मुंबईच्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबाने गमावला आधार

- Author, राहूल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एल्फिन्स्टन स्टेशनवर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत 19 वर्षीय मयुरेश हळदणकर याचाही जीव गेला. एकुलता एक मुलगा गमावलेल्या हळदणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता.
कुटुंबात आणि बीडीडी चाळीत मयुरेश आपल्या कलात्मक वृत्तीसाठी चांगलाच लोकप्रिय होता. दररोज मित्राच्या गाडीवर बसून ऑफिसला जाणाऱ्या मयुरेशने त्या दिवशी बँकेच्या कामामुळे लोकलनं जायचं ठरवलं... आणि त्यातच काळाने झडप घातली.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
चाळीत श्रद्धांजली
मयुरेशचं घर शोधत आम्ही बीडीडी चाळीत पोहोचलो. चाळीच्या गेटसमोरच मयुरेशला श्रध्दांजली वाहाणारे फ्लेक्स लावले होते.
लोकांकडे चौकशी करत बिल्डिंगपर्यंत आलो. मयुरेशच्या एका शेजाऱ्याने आम्हाला त्याच्या घराकडे नेलं.
बीडीडीतील 80 क्रमांकाच्या चाळीत त्याचं दुसऱ्या मजल्यावर घर आहे. दारावर 'प्रकाश अप्पा हळदणकर' ही मयुरेशच्या वडिलांच्या नावाची पाटी होती.
सोबत आलेल्या शेजाऱ्यानं आम्हाला बाहेर पॅसेजमध्येच बसायला सांगितलं. मुख्य दाराला पडदा होता. तो बाजूला करून ती व्यक्ती आत गेली आणि घरात आम्ही आल्याचं कळवलं.
आत जाताना त्यानं पडदा सरकवला तेव्हा जाणवलं, की मुळात अंधारभरल्या त्या घरात मयुरेशच्या जाण्यामुळे आणखीनच काळोख झाला होता.
त्या पडद्याआड मला कपाटासमोर मान खाली घालून बसलेली त्याची बहीण दिसली.
तेवढ्यातच ते शेजारी बाहेर येऊन म्हणाले, "मयुरेशचे वडील आणि मामा तुम्हाला हवी ती माहिती देतील."
त्याची आई आजारी असते आणि बहीण अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

फोटो स्रोत, BBC/ Rahul Ransubhe
मयुरेशचं घर एकदमच छोटं होतं, अगदी दोघं-तिघं राहू शकतील एवढंच. त्यात एका कोपऱ्यात त्याची आई झोपलेली होती. बहीण समोरच बसलेली होती.
मयुरेशच्या वडिलांनी आम्हाला बसायला खुर्ची दिली आणि ते मयुरेशबद्दल सांगू लागले.
गणपती डेकोरेशनची आवड
"मयुरेशला गणपती डेकोरेशनची खूप आवड होती. त्याला क्रिकेटही खूप आवडायचं. दहीहंडीसाठी तो नेहमी तयार असायचा, मग ते सात थर असो की आठ असो. हल्ली तो कबड्डीसुध्दा खेळायला लागला होता," ते सांगत होते.
"मयुरेशचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या आईला जो मानसिक आजार जडला तो अजूनही तसाच आहे. तिच्या उपचारासाठीही मयुरेश धडपड करत होता."
"तो चाळीतला लाडका होता. कोणीही हाक मारली की तो हाती असेल ते काम सोडून पहिले त्यांचं काम करायला धावायचा. घरी आल्यावर हात धुतले की आईच्या, बहिणीच्या अंगावर पाणी उडवायचा. खूप मस्ती करायचा."
'तो दिवस'
29 सप्टेंबरच्या घटनेबद्दल मयुरेशचे वडील आम्हाला सांगत होते--
मयुरेश त्याच्या मित्रासोबत नेहमी गाडीवरून नोकरीला जायचा. त्या दिवशी त्या मित्राने त्याला फोन केला. तो म्हणाला, "अरे थांब १० मिनिटं. आपण दोघे जाऊयात."
त्यावर मयुरेश त्याला म्हणाला, "तुला वेळ लागेल. तुझ्या मेकअपला खूप वेळ लागेल. तोपर्यंत मी बँकेत जाऊन माझा चेकसुध्दा टाकून येईन."
त्याचा अजून एक मित्र त्या रेल्वेस्टेशनला वाट पाहात होता. त्याचवेळी ती चेंगराचेंगरी झाली. तेथून हॉस्पीटलमध्ये जाईपर्यंत तो शुध्दीवर होता. त्यानं खिशातला मोबाईल काढला आणि तिथं असलेल्या एका मित्राला 'माझ्या घरी फोन करून सांग' म्हणून सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
त्या मित्रानं आम्हाला केईएम हॉस्पीटलला बोलावलं. केईएम हॉस्पीटलचं नाव ऐकताच माझ्या काळजाचं पाणी झालं. मी चार मित्रांना घेऊन लगेचच हॉस्पीटलमध्ये पोहोचलो. तोपर्यंत उशीर झाला होता.

