दसरा मेळाव्यात राज-उद्धव युतीबाबत काय संकेत मिळाले? महायुतीबाबत शिंदे काय करणार? तज्ज्ञांचे विश्लेषण

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

आज विजयादशमीच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तर मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला.

यावेळेलाही दोन्ही शिवसेनेच्या प्रमुखांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

खासकरून उद्धव ठाकरे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीची घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, त्याबाबतची स्पष्ट अशी घोषणा केलेली नाही. 'मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, एकत्रच राहू,' इतपतचं भाष्य त्यांनी केलंय.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचा नेमका अन्वयार्थ काय आहे, हे आपण राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

यावेळच्या दसरा मेळाव्यातील भाषणांचं वेगळेपण काय?

यावेळच्या दसरा मेळाव्यातील भाषणांवर पावसाचं सावट होतं. मात्र, इतक्या पावसातही शिवाजी पार्कवर लोक आले होते, हे विशेष म्हणावं लागेल, असं हेमंत देसाई सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "भाजप-शिंदेंचं हिंदुत्व कसं ढोंगी आहे, यावरच उद्धव ठाकरे यांचा सर्व भर दिसून आला."

एकनाथ शिंदे

दोन्ही दसरा मेळाव्यातील भाषणावर बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की, "पावसामुळे उद्धव ठाकरेंना शक्तिप्रदर्शन करणं शक्य नव्हतं. फार काही वेगळे मुद्दे दोघांच्याही भाषणातून आले नाहीत. पण आगामी निवडणुका आणि ठाकरे बंधुंची युती यादृष्टीनेच ही भाषणं झाली."

'लेट्सअप'चे संपादक योगेश कुटे सांगतात की, "गेल्या चार-पाच दसरा मेळाव्यातील भाषणांमधील मुद्दे हे तेच तेच आहेत. पण, यावेळच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपण कामाचा आणि 'ऑन फिल्ड' जाणारा माणूस हे वारंवार बोलून दाखवलं आहे. त्यातून मीच खरा शिवसैनिक आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे."

राज-उद्धव युतीबाबत काय संकेत मिळतात?

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

त्यादृष्टीने या भाषणाकडे लोकांचं लक्ष लागून होतं. मात्र, "आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी," या विधानापलीकडे त्यांनी काहीही विशेष विधान केलेलं नाहीये.

यासंदर्भात आम्ही राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी चर्चा केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात ते पूर्वीच्याच भूमिकेत आहेत, त्यापुढे अजून काही सरकलेलं नाहीये."

पुढे, 'जागावाटप' या गोष्टीवरच या युतीचा निर्णय ठरेल, असं अभय देशपांडे सांगतात.

दुसऱ्या बाजूला, "राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे," असं लेट्सअपचे संपादक योगेश कुटे सांगतात.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

फोटो स्रोत, Shivsena UBT

फोटो कॅप्शन, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "राज ठाकरे काय भूमिका घेतील, हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, जर आज राज ठाकरे आज मेळाव्याला आले असते, तर आपण म्हणू शकलो की एक पाऊल पुढे सरकलेलं आहे. पण राज ठाकरे सुद्धा थोडा अंदाज घेत आहेत, असं दिसतंय."

यामागचं कारण स्पष्ट करताना योगेश कुटे राज ठाकरे यांचे भाजपसोबत तसेच भाजपच्या नेत्यांसोबत असलेले वैयक्तिक संबंध हेदेखील कारण असल्याचं सांगतात.

ते म्हणतात की, "राज ठाकरे यांचे ज्या पद्धतीचे संबंध भाजपसोबत आहेत, ते पाहता, त्यांची भूमिका क्लिअर नसल्यामुळे उद्धव ठाकरे ऑफर देऊन मोकळे झालेले आहेत. त्यामुळे, राज ठाकरे प्रत्यक्षात काय निर्णय घेतात, यावर युतीचा ठरणार आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी आणखी दुसरं पाऊल टाकलं, असं म्हणता येईल."

"आता प्रतीक्षा आहे ती राज ठाकरेंच्या प्रतिसादाची," असंही योगेश कुटे सांगतात.

हेमंत देसाई सांगतात की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीयेत, त्यामुळे त्यांनी ते मुद्दे आताच घेणं टाळलेलं दिसतंय."

