ट्रम्प भारतावर 500 टक्के टॅरिफ लावतील? जाणून घ्या अमेरिकेत नेमकं काय सुरू

भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ऑक्टोबर 2025 मध्ये झालेली भेट.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ऑक्टोबर 2025 मध्ये झालेली भेट.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा एका विधेयकाला सहमती दिलीय, ज्यामुळे रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफ लावलं जाऊ शकतं.

या विधेयकाद्वारे अमेरिकेला भारत आणि चीनसारख्या देशांवर दबाव निर्माण करण्याची संधी मिळेल. या देशांना रशियाकडून स्वस्त तेल घेण्यापासून रोखण्यासाठी अशी पावलं उचलली जात आहेत.

अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी बुधवारी (7 जानेवारी) सांगितलं, "याद्वारे व्हाईट हाऊसला चीन, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांना रशियन स्वस्त तेलाची आयात बंद करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल."

ग्रॅहम यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलंय की, "आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी रशिया निर्बंध विधेयकाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यावर सिनेटर ब्लूमेंथल आणि इतर काही लोक अनेक महिन्यांपासून काम करत होते."

ते म्हणाले, "युक्रेन शांततेसाठी पावलं उचलत असताना पुतिन मात्र फक्त त्याची चर्चाच करत आहेत, त्यांनी निर्दोष लोकांना मारणं सुरूच ठेवलं आहे, अशा स्थितीत हे विधेयक आलं आहे. जे देश रशियाकडून स्वस्तात तेल घेऊन पुतीन यांना युद्धखोरीला प्रोत्साहन देत आहेत त्यांना शिक्षा करण्याची परवानगी या विधेयकामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मिळेल."

ते पुढं लिहितात, "या विधेयकामुळे ट्रम्प यांना चीन, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांविरोधात दबाव तयार करण्याची ताकद देईल. जेणेकरुन हे देश रशियाचं स्वस्त तेल घेणं बंद करतील. या तेलव्यवहारांमुळेच पुतीन यांच्या युद्धाला पैसा मिळत आहे."

या विधेयकावर पुढील आठवड्यात लवकरच मतदान होईल अशी ग्रॅहम यांना अपेक्षा आहे.

भारतावर टॅरिफ

ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. यात रशियाकडून तेल खरेदी केल्याचं 25 टक्के टॅरिफही समाविष्ट आहे.

ग्रॅहम आणि ब्लूमेंथल यांनी 2025 चं रशिया निर्बंध अधिनियम सादर केला होता. त्यात युक्रेनविरोधातील युद्धाला निधी देणं सुरू ठेवणाऱ्या देशांवर टॅरिफ आणि निर्बंध लावले जातील, अशी तरतूद होती.

या विधेयकात रशियन तेलाची खरेदी आणि पुन्हा विक्री यावर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे.

रशियाची तेलकंपनी रोझनेफ्टबरोबर भागीदारी असलेल्या नायरा एनर्जी लिमिटेडचा भारतातील पंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियाची तेलकंपनी रोझनेफ्टबरोबर भागीदारी असलेल्या नायरा एनर्जी लिमिटेडचा भारतातील पंप

ग्रॅहम आणि ब्लूमेंथल यांनी गेल्यावर्षी एका संयुक्त निवेदनात म्हटलं होतं, "युक्रेन आणि रशियातील रक्तपाताला रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक नवा दृष्टिकोन स्विकारुन भक्कम पाऊल उचललं आहे. या युद्धाला संपवण्यासाठी शेवटचं पाऊल म्हणून रशियाचं स्वस्तातलं तेल आणि नैसर्गिक वायू विकत घेणाऱ्या भारत, चीन, ब्राझीलसारख्या देशांवर टॅरिफ लावणं हा आहे."

या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रॅहम म्हणाले होते, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारताने रशियाकडून तेलखरेदी कमी करण्याबद्दल माहिती दिली होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफमध्ये सवलत देण्याबद्दल सांगितलं होतं.

रविवारी एअरफोर्स वनमध्ये ट्रम्प यांच्यासह प्रवास करताना ग्रॅहम त्यांच्याशी टॅरिफ विधेयकावर बोलत होते.

युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांच्यावर दबाव आणणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, या बंधनांमुळे रशियाचं मोठं नुकसान होत आहे. त्यानंतर त्यांनी भारताचाही उल्लेख केला.

भारतीय राजदूतांची भेट

यानंतर ग्रॅहम म्हणाले, रशियन तेल घेतल्याबद्दल अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावलं आहे.

ग्रॅहम म्हणाले, "सुमारे महिन्याभरापूर्वी मी भारतीय राजदुतांच्या निवासस्थानी होतो. ते रशियाकडून तेलाची खरेदी कमी करत आहेत याबद्दल त्यांना बोलायचं होतं."

ते पुढं म्हणाले, "भारतीय राजदूतांनी मला तुम्ही राष्ट्राध्यक्षांशी टॅरिफमध्ये सूट देण्याबद्दल बोलाल का असं विचारलं."

लिंडसे ग्रॅहम

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock

फोटो कॅप्शन, लिंडसे ग्रॅहम

ग्रॅहम म्हणाले, "ही रणनिती उपयोगाची आहे. जर तुम्ही स्वस्त तेल खरेदी करुन पुतीन यांनी लादलेलं युद्ध सुरू ठेवत असाल तर राष्ट्राध्यक्षांकरवी आम्ही या कठीण पर्यायाला अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. ट्रम्प यांनी जे पाऊल उचललं, त्यामुळेच भारत आता रशियाकडून फारच कमी प्रमाणात तेल खरेदी करत आहे."

भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय राजदूतांच्या अधिकृत निवासस्थान इंडिया हाऊसमध्ये अमेरिकन सिनेटर ग्रॅहम, ब्लूमेंथल, शेल्डन व्हाईटहाऊस, पिटर वेल्च, डॅन सुलिवन, मार्कवेन मुलिनसह अनेक सिनेटर्सचं आतिथ्य केलं होतं.

क्वात्रा यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलेलं, "ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यासह व्यापार आणि महत्त्वाच्या जागतिक घडामोडींमध्ये भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीवर सार्थ चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेती दृढसंबंधांसाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)