'मॉडेलिंग' करणारे हे आजी-आजोबा बघा!

- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ
चेहऱ्यावर न लपणाऱ्या सुरकुत्या, सडपातळ बांधा, साधीशीच लुंगी नेसलेली... चेहऱ्यावर हलकं स्मित मात्र कायम आणि पांढऱ्या केसांची स्टाईल अगदी तामिळ फिल्मस्टार रजनीकांतची असते तशी...
71 वर्षांच्या दिलीबाबूंना म्हणूनच कदाचित मॉडेल म्हणून काम करण्याची ही संधी मिळाली असावी.
चेन्नईच्या प्रतिष्ठित गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्यांच्या कलाकृतींसाठी मॉडलचं काम दिलं जातं.
"मी कित्येक तास असा स्तब्धपणे आहे त्या पोझिशनमध्ये बसून राहू शकतो. काही वेळानंतर थोडा आराम करतो. मी जेव्हा पुन्हा कामाला बसतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर तेच भाव असतात," दिलीबाबू आपल्या कामाच्या स्वरुपाबद्दल बीबीसीला सांगत होते.
विद्यार्थ्यांना चित्रकला किंवा शिल्पकला शिकण्यासाठी मॉडल्सची आवश्यकता असते. या मॉडल्सकडे पाहून विद्यार्थी हुबेहूब चित्रं रेखाटतात किंवा शिल्पं साकारतात.
"ही मुलं माझी चित्रं अगदी हुबेहूब काढतात. माझ्यात आणि त्या चित्रांत तुम्हाला किंचितही फरक दिसणार नाही, " दिलीबाबू सांगतात.
"कधीकधी ही मुलं त्यांच्या कामात इतकी गढून जातात की, त्यांना आजूबाजूचं, वेळेचं भानही राहात नाही. मी बऱ्याचदा त्यांचं काम कधी संपेल याची वाट बघत बसून राहतो," दिलीबाबू म्हणतात.

एक दोन नाही तर दिलीबाबूंची तब्बल दहा मातीची अपूर्ण शिल्पं मला फाइन आर्ट्स कॉलेजच्या स्टुडिओमध्ये दिसली. एका उंच खुर्चीवर दिलीबाबू स्तब्धपणे बसलेले होते.
स्टुडिओच्या खिडकीतून उष्ण झळा येत होत्या. त्या वाऱ्यावर दिलीबाबूंचे केस उडत होते, पण ते जागेवरून तसूभर हलले नाहीत. त्या झळांमुळे आपण त्रासलो आहोत असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसले नाहीत.
मॉडेल म्हणून काम करण्यासाठी दिलीबाबूंना रोजचे 200 रुपये मिळतात. त्यांची शिफ्ट आठ तासांची असते. गेल्या तीन वर्षांपासून ते न चुकता सकाळी ठरलेल्या वेळेत कॉलेजमध्ये येतात आणि संध्याकाळपर्यंत कॉलेजमध्येच असतात.
हे काम करण्याचं एक कारण आहे असं ते सांगतात. "गेल्या वर्षी माझ्या पत्नीचं- माहेश्वरी हिचं निधन झालं. ती नसल्यानं मला घर खायला उठतं."
"माहेश्वरी नाही. त्यामुळे मला घरी थांबावंसंच वाटत नाही. म्हणून मी इथे येतो. ही मुलं माझ्या नातवंडांच्या वयाची आहेत", ते सांगतात.
"या मुलांबरोबर माझा वेळ चांगला जातो. इथलं काम आटोपलं की, मी सिटी सेंटर मॉलला जातो. तिथे काम करतो आणि तिथेच झोपतो. सकाळी घरी जाऊन आवरतो आणि पुन्हा इकडे येतो," दिलीबाबू सगळा दिनक्रमच सांगतात.
"या मुलांचा माझ्यावर खूप जीव आहे. माझा वाढदिवस होता, त्या दिवशी त्यांनी माझ्यासाठी केक आणला आणि मला नवीन कपडे दिले. माझ्या पाया पडून त्यांनी माझे आशीर्वाद घेतले," ते भावूक होऊन सांगतात.
"माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला वाटतं होतं की तिच्यासोबत माझंही आयुष्य संपायला हवं होतं."
"मला नैराश्य आलं होतं. पण आता मी जेव्हा कॉलेजमध्ये येतो, तेव्हा इथे ठेवलेली सुंदर चित्रं पाहतो, शिल्पं पाहतो. या कलाकृती पाहून मला जिवंत असल्यासारखं वाटत आहे," असं दिलीबाबू म्हणतात.
या कॉलेजमध्ये लक्ष्मी नावाच्या आणखी एक मॉडेल नियमित येतात. त्या गेल्या सहा वर्षांपासून कॉलेजला येत आहेत. त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा अधिक शिल्पांसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे.