'युतीचं जागावाटप हे शक्तीवर नाही, तर तुमच्या गरजेवर '

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभय देशपांडे या युतीसंदर्भात एक महत्त्वाचं विधान करतात.

ते म्हणतात की, "कुठल्याही युतीचं जागावाटप हे तुमच्या शक्तीवर नाही, तर तुमच्या गरजेवर ठरतं."

ते सांगतात की, "जोपर्यंत जागावाटपाच्या गोष्टी होत नाहीत, तोवर राज ठाकरे वचन देणार नाहीत, हे स्पष्ट आहेत. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत, एकत्र आहोत, असं काहीही म्हटलं तरी शेवटी फायनल जे होणार ते जागावाटपावरच."

मात्र, शिवसेना-मनसे या दोन्हीही पक्षांना एकसारख्याच मतदारसंघात इंटरेस्ट आहे, असंही ते सांगतात.

ते म्हणतात की, "भाजप आणि शिवसेना युती असताना जे जागावाटप व्हायचं, त्यात एकानं मराठीबहुल भाग आणि एकाने अमराठी बहुल भाग असं वाटलं जायचं. मात्र, आता मनसे आणि ठाकरे सेना या दोघांचंही स्ट्राँग वॉर्ड एकत्रच असल्याने तिथं क्लॅशेस असणार आहेत."

"त्यामुळे, शिवसेनेने मागच्या वेळेस जिंकलेल्या जागा मनसेला हव्या असू शकतात. त्यामुळे, ते पुढचं सगळं एवढं सोपं असणार नाही. आणि जोपर्यंत हे आहे, तोपर्यंत कुठलाही संकेत द्यायचा नाही, अशी मनसेची भूमिका दिसतेय. त्यामुळे, ते या भाषणात फार पुढे जाऊ शकले नाहीत," असं विश्लेषण ते करतात.

योगेश कुटेही हाच मुद्दा अधोरेखित करताना दिसतात.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

ते म्हणतात की, "निवडणूक जाहीर होणं, वॉर्ड रचना जाहीर होण्यापर्यंत दोघेही अंदाज घेत आहेत. भाजपला वाटत असावं की अजूनही आपण राज यांना उद्धव यांच्यासोबत जाण्यापासून रोखू शकतो."

आता या परिस्थितीत, गमावण्यासारखं उद्धव ठाकरेंकडेच अधिक आहे. राज ठाकरेंना गमवायचं काहीच नाहीये. त्यामुळे, त्यांना इप्सित असलेला हिस्सा ते मागणारच, असाही एक मुद्दा अभय देशपांडे मांडतात.

मात्र, राज ठाकरे यांच्यासोबत आपली युती होणारच आहे, अशी हिंट उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पुन्हा एकदा दिली आहे, असं हेमंत देसाई सांगतात.

ते म्हणतात की, "मग 5 जुलैला काय केलं आम्ही असं ते म्हणाले. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, यावरही त्यांनी भर दिलाय. तसेच मराठी मतांमध्ये फाटाफूट पडू देणार नाही, हेदेखील त्यांनी पुरेसं स्पष्ट केलं आहे."

मात्र, आतापासूनच एकत्र आलोच आहोत, अशी उद्घोषणा झाली तर त्याचा काऊंटर अटॅकदेखील आतापासूनच सुरू होईल. तो टाळण्याकरिता निवडणूक जाहीर झाल्यावरच युती जाहीर करणं त्यांना योग्य वाटत असावं, असं हेमंत देसाई सांगतात.

'ठाकरेंनी शिंदेंपेक्षा भाजपला घेतलं अंगावर'

दसरा मेळाव्याच्या या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर एक दोन उल्लेख वगळले तर फारशी टीका केली नाही, त्यांचा रोख हा भाजपकडे होता असं योगेश कुटेंना वाटतं.

ते म्हणतात की, "एखाद वाक्यापलीकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना अनुल्लेखलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट अंगावर घेतलेलं नाही. त्यांनी भाजपलाच टार्गेट केलेलं आहे. यातून, मराठी मतांच्या मुद्द्याची लाईन पुढे जाताना दिसते आहे. शिंदेंना अंगावर घेण्यापेक्षा भाजपलाच अंगावर घ्यावं, असं त्यांचं मत बनलेलं दिसतंय."

