आसाम : मिया म्हणजे नेमका कोणता समुदाय? तो वादात का सापडला आहे?

- Author, दिलीप कुमार शर्मा आणि झोया मतीन
- Role, बीबीसी न्यूज
मोहितोन बीबीचा मुलगा बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात आहे. तो येईल या आशेने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत.
ईशान्येकडील आसाम राज्यातील गोलपारा जिल्ह्याच्या एका गावात राहणाऱ्या मोहर अलीने त्याच्याच घरात एक छोटंसं संग्रहालय उघडलं होतं.
त्याचं हे संग्रहालय 'मिया' या मुस्लिमांच्या संस्कृतीला म्हणजेच बंगाली भाषिक मुस्लिमांच्या संस्कृतीला समर्पित करण्यात आलंय. यासंदर्भात मोहर अलीला महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली.
मोहर अली एका स्थानिक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्याने हे संग्रहालय उभारण्यासाठी 7,000 रुपये खर्च केले. यात शेतीशी संबंधित अवजारं, कपडे आदी गोष्टी होत्या.
संग्रहालय सुरू करून अगदी दोनच दिवस झाले असतील तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संग्रहालय बंद केलं. त्यांनी अलीचं घर देखील सील केलं.
त्यांचं म्हणणं होतं की, सरकारी योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या घराचा अशा चुकीच्या पद्धतीने व्यावसायिक कारणांसाठी वापर करता येणार नाही.
अलीला संग्रहालय सुरू करण्यासाठी ज्या दोघांनी मदत केली त्या दोघांनाही अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, संग्रहालय सुरु केलं म्हणून अलीला अटक केलीय असं नाही. तर दोन दहशतवादी गटांशी त्याचे कथित संबंध असल्याची शंका आहे.
आणखीन तीन जणांना दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्यामुळे त्यांना जामीन मिळवणं अशक्य झालंय.
या अटकेमुळे आसाम मधील बंगाली भाषिक मुस्लिम समुदायाला धक्का बसलाय.
अलीची आई पाणावलेल्या डोळ्यांनी विचारते, "त्याने नक्की काय गुन्हा केलाय?"
तज्ज्ञ सांगतात की, अलीला झालेली अटक ही भाषिक ओळख आणि नागरिकत्व या राजकीय मुद्द्यांना धरून झाली आहे. बहु-जातीय राज्य असलेल्या आसाममध्ये हा मुद्दा अत्यंत क्लिष्ट आहे.
आसाममध्ये बंगाली आणि आसामी भाषिक हिंदू, आदिवासी आणि मुस्लिम असे लोक आहेत. यातच शेजारच्या बांग्लादेशातून आलेले मुस्लिम सुध्दा आहेत.
आसाममध्ये अनेक दशकांपासून स्थलांतरविरोधी चळवळ सुरू आहे. बंगाली भाषिक मुस्लिमांवर, स्थलांतरित असल्याचा ठपका ठेवला जातो.
2016 मध्ये सत्तेतवर आल्यापासून, भाजप मुस्लिमांप्रती भेदभाव करणारी धोरणं जाहीर करतंय. यातून त्यांनी हिंदू आणि आदिवासी समुदायांच्या मतांचा टक्का वाढवला आहे.
विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक राजकारण्यांनीही भाषणांमध्ये या समुदायावर निशाणा साधलाय.
2021 मध्ये पुन्हा सत्तेवर परतल्यानंतर, भाजप सरकारने अवैध अतिक्रमणाच्या नावाखाली हजारो लोकांची जबरदस्तीने हकालपट्टी केली. यात मोठ्या संख्येने होते, बंगाली भाषिक मुस्लिम.
या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने पाच मुस्लिम गटांना "मूळ आसामी" समुदाय म्हणून घोषित केलं आहे. यातून भेदभाव आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे.
डॉ. हाफिज अहमद या समुदायासोबत काम करतात. ते सांगतात, "बंगाली वंशाचे मुस्लिम आता राजकारणात सॉफ्ट टार्गेट बनलेत."
"मिया लोक हे आसामी समाजाचा भाग नसून ते आपले शत्रू आहेत अशी प्रतिमा बहुसंख्यांकांपुढे उभी केली जात आहे."
भाजपचे वरिष्ठ नेते विजय कुमार गुप्ता मात्र अशा गोष्टी फेटाळून लावतात. ते म्हणतात की, काही तिऱ्हाईत लोक समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते पुढे सांगतात की, "संग्रहालयात तुमच्या सांस्कृतिक वारशाचं जतन केलं जातं. पण तिथे असं काहीच घडत नव्हतं."

