अनुराग द्विवेदीः सायकलपासून सुपरकारपर्यंत प्रवास करणारा युट्यूबर ईडीच्या जाळ्यात कसा सापडला?

    • Author, सैयद मोज़िज़ इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील युट्यूबर आणि स्वतःला फँटसी क्रिकेट तज्ज्ञ म्हणवणाऱ्या अनुराग द्विवेदीचं आयुष्य अतिशय वेगानं बदललं. पण आता हाच वेगानं झालेला प्रवास ईडीच्या रडारवर आला आहे.

17 डिसेंबर रोजी ईडीने उन्नाव जिल्ह्यातील नवाबगंज इथल्या त्याच्या घरी छापा टाकला.

या कारवाईl ईडीने कोट्यवधी रुपये आणि आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

ईडीनं शुक्रवारी संध्याकाळी एक्सवर एक पोस्ट करुन अनुरागशी संबंधित असलेल्या लखनौ, दिल्ली, उन्नाव इथल्या 10 जागांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

अनुरागने बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मला प्रमोट करण्यासाठी सक्रीय भूमिका बजावल्याचं या तपासात समजलं आहे, असं ईडीचं म्हणणं आहे.

ईडीनं सांगितलं की, "असं समजतंय की त्यानं वेगवेगळ्या हवाला मार्गांचा वापर करुन बनावट खात्यांद्वारे अवैध बेटिंग अँप्समधून कमाई केली. तो अवैध बेटिंग अँप्ससाठी प्रमोशनल व्हीडिओ तयार करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो.

या व्हीडिओंद्वारे सामान्या लोकांना बेटिंगसाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यांच्या कंपन्यांच्या बँक खात्यांत तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यांमध्ये कोणत्याही रास्त व्यवहारांविना मोठी रक्कम जमा झालेली दिसते."

ईडीच्या या छाप्यांमध्ये लँबोर्गिनी, मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यूसह अनेक महागड्या जप्त करण्यात आल्या. या सर्व गाड्या ईडीनं लखनौमधील प्रादेशिक कार्यालयाच्या परिसरात पाठवल्या आहेत.

ईडीच्या छाप्यानंतर अनुराग द्विवेदीनं एक्सवर लिहिलं, "अरे भावांनो मला जेवढं माझ्याबद्दल माहिती नव्हतं तितकी माहिती माध्यमांतून मला दोन दिवसांत मिळाली."

त्यानं लिहिलंय, "कोणी काय लिहितंय.. कोणी कोणाचंही नाव जोडतंय. कोणी मोठी रक्कम मिळाल्याचं सांगतंय, ना शेंडा ना बुडखा... बाप रे बाप... आता कळलं लोक माध्यमांना कसं सहन करतात ते."

अनुराग द्विवेदी कोण आहे?

अनुराग द्विवेदी उन्नाव जिल्ह्यात नवाबगंज तालुक्यात राहाणारा आहे.

26 वर्षांचा अनुराग फँटसी क्रिकेटवर व्हीडिओ तयार करू लागला. त्याचे वडील गावाचे सरंपचही होते. त्यांचं नवाबगंजला एक दुकानसुद्धा आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग पूर्वी गावातच राहायचा. 2017 पासून तो युट्यूबवर व्हीडिओ करू लागला असं ईसीएल चॅनलवरच्या एका व्हीडिओत अनुरागने सांगितलं आहे.

तिथल्याच एका पॉडकास्टमध्ये 2019 पासून फँटसी लिग प्लॅटफॉर्मशी त्याचा संबंध आला आणि तो त्यांच्या प्रमोटरबरोबर काँटेट क्रिएटर झाला, असं सांगण्यात आलंय.

अनुरागचे युट्यूबवर जवळपास 70 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर 24 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

विवाह आणि जीवनशैली

याच वर्षी 22 नोव्हेंबर रोजी अनुरागने लखनौच्या एका मुलीशी दुबईत लग्न केलं. त्याच्या भव्य विवाहसोहळ्याची चर्चाही झाली.

स्थानिकांच्या मते त्यांनी गावातले जवळचे लोक आणि नातलगांसह सुमारे 100 लोकांना दुबईला बोलावलं होतं. तिथं पाहुण्यांच्या येण्याजाण्याची आणि राहाण्याची व्यवस्था अनुरागने केली होती.

अनुराग एंटरटेनमेंट क्रिकेट लिगशीसुद्धा संबंधित आहे. तो लखनौ लायन्स टीममध्ये आहे.

ही एक फ्रँचायजी आधारित क्रिकेट टुर्नामेंट असते. यात आठ संघ आहेत आणि त्यांचं नेतृत्व लोकप्रिय सोशलमीडिया स्टार करतात.