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, SHIVSENA and Shivsena (UBT)

हेमंत देसाईदेखील हाच मुद्दा अधोरेखित करतात. ते म्हणतात की, "कदाचित त्यांचं असं धोरण असावं की, त्यांच्यावर जेवढा तुम्ही हल्ला कराल, तेवढं मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याला फारसं महत्त्व देताना दिसले नाही. याउलट भाजपचं आपला मुख्य शत्रू आहे, यादृष्टीने ते टीका करताना दिसले."

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचं विश्लेषण करताना अभय देशपांडे म्हणतात की, "शिंदेच्या भाषणातून हे स्पष्ट झालं की, आम्ही या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत आणि जिंकणार आहोत."

पुढे ते सांगतात की, "ज्या प्रकारे त्यांनी मोदी-शहा, भाजप वा आरएसएस सगळ्यांच्याच बाबत सकारात्मक बोलून आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, हे स्पष्ट करून टाकलंय, ते पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपलं राजकारण हे भाजपसोबतच असेल, हे त्यांनी स्पष्ट केलंय."

ठाकरेंची मोदी-संघावर टीका तर शिंदेंकडून मोदींचं कौतुक

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जी हिंदुत्व सोडलंय, अशी टीका केली जाते, त्याला सडेतोड उत्तर या भाषणातून दिलं आहे, असं योगेश कुटे सांगतात.

ते म्हणतात की, "हे प्रत्युत्तर देताना त्यांनी थेट मोहन भागवतांना अंगावर घेतलेलं आहे. त्यांच्या भाषणातून हे दिसतं की त्यांना मुस्लिमांना सोडायचं नाहीये, त्यांची जी मुस्लीम व्होट बँक आलेली आहे, ती हातातून जाणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतलेली आहे. जो या देशामध्ये राहतो, तो हिंदू हा जो बाळासाहेबांचा दाखला त्यांनी दिलेला आहे. त्यातून त्यांना हे दाखवून द्यायचं आहे."

पुढे ते सांगतात की, "याउलट, मोहन भागवत यांच्या काही कृतींचे दाखले देत मुस्लिमांना भेटण्याचे त्यांचे अनुनय करण्याचे दाखले देत त्यांनी भाजपला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, जे हिंदुत्व सोडलंय, हे जे त्यांना निलेश राणे, प्रसाद लाड, दरेकर वगैरे भाजपचे कुणीही नेते त्यांना म्हणत होतं, त्यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तो एक मुद्दा सुरक्षित केला आहे," असं ते सांगतात.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जी हिंदुत्व सोडलंय, अशी टीका केली जाते, त्याला सडेतोड उत्तर या भाषणातून दिलं आहे, असं योगेश कुटे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जी हिंदुत्व सोडलंय, अशी टीका केली जाते, त्याला सडेतोड उत्तर या भाषणातून दिलं आहे, असं योगेश कुटे सांगतात.

दुसऱ्या बाजूला, एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचं प्रचंड कौतुक केल्याचं दिसलं. तसेच मराठवाड्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या मदतीचं भांडवल करतानाही ते दिसले, असंही अभय देशपांडे सांगतात.

ते सांगतात की, "शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे हात हालवत गेले आणि आम्ही मदत देतो आहोत. मुलामुलींच्या लग्नाची जबाबदारी वगैरेचा मुद्दाही त्यांनी शेवटी बोलला. मुळात आपत्तीच्या काळामध्ये कोण मदतीला जातं, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. साधारणत: पुढच्या निवडणुकासाठी त्यांचं हेच लक्ष्य आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे, शिंदेंचे सगळे लक्ष ग्रामीण महाराष्ट्राकडे दिसला," असं ते सांगतात.

हेमंत देसाई सांगतात की, "दसरा मेळाव्यांमधील या भाषणातून आतापासूनच महापालिकेची शर्यत सुरू झाली आहे, असं काही दिसलेलं नाही. नेहमीचे जे मेळावे होतात, तसेच हे मेळावे झालेले दिसत आहेत. अजून अधिकृतपणे निवडणुकीची घोषणा झालेली नाही आणि या निवडणुका पुरामुळे पुढे जाण्याचीच शक्यता असल्याने लगेच कसल्याही निष्कर्षाप्रत येणं घाईचं ठरेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)