भारताविषयी ओबामांनी सांगितलेल्या 11 गोष्टी

फोटो स्रोत, PEDRO UGARTE/Getty Images
नवी दिल्लीतील नेतृत्वशैलीविषयक परिषदेत बोलण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आहेत. याआधी दोनवेळा ते भारतभेटीवर आले होते. त्यावेळी भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते.
काय म्हणाले होते ओबामा भारताबद्दल? त्यांचे निवडक 11 उद्गार.
1. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध या शतकातला निर्णायक कालखंड आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या दौऱ्यासाठी मी भारताची निवड केली. या दौऱ्यात भांगडाच्या तालावर मी नाचलो होतो. दिवाळीचा अनोखा सण आम्ही व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला होता.
2. अमेरिकेत वंशभेदाविरोधात मार्टिन ल्युथर किंग (कनिष्ठ) संघर्ष करत असताना त्यांचं प्रेरणास्थान महात्मा गांधी होते. ल्युथर किंग यांनी भारताला भेट दिली होती. गांधींच्या भारताला भेट दिल्यानंतर त्यांचा न्याय हक्कांसाठी लढाई लढण्याचा निर्धार पक्का झाल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधींनी अनुसरलेला अहिंसा मार्ग आमच्या लढाईत कळीचा ठरेल असं त्यांनी सांगितलं होतं.
3. गांधीजी आणि त्यांनी जगाला दिलेला शांतीपूर्ण लढ्याचा संदेश यांच्याविना मी आज तुमच्यासमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा राहू शकलो नसतो. (ओबामा यांनी भारतीय संसदेत केलेल्या केलेल्या भाषणादरम्यान हे उद्गार काढले होते.)

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/Getty Images
4. शंभर वर्षांपूर्वी भारताचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेने स्वागत केलं. विवेकानंदांच्या माध्यमातून आम्हाला हिंदुत्व आणि योग यांचा वसा मिळाला. ते माझ्या गावी शिकागो इथं आले होते. माझ्याच शहरात झालेल्या धर्मविषयक परिषदेत त्यांनी श्रद्धा, परमार्थ, तपश्चर्या यांचं महत्त्व विषद करून सांगितलं होतं. बंधू आणि भगिनींनो या उद्गारांसह सुरू झालेलं त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आजही मार्गदर्शक म्हणून काम करतं. म्हणूनच भारतातल्या 'बंधू भगिनींनो' असं मला म्हणावंसं वाटतं आहे.
5. ज्ञान आणि कल्पकता ही गुणवैशिष्ट्यं जपणारे दोन देश अर्थात अमेरिका आणि भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील तंत्रज्ञान आविष्काराचं मुख्य केंद्र आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येत अणुरेणुंच्या विभाजनापासून अवकाश भरारीपर्यंत असंख्य ऐतिहासिक गोष्टींमध्ये समान दुवा जपला आहे. विविध क्षेत्रातील या घडामोडींनी भारताला प्रगतीपथावर नेलं आहे. गरिबीचं जाळं भेदून भारताने जगातला सगळ्यात मोठा मध्यमवर्ग असलेली अर्थव्यवस्था घडवली आहे.
6. दोन्ही देशांतल्या लोकांना नोकरी, व्यवसाय आणि एकूणच कामाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याची मला खात्री आहे. दोन्ही देशातली माणसं अधिक सुरक्षित असतील. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि सगळ्यात प्रदीर्घ इतिहास असलेली लोकशाही यांचं एकत्र येणं अद्भुत क्षण आहे. मला यावर ठाम विश्वास आहे.

फोटो स्रोत, JIM YOUNG/Getty Images
7. धर्मांध मुद्द्यांना महत्त्व न दिल्याने भारत प्रगतीशील वाटचाल करतो आहे. हा देश विशिष्ट अशा धर्माची मक्तेदारी झालेला नाही. हीच अखंड भारताची ताकद आहे. म्हणूनच प्रचंड पसरलेल्या देशातले नागरिक बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा चित्रपट पाहतात. त्याच्या कामाचं कौतुक करतात. त्याचवेळी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मिल्खा सिंग आणि मेरी कोमसारख्या शिलेदारांना पाठिंबा देतात.
8. अधिकाअधिक अमेरिकेच्या विद्यार्थ्यांनी भारतात यावं आणि भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत यावं. याद्वारे विचारांची देवाणघेवाण होईल आणि दोन्ही देशातले विद्यार्थी अनेक गोष्टी शिकू शकतील. याचं कारण अमेरिका आणि भारतातली माणसं जगातल्या सगळ्यात मेहनती मंडळींपैकी एक आहेत.
9. आशिया आणि जगात भारत महासत्ता म्हणून उदयास येणारा देश नाही तर भारताने याआधीच जागतिक पटलावर मोहोर उमटवली आहे.
10. भारताच्या गौरवशाली इतिहासावर माझा दृढ विश्वास आहे. म्हणूनच भारत आणि अमेरिकेची एकत्रित वाटचाल देदीप्यमान होईल, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. भारतीय संस्कृती संपूर्ण जगासाठी दीपस्तंभासारखी अढळपणे कार्यरत आहे. समष्ठीचा विचार हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. माहिती युगाची मुहुर्तमेढ भारतीय प्रतिभेतून साकारली, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. गणितीय विश्वाचा पाया असलेल्या शून्याची देणगी भारतीयांनीच जगाला दिली आहे.

फोटो स्रोत, SAUL LOEB/Getty Images
11. असंख्य सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांना बाजूला सारत तुम्ही भारतीयांनी प्रगतीपथावर जाण्याची किमया साधली आहे. अन्य देशांना जो टप्पा गाठण्यासाठी अनेक शतकं लागली तो भारतानं अवघ्या काही दशकांत गाठला आहे. म्हणूनच जागतिक पटलावर भारताला नेतृत्त्व करण्याची संधी मिळणं स्वाभाविक आहे. तुमच्या वाडवडिलांचं स्वप्न साकार होतं आहे. तुमच्या युवा पिढीला मिळालेला हा गौरवशाली वारसा आहे. त्यांनी हा क्षण मनात जपणे अत्यावश्यक आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








