वर्ल्ड कप : पाकिस्तानचा श्रीलंकेवर शानदार विजय,टीम इंडियासाठी हे खेळाडू धोक्याची घंटा?

Abdullah Shafique Mohammad Rizwan

फोटो स्रोत, Getty Images

अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्ताननं श्रीलंकेला सहा विकेट्सनी हरवून विक्रमी विजयाची नोंद केली.

श्रीलंकेनं दिलेलं 345 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 48.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. धावांचा पाठलाग करताना आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर शफीक आणि रिझवान ही जोडी पाकिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली.

या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या शफीकनं 103 बॉलमध्ये 113 धावा केल्या. त्यानं रिझवानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागिदारी केली.

तर रिझवाननं 121 चेंडूंमध्ये नाबाद 131 धावा केल्या. त्यालाच सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कुशल मेंडिसनं 77 चेंडूंमध्येच 122 धावांची खेळी केली तर सदीरा समरविक्रमानंही 89 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली.

त्यामुळेच लंकेला 50 षटकांत 9 बाद 344 धावा करता आल्या. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी लंकेला विजयाचं सुख लाभू दिलं नाही.

पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यांच्या या खेळाडूंचा फॉर्म भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

पाकिस्तानच्या या खेळाडूंपासून भारताला धोका

एरवी पाकिस्तानची फलंदाजी अनेकदा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर अवलंबून असते. बाबर पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरला असला तरी रिझवान सातत्यपूर्ण कामगिरी करतोय.

रिझवाननं श्रीलंकेविरुद्ध 121 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 131 धावांची खेळी केली तर त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 धावा केल्या होत्या.

पण फक्त रिझवानच फॉर्ममध्ये आहे असं नाही.

Rizwan

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद रिझवान, लंकेविरुद्ध शतक साजरं करताना

पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफिकनं वर्ल्ड कपमध्ये पदार्पणातच शतक साजरं केलंय.

श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत अनुभवी फखर झमानऐवजी शफिकला खेळण्याची संधी मिळाली, आणि कर्णधाराचा विश्वास त्यानं सार्थ ठरवला.

त्यानं मोहम्मद रिझवानसह 176 धावांची भागीदारी रचली आणि पाकिस्तानला 2 बाद 37 अशा अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काडलं. शफीकनं 103 चेडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 113 धावा केल्या आणि श्रीलंकेविरुद्ध विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

वेगवान गोलंदांजसह फिरकी गोलंदाजीही उत्तम खेळणाऱ्या शफीकसाठी भारतीय टीमला खास नियोजन करावं लागेल.

अब्दुल्ला शफिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अब्दुल्ला शफिक

पाकिस्तानकडून पाचव्या क्रमांकावर खेळायला येणारा सौद शकील देखील या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करतोय.

आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शकीलनं नेदरलँड्स विरुद्ध 68 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात पाकिस्तानच्या तीन विकेट्स झटपट पडल्यानंतर त्यानं रिझवानसोबत महत्त्वाची भागिदारी केली होती आणि सामनावीराचा किताब पटकावला होता.

तर श्रीलंकेविरुद्धही अब्दुल्ला शफीक आऊट झाल्यानंतर कोणतीही गडबड होणार नाही याची काळजी शकीलनं घेतली.

सौद शकीलनं लंकेविरुदध 31 धावांची खेळी करताना रिझवानसह 95 धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानला तीनशे धावांची वेस ओलांडून दिली.

शकील पाचव्या क्रमांकावर उत्तम खेळत असल्यानं पाकिस्तानची मधली फळी मजबूत झालीय.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)