ही लिग टेनिस बॉल टी-10 फॉरमॅटमध्ये खेळली जाते. या लिगसाठी 1 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलेलं आहे.

ईसीएलच्या एका पॉडकास्टमध्ये अनुरागने त्याची संपत्ती 190 कोटी रुपयांच्या आसपास असेल असं म्हटलं होतं. 2016 पासून तो फँटसी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करतोय असं त्यानं सांगितलं होतं.

सायकल ते सुपरकारपर्यंतचा प्रवास

याच पॉडकास्टमध्ये त्यानं तो टाटा मॅजिक गाडीने शाळेत जायचा असं सांगितलं होतं. आता त्याच्याजवळ लँबोर्गिनी आहे (या गाडीची किंमत सुमारे पाच कोटी आहे) असंही त्यानं सांगितलं होतं.

ही कार आपण ताशी 288 किमी वेगानं चालवल्याचं त्यानं सांगितलं होतं. एकेकाळी आपण सायकल चालवायचो असंही त्यानं या कार्यक्रमात सांगितलं होतं.

अनुरागच्या विरोधात आता सुरू असलेला तपास हा सिलिगुडीमध्ये दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

एक ऑनलाईन बेटिंग रॅकेट उघडकीस आल्याचं ईडीनं याच वर्षी जूनमध्ये जाहीर केलं होतं. हा एफआयआर फसवणूक, बनावट व्यवहार आणि अवैध ऑनलाईन बेटिंगशी संबंधित आहे.

सिलिगुडीमधून एक ऑनलाईन बेटिंग पॅनल अनेक लोकांद्वारे चालवण्यात येत होतं असं यात म्हटलं होतं.

ईडीच्या प्रेसनोटनुसार, या प्रकरणात विशाल भारद्वाज आणि सोनू कुमार यांना अटक झाली.

पण 8 ऑगस्टला काढलेल्या प्रेसनोटमध्ये आरोपींकडे 17 क्रेडिट कार्डंस आणि 1130 म्यूल खाती सापडली. ती गोठवण्यात आली. त्यात जवळपास 10 कोटी रुपये आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 'काही लोकांनी अवैध ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मला प्रमोट करण्याचं काम केलं आहे असं तपासात दिसलं. हे लोक युट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रमोशनल व्हीडिओ करतात. त्याबदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळाली.'

ईडीच्या माहितीनुसार, 'टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपद्वारे लोकांशी संपर्क ठेवला जायचा. मग लोक म्यूल खात्यांत पैसे जमा करायचे. त्यावर खातेदारांची काही मालकी नसायची पण त्यांना बदल्यात पैसे दिले जायचे.'

म्यूल खाती म्हणजे ही खाती एका वेगळ्या व्यक्तीच्या नावावर असतात पण त्यावरचे व्यवहार तिऱ्हाईत लोकच करत असतात.

तपासाची व्याप्ती

तपासात अनुरागचं नाव पुढे आलं. अनुरागवर फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्माद्वारे कोट्यवधी रुपयांच्या सट्ट्याशी संबंध असल्याचा आणि त्यातून मिळालेला पैसा विविध मार्गांनी गुंतवल्याचा आरोप आहे, असं ईडीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

त्याने जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ही रक्कम मोठी असल्याचा ईडीला संशय आहे.

या नेटवर्कमध्ये आणखी कोण आहे आणि ते किती मोठं आहे याचा तपास सुरू आहे असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.

अनुरागचं दुबई कनेक्शनही आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीनं त्याला पहिल्यांदा समन्स दिलं तेव्हा तो हजर झाला नाही.

दुबईत त्यानं स्थावर मालमत्ता विकत घेतली असावी आणि गेली काही वर्षं तो ही खरेदी करतोय असा ईडीला संशय आहे.

त्यानं दुबईत एका आलिशान क्रुझवर केलेलं लग्नही सोशल मीडियात चर्चेमध्ये होतं.

या कारवाईत लखनौ परिक्षेत्रातील ईडी टीम सक्रीयरित्या सहभागी आहे. त्याचं लग्न, संपत्ती आणि परदेशातील गुंतवणूक यातल्या पैशाच्या स्रोताचा सखोल तपास आवश्यक आहे असं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सध्या त्याच्या उत्पन्नाच्या खऱ्या स्रोतांचा तपास सुरू आहे. याबाबत त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

अनुरागच्या वडिलांशी फोनवर बोलणं होऊ शकलेलं नाही. आपलं उत्पन्न अचानक वाढलंय पण आपण कर भरत आलो आहोत असं अनुरागचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)