संपूर्ण दक्षिण आशियामध्ये, मिया हा शब्द मुस्लिम पुरुषांसाठी सन्मानार्थ वापरला जातो.
पण आसाममध्ये, हा शब्द अपमानित करण्यासाठी वापरला जातो. स्वातंत्र्य पूर्वकाळात बंगालच्या काही भागांतून मुस्लिम शेतकरी आसाममध्ये स्थलांतरित झाले होते.
या मुस्लिम शेतकऱ्यांचं वर्णन करण्यासाठी हा मिया शब्द वापरला जातो. आसाम आणि बांग्लादेशात जवळपास 900 किलोमीटर सीमारेषा आहे.
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल भागात चार नावाचं एक बेट आहे. या स्थलांतरितांपैकी बहुसंख्य लोक या बेटावर स्थायिक झाले आहेत. या बेटावर इतर समुदायातील लोकही राहतात.
चार बेटावर राहणारे बहुसंख्य शेतकरी गरीब आणि रोजंदारीवर काम करणारे आहेत. आणि या शेतकऱ्यांचं उत्पन्नही नदीवर अवलंबून आहे.
इथं राहणाऱ्या लोकांना भेदभावाचाही सामना करावा लागतोय. त्यांना बहुतेकवेळा घुसखोर म्हणून हिणवलं जातं. हे लोक आसामी भाषिकांच्या आणि आदिवासींच्या नोकऱ्या, जमीन आणि संस्कृती ताब्यात घेत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय.
परंतु मागच्या काही वर्षात बंगाली मुस्लिम समाजाने त्यांचा इतिहास स्वीकारलाय. त्यांनी मिया या शब्दाला स्वतःची ओळख बनवलंय.
गोलपारा इथं मिया नामक संग्रहालय तयार केलंय. त्यात पारंपारिक शेतीची साधने, बांबूपासून बनविलेले मासेमारीचे गळ, हाताने विणलेलं आसामचं पारंपारिक वस्त्र गामुसा बघायला मिळतं. अली सांगतात, या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू मिया लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
पण भाजपच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारे संग्रहालय उभारून अलीने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय. तसेच त्याच्या या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू बंगाली भाषिक मुस्लिम समुदायाशी संबंधित नसून आसामची ओळख आहे.
मागच्या महिन्यात मुख्यमंत्री सरमा म्हणाले होते की, "मिया नावाचा कोणता समुदाय अस्तित्वात तरी आहे का?" हे संग्रहालय बंद करण्याच्या काही तास आधी सरमा यांनी हे वक्तव्य केलं होतं.
अशा पद्धतीचं एक संग्रहालय असावं अशी कल्पना 2020 मध्ये काँग्रेसचे माजी नेते शर्मन अली अहमद यांनी मांडली होती. ते नेहमीच या समुदायाची बाजू घेताना दिसतात. याबाबतीत त्यांना सरमा सरकारच्या रोषाला ही सामोरं जावं लागलंय.

हे सगळं होण्याआधी म्हणजे 2019 मध्ये काही कवींनी मिया समाजाविषयी ज्वलंत कविता लिहिल्या होत्या. त्यांनी त्याला मिया कविता असं संबोधलं.
त्यांनी या कविता आसामी भाषेऐवजी मिया समुदायाच्या बोलीभाषेत लिहिल्या होत्या. यातल्या 10 कवींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
शर्मन अली अहमद बीबीसीशी बोलताना म्हणाले की, सरकारने अनुदान दिलेल्या घरात संग्रहालय सुरू करणं योग्य नव्हतं. पण अलीला जी शिक्षा दिली आहे ती जरा जास्तच वाटते.
"त्याने कोणताही मोठा गुन्हा केलेला नाही. पण सरकारने ही कारवाई मिया समुदायाला घाबरवण्यासाठी केल्याचं दिसतं."
डॉ. अहमद सरकारवर आरोप करताना म्हणतात की, सरकार राज्याच्या लोकसंख्याशास्त्रीय जटिलतेचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांत आहे. आसामी लोकांना असं वाटतं की, हे स्थलांतरित आपली जागा बळकावतील. आणि सरकार आसामी लोकांच्या याच चिंतेला हाताशी धरून ध्रुवीकरण करताना दिसतंय.
दरम्यान, अलीच्या गावातील बहुतेक लोक या अटकेमुळे हैराण झालेत. यातल्या बहुतेक गावकऱ्यांनी पुढं त्रास नको म्हणून अली आणि संग्रहालयाविषयी बोलण्यास टाळाटाळ केली.
अलीच्या गावात राहणारे शहीद अली म्हणतात, "या वादाचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. आम्हाला संग्रहालय नकोत, आम्हाला नोकऱ्या, रस्ते आणि वीज हवी आहे."
डॉ. अहमद म्हणतात की, संग्रहालय काही कामाचं नसेल तरी प्रत्येक समुदायाला त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार असतो.
ते सांगतात, "इतक्या वर्षांच्या छळानंतर, मिया मुस्लिम स्वतःची जागा निर्माण करू पाहतायत."
आणि संस्कृतीशिवाय एखाद्या समुदायचं अस्तित्व कसं काय असू शकेल?











