'सर, प्लीज मी तुम्हाला भेटू शकतो का'; पंतप्रधान मोदींबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने काय म्हटलं?

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टॅरिफबाबत काही दावे केले आहेत.

2 दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर भारताने रशियासोबत व्यापार सुरू ठेवला, तर त्यांच्यावरील टॅरिफ लवकरच वाढवलं जाऊ शकतं, असा इशारा दिला होता.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने 68 अपाचे हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती असं सांगत म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि विचारलं होतं की, "सर, प्लीज, मी तुम्हाला भेटू शकतो का?' मी त्यांना 'हो' म्हटलं, कारण मोदींशी माझे खूप चांगले संबंध आहेत."

यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यामुळे भारत आता रशियाकडून कमी तेल खरेदी करत असल्याचे सांगितलं.

मात्र, भारतीय माध्यमांमध्ये ट्रम्प यांचा दावा चुकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार भारताने अमेरिकेकडून 68 नव्हे, तर फक्त 28 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत.

यापैकी 22 हेलिकॉप्टरसाठी सप्टेंबर 2015 मध्ये ओबामा प्रशासनाच्या शेवटच्या दिवसांत करार झाला होता. तर उर्वरित 6 हेलिकॉप्टरसाठी 2020 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात करार झाला होता.

तत्पूर्वी रविवारी (4 जानेवारी), एअर फोर्स वन विमानात बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे टॅरिफ आणि भारत रशियाकडून कमी तेल आयात करत असल्याच्या प्रश्नावर म्हणाले होते की, "त्यांना मला खूश करायचं होतं. खरंतर मोदी खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहीत होतं, की मी खूश नाही आणि मला खूश करणं आवश्यक होतं."

'ट्रम्प यांनी आता कोणता नवीन दावा केला?'

केनेडी सेंटरमध्ये हाऊस रिपब्लिकन कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकन लढाऊ विमानं आणि टॅरिफबाबत बोलताना पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दलही भाष्य केलं.

ट्रम्प म्हणाले, "एफ-35 मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. भारत अपाचे हेलिकॉप्टरसाठी माझ्याकडे आला आणि म्हणाला की सर, आम्ही याची पाच वर्षांपासून वाट पाहत होतो. आता आम्ही हे बदलत आहोत."

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी मला विचारलं की, सर मी तुम्हाला भेटू शकतो का?"

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी मला विचारलं की, सर मी तुम्हाला भेटू शकतो का?"

यानंतर ट्रम्प म्हणाले, "भारताने 68 अपाचे हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती. पंतप्रधान मोदी मला भेटायला आले आणि विचारलं, 'सर, प्लीज, मी तुम्हाला भेटू शकतो का?' मी हो म्हटलं, कारण माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत."

ट्रम्प म्हणाले, "त्यांना द्याव्या लागणाऱ्या टॅरिफमुळे ते माझ्यावर इतकं खूश नाहीत. पण त्यांनी आता रशियाकडून तेल खरेदी खूप कमी केलं आहे. टॅरिफमुळे आम्ही खूप श्रीमंत होत आहोत."

'विरोधी पक्षाची टीका'

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

काँग्रेसने आपल्या 'एक्स' हँडलवर ट्रम्प यांचा व्हीडिओ शेअर करत म्हटलं, "ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर मोदी निमंत्रणाशिवाय अमेरिकेला गेले. ट्रम्प म्हणतात की, 'मोदींनी मला विचारलं, सर, प्लीज मी तुम्हाला भेटू शकतो का? मी हो म्हटलं.' तुम्हाला आठवत असेल, जगातील फक्त मोदी हेच एकमेव असे नेते आहेत ज्यांचं स्वागत करण्यासाठी ट्रम्प गेटवर आले नव्हते. आता तुम्हाला समजलं का?"

यासोबतच काँग्रेसने आपल्या 'एक्स' हँडलवर पंतप्रधान मोदींचे अनेक व्यंगचित्रे शेअर केले आहेत. त्यात ते विचारताना दिसत आहेत - "सर, प्लीज मी तुम्हाला भेटू शकतो का?"

 काँग्रेसने अनेक व्यंगचित्रे एक्सवर शेअर केली आहेत.

फोटो स्रोत, @INCIndia/X

फोटो कॅप्शन, काँग्रेसने अनेक व्यंगचित्रे एक्सवर शेअर केली आहेत.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली.