"मला कित्येक दिवस वाटत होतं की, म्हातारपणी मी कुरूप दिसते आहे. मी तरुण असताना सुंदर दिसत असे. म्हातारपणात सर्व काही बदलतं. पण मी पहिल्यांदा जेव्हा मॉडेल म्हणून बसले, तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. इथले विद्यार्थी म्हणतात की, मी सुंदर आहे," त्या निरागसपणे सांगतात.
त्या म्हणाल्या, "आम्हाला जसा चेहरा हवा आहे, अगदी तसाच तुमचा चेहरा आहे, असं ही मुलं मला म्हणतात. त्यांच्यापैकी एकानं मला म्हटलंदेखील की, तुम्ही खूप फार सुंदर दिसता."
"इतकंच काय... माझ्या सुरकुत्यांमुळे माझ्या चेहऱ्यावर रेखीवपणा आला आहे, असं हे विद्यार्थी म्हणतात. या कलेमुळं मी पुन्हा सुंदर झाले", असं लक्ष्मी कृतार्थपणे सांगतात.
'ही मुलं मला डार्लिंग म्हणतात,' असं सांगताना त्या थोड्या लाजतात. "मुलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यासोबत सेल्फी घेतात. चहा पितात...." लक्ष्मीअम्मा मुलांबद्दल भरभरून बोलत होत्या.
"मला या मुलांमध्ये मिसळायला आवडतं. या वयातही मी कुणाच्यातरी उपयोगी पडते आहे, हा विचार करूनच मला आनंद होतो.
"या कामाचे फार पैसे मिळत नाहीत, हे खरं. पण जेव्हा ही मुलं पास होऊन बाहेर पडतात आणि माझी चित्रं गॅलरीमध्ये लावतात, ती घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरत नाही," असं त्या म्हणतात.
कामाच्या मध्ये या ज्येष्ठ नागरिकांना अभावानंच वेळ मिळतो. पण मिळतो तेव्हा तो वेळ छान एंजॉय करतात.
त्यांच्या गप्पा तर धमाल असतात. त्यांची बैठक म्हणजे हास्य-विनोद, किस्से आणि वाफाळलेला चहा असं सगळं असतं.

जेव्हा 66 वर्षांचे सुब्बुरायन पहिल्यांदा कामावर आले होते, तेव्हा ते थोडे अवघडल्यासारखे दिसत होते. सुब्बुरायन आधी हमाल म्हणून काम करीत असत.
त्या वेळी उन्हातान्हात हे कष्टाचं काम करावं लागे आणि तशी हात-तोंडाशीच गाठ असायची. नंतर त्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मदतनीस म्हणून नोकरी केली. पण आता ते मॉडेलचं काम करतात.
"या कामातून त्यांना खूप पैसे मिळतात असं नाही, पण निदान आता आपण समाधानी आहोत, असं वाटतं", असं ते म्हणतात.
"मी एका उंच आसनावर बसलो होतो. सर्व जण माझ्याकडे नजर रोखून पाहत होते. काही जण माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या डोळ्यांकडे निरखून बघत होते, तर काही माझे खांदे निरखत होते.
"त्यांचं चित्रं जसंजसं पूर्ण होऊ लागलं, तसं माझ्या लक्षात आलं की, हे चित्र काढण्यासाठी किती प्रचंड एखाग्रता आवश्यक आहे," ते सांगत होते.
"मी वेगवेगळे कला प्रकार आणि चित्रांसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे. ऑइल पेंटिंग, फायबर, टेराकोटा स्कल्पचरसाठी मी मॉडेल होतो", असं ते आनंदानं सांगतात.
त्यांच्या या कामाबद्दल मुलंही समाधानी आहेत आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना बाळगतात. "आमच्यासाठी ही मॉडेल्स खूप महत्त्वाची आहेत. जर कधी ते आजारी असतील किंवा थकल्यासारखे वाटत असतली तर आम्ही त्यांना औषध-पाणी देतो."
"आमच्या कामासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे लोक गरीब आणि वृद्ध आहेत, पण त्यांच्यातील या सच्चेपणामुळेच आमची कला अस्सल वाटते," असं शिल्पकला विभागात शिकणारा विद्यार्थी दामोदरन नमूद करतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








