आंतरराष्ट्रीय महिला दिन : वयाच्या 80व्या वर्षीही पोहणाऱ्या आजी काय सांगताहेत आपल्याला?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ऐंशी वर्षांची स्विमर आज्जी!
    • Author, वृन्दा भार्गवे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

वयाच्या 80व्या वर्षी गुडघेदुखी, सांधेदुखी, मधुमेह, रक्तदाब वगैरे कोणतीही चर्चा न करता आसपासच्या लहानग्यांबरोबर पोहण्यासाठी तरण तलावात उतरणाऱ्या निर्मला भिडे आसपासच्या अनेकांना स्फूर्ती देतात.

या पोहणाऱ्या आजी या वयात नियमित सराव करतात आणि इतरांनाही पोहण्याचे धडे देतात.

दीड वर्षांपूर्वी गुजरातमध्ये फिरायला गेलेल्या निर्मला भिडे यांना एका गायीने धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या बरगड्यांना इजा पोहोचली होती.

निर्मला भिडे यांनी डॉक्टरांकडे जायला नकार देत फक्त आपल्या 'स्विमिंग थेरपी'वर विश्वास ठेवला. "या व्यायामामुळेच मी पुन्हा चालू शकले," निर्मला भिडे सांगतात.

स्विमिंगची आवड कशी?

निर्मला भिडे यांना लहानपणापासूनच पोहायची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षी डहाणूला असताना त्या आपल्या मैत्रिणींबरोबर विहिरीवर पोहायला जायच्या.

"त्या वेळी पोहायचं की नाही, असा पर्याय आमच्याजवळ नसायचा. बरोबरच्या चार मुलींनी उडी मारली की, आपणही त्यांच्याबरोबर उडी मारायची हा शिरस्ता होता," निर्मलाताई त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमतात.

तेव्हापासून निर्मलाताई आणि पाणी यांचं गहिरं नातं जुळलं. कॉलेजमध्ये असताना त्या मुंबईत सुटीला काकांकडे आल्या की, मफतलाल क्लबच्या तरण तलावात बहिणींबरोबर पोहायला जात. त्या वेळी त्यांनी तरण तलावात पहिल्यांदाच उडी मारली.

निर्मला भिडे पोहताना

फोटो स्रोत, MARMIK GODSE/BBC

फोटो कॅप्शन, आजही निर्मलाताई नेमानं पोहायला जातात.

लग्नानंतर त्या मुंबईतील शिवाजी पार्क भागात राहायला आल्या. मुलांना पोहण्याच्या वर्गांना घातल्यावर पहिल्यांदा त्यांनी महिला प्रशिक्षकांना पोहण्याचे धडे देताना बघितलं.

"तोपर्यंत मी स्विमिंग करत होते. पण प्रत्येक स्ट्रोकमध्ये एक डौल असतो, हे तिथे बघून मला कळलं. तिथे मी सराव केला आणि नंतर जिथे जाईन तिथे पोहणं चुकवलं नाही," निर्मलाताई सांगतात.

लहान मुलांना स्विमिंगचे धडे

निर्मलाताईंचे पती विनायक भिडे 'टाटा' मध्ये इंजिनीअर होते. सततच्या बदल्यांमुळे त्या भिवपूर, पानिपत, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये राहिल्या.

"प्रत्येक शहरातल्या तरण तलावात मी माझ्या लहान मुलांसह पोहायला जायचे. माझ्या मुलांना धडे देताना मी तिथे येणाऱ्या इतर मुलांनाही शिकवायला सुरुवात केली. मला शिकवणं आवडायला लागलं," त्या म्हणतात.

निर्मला भिडे पोहताना

फोटो स्रोत, MARMIK GODSE/BBC

फोटो कॅप्शन, प्रत्येक स्ट्रोकचा सराव करणं त्या खूप नंतर शिकल्या

काही वर्षं त्या बगदादला असताना तिथेही हे प्रशिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. या वेळी त्या आपल्या नातवाला पोहण्याचे धडे देण्यासाठी तरण तलावात उतरल्या होत्या.

स्विमिंग कॉश्चुममध्ये त्यांना बघून अनेक महिला अवाक व्हायच्या. "कौतुक करण्यापेक्षा तुम्हीही पाण्यात उतरा. बघा, तुम्हालाच हलकं वाटेल. मुलांच्या डोळ्यातलं तुमच्याबद्दलचं कौतूक बघून तुम्हाला नक्कीच भरून येईल," असा सल्ला त्या देतात.

गुजरातमधला अपघात आणि आजारपणं!

कडाक्याच्या थंडीचे एक-दोन दिवस वगळले, तर निर्मलाताई दर दिवशी नेमाने पोहायला जातात. यात काही दिवस खंड पडला होता तो दीड वर्षांपूर्वी!

गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराला भेट द्यायला त्या गेल्या असता तिथे एका गायीनं त्यांना अचानक धडक दिली. त्या पाठीवर पडल्या आणि त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली.

डॉक्टरांकडे जाणं, किमान दीड महिना आराम करणं, याशिवाय तरणोपाय नाही, असं त्यांना अनेकांनी सांगितलं. पण डॉक्टरकडे न जाण्यावर त्या ठाम होत्या.

निर्मला भिडे
फोटो कॅप्शन, निर्मला भिडे

"मला माहीत होतं की, डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा स्विमिंग करून माझी तब्बेत जास्त लवकर सुधारेल. आपल्य शरीराला आपल्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही," निर्मला भिडे आवर्जून सांगतात.

इतर छोट्या छोट्या आजारांबद्दलही त्यांचं हेच मत आहे. "लहानपणापासून मी कधीच आजारी पडले नाही. सर्दी किंवा कणकण वगैरे एखाद्या दिवशी असली तरच. बाकी साथीच्या रोगांपासून वगैरे मी लांबच होते."

सगळ्यांना त्या सल्ला देतात, "तुम्ही नियमितपणे पोहण्याचा व्यायाम केलात, तर कोणताही आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही."

(वृन्दा भार्गवे या HPT महाविद्यालय नाशिक येथे पत्रकारिता विभागाच्या प्रमुख आहेत. व्हीडिओ शूट - मार्मिक गोडसे.)

यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे - #EachforEqual

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)