बॉल्टन म्हणाले, "यावरून असं दिसून येतं की, ट्रम्प यांना अमेरिकेच्या हितासाठी काय योग्य आहे याची कोणतीही धोरणात्मक समज नाही. चीनसारख्या धोक्याच्या विरोधात भारत, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि इतर देशांसोबत एकत्र काम करणं आवश्यक आहे. पण ट्रम्प फक्त टॅरिफ आणि तेल विक्रीकडेच लक्ष केंद्रीत करत आहेत."

"ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आहे. पण ते रशियाकडून खूप प्रमाणात तेल घेणाऱ्या चीन आणि तुर्कीयेसारख्या इतर देशांना लावलेलं नाही. यामुळे अमेरिका-भारत नात्यांमध्ये खरंच अडचण निर्माण झाली आहे."

"कदाचित ट्रम्प आणि मोदी थेट बोलू शकतील असा मार्ग असला असता, तर काही उपाय शोधता आला असता."

'ट्रम्प यांनी आणखी काय म्हटलं?'

गेल्या रविवारी (4 जानेवारी) एअरफोर्स वनमधून प्रवास करत असताना ट्रम्प यांनी साधारण अशाच प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान मोदी आणि भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफबाबत केलं होतं.

त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात प्रवास करत असलेले अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले, "ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीसाठी 25 टक्के टॅरिफ लावलं आहे. मी साधारण एका महिन्यापूर्वी भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांच्या घरी होतो. भारत आता रशियाकडून खूप कमी तेल खरेदी करत आहे आणि मी अध्यक्षांना टॅरिफमध्ये सवलत देण्यास सांगावं, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते."

एअरफोर्स वनमधील प्रवासादरम्यान ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफवर भाष्य केलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, एअरफोर्स वनमधील प्रवासादरम्यान ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफवर भाष्य केलं होतं.

"जर तुम्ही स्वस्त रशियन तेल घेत राहिलात आणि पुतिन यांचं युद्ध चालू राहू दिलात, तर आम्ही राष्ट्राध्यक्षांना टॅरिफद्वारे कठीण निर्णय घेण्याची ताकद देऊ. मला पूर्ण विश्वास आहे की, ट्रम्प यांनी भारताबरोबर जे केले, त्यामुळे भारत आता रशियाकडून खूप कमी तेल खरेदी करत आहे."

यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लिंडसे यांना रोखत म्हटलं, "त्यांना मला खूश करायचं होतं. मुळात मोदी हे खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहीत होतं की, मी खूश नाही आणि मला खूश करणं आवश्यक होतं."

ट्रम्प म्हणाले की 'ते आपापसांत व्यापार करतात' आणि जर भारताने आमचं ऐकलं नाही, तर 'आम्ही त्यांच्यावरील टॅरिफ लवकरच वाढवू' शकतो.

'रशियाकडून तेल खरेदी करणं भारताने केलं कमी'

डिसेंबरमधील तेल वितरणाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसतं की, भारतीय तेल कंपन्यांनी रशियन कंपन्यांकडून तेल खरेदी खूप कमी केली आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतातील 5 मोठ्या रिफायनरी कंपन्यांनी डिसेंबर महिन्यासाठी तेल खरेदीसाठी कोणतीही ऑर्डर दिली नव्हती.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ लावले होते.

यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचं प्रमाण लगेचच कमी केलं नव्हतं.

अमेरिकेनं रशियन कंपनी रोझनेफ्टसह ल्युकोइलवरही बंदी घातली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेनं रशियन कंपनी रोझनेफ्टसह ल्युकोइलवरही बंदी घातली आहे.

परंतु नोव्हेंबरमध्ये, रशियन तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि ल्युकोइलवर अमेरिकेने बंदी घातल्यावर, भारताच्या बहुसंख्य तेल रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणं जवळपास बंद केलं होतं.

तेल खरेदीचा रिअल टाइम डेटा उपलब्ध करून देणारी कंपनी केपलरच्या मते, भारताने 1 ते 17 नोव्हेंबर दरम्यान रशियाकडून दररोज 6 लाख 72 हजार बॅरल तेल खरेदी केलं होतं.

हे ऑक्टोबर महिन्यात दररोज खरेदी केलेल्या 18 लाख बॅरलपेक्षा खूपच कमी आहे.

पण दोन रशियन तेल कंपन्यांवर बंदी घालल्यामुळे इतर जागी रशियन तेलाची निर्यात 28 टक्क्यांपर्यंत कमी झाली होती.

भारत आणि अमेरिकेतील ट्रेड करारावरील चर्चेने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)