेगावशी संबधित शोधण्यात येणारी माहिती आणि बातम्यांचा समावेश होता.
फेसबुकवर #ShameOnCM या हॅशटॅगसोबतच #BhimaKoregaon #भीमा_कोरेगाव हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. भीमा कोरेगाव इथल्या घटनेचे व्हीडिओ शेअर केले जात होते. नंतर-नंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनांची छायाचित्रं आणि माहिती शेअर केल्या जाऊ लागली.
तुम्ही हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








