थेंबभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या कतारने फुटबॉल पिच हिरवीगार ठेवायला पाणी कसं आणलं?

कतार, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कतार वर्ल्डकप

फुटबॉल प्रेमींसाठी आजचा दिवस (18 डिसेंबर) विशेष महत्वाचा असणार आहे. कारण कतारच्या लुसेल स्टेडियमवर फुटबॉल वर्ल्डकपची फायनल होणार आहे.

ही मॅच अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी असून टूर्नामेंटच्या सुरुवातीलाच स्टेडियमच्या पीचवर जवळपास हजारो लीटर पाणी फवारलंय.

आता कतार म्हटलं की, डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं ते वाळवंट. त्यामुळे या वातावरणात स्टेडियम निदान खेळण्यालायक राहावं यासाठी ग्राउंड स्टाफकडून दररोज 10,000 लीटर पेक्षा जास्त पाण्याची फवारणी केली जातेय.

कतारमध्ये नाही म्हटलं तरी असे डझनभर पीच आहेत आणि वर्ल्डकपसाठी आलेल्या टीम्स कतारमधल्या या स्टेडियम्सवर सराव करत होत्या.

पाण्याच्या टंचाईचा विषय बघितला तर जगात सर्वाधिक पाणीटंचाई कतारमध्ये आहे. हिरवीगार राहावीत म