'...गेला तो परत आलाच नाही'
मयुरेशच्या आई प्रतिभा हळदणकर अजूनही या धक्क्यातून सावरल्या नाही आहेत. आम्ही बोलत असताना त्या नुसत्या आमच्याकडे बघत होत्या.
आम्ही त्यांना मयुरेशच्या आवडींबद्दल विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, "मयुरेशला माझ्या हातची बटाटा भजी आवडायची. तसंच गोड वरण आवडायचं."
"मयुरेशला स्वच्छ कपडे घालायची सवय होती. तो मला त्याचे कपडे धुतले म्हणून पैसे द्यायचा. कधी कधी तर 500 रुपयेही द्यायचा. 'राहू दे गं आई. तुझ्या औषधपाण्याला लागतील', असं म्हणायचा."
"त्यादिवशी तो इडली खात गडबडीत बाहेर पडला. माझ्याशी न बोलताच गेला तो परत आलाच नाही."

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
आमच्यासोबतच बसलेले मयुरेशचे मामा जितेंद्र बिर्जेही मग त्याच्याविषयी ते सांगू लागले, "मयुरेशला बाईक खूप आवडायची. त्याने बाईक घेण्यासाठीही पैसे जमवले होते. तर बहिणीला लॅपटॉप आणि वडीलांना या दिवाळीत अॅक्टीव्हा घेऊन देण्याचं त्याचं स्वप्न होतं. या दुर्घटनेमुळे त्याची सर्व स्वप्नं अर्धवटच राहिली."
तो चाळीत फेमस होता
मयुरेशचे मामा पुढे सांगत होत, "मयुरेश गेल्यापासून त्याचे मित्र अजूनही रडताहेत. तो चाळीत फेमस होता."
"त्याला नुकतीच समज आली होती. घरची परिस्थिती त्याला समजली होती. आई आजारी आहे, बहिण शिकलेली असूनही तिला चांगली नोकरी नाही. वडीलांचीही नोकरी नाही. त्यामुळे आपण घरची जबाबदारी घेतली पाहिजे, हे त्याला कळायला लागलं होतं. तो हुशार होता."
शेजाऱ्यांचाही तो खूप लाडका होता. बाजूलाच राहणाऱ्या कामिनी रहाटे यांनी सांगितलं, "मयुरेश फार कलात्मक वृत्तीचा होता. गणपतीच्या वेळी मुर्तीला दागिने करणं त्याला आवडायचं. गणपती मुर्तीला खडे लावण्यासाठी त्याला लोक बोलवायचे. यंदा त्याने वरळीच्या लाडक्या राजाचेही दागिनेही घडविले होते. लोकांनाही त्याचं काम आवडलं होतं."

फोटो स्रोत, BBC/ Rahul Ransubhe
रेल्वे खात्यात नोकरी हवी
केंद्र सरकारने दिलेली पाच लाखांची मदत हळदणकर कुटुंबीयांना मिळाली असून पुढील काही दिवसात राज्य सरकारचीही मदत मिळणार असल्याचे मामा जितेंद्र बिर्जे यांनी सांगितले.
मयुरेश हा एकटाच त्यांच्या घरचा आधार होता. त्याच्या जाण्यानं हळदणकर कुटुंब मनानं आणि आर्थिकरित्याही पुर्णत: खचलं आहे. शासनाकडून त्यांना थोडी मदत होईलही.
पण यातून हळदणकर कुटुंबाला पूर्ण तो आधार मिळेल का?
शासनाने रेल्वे खात्यात मयुरेशच्या मोठ्या बहिणीला नोकरी द्यावी, अशी मागणी हळदणकर कुटुंबीय, शेजारी आणि मयुरेशच्या मित्रांनीही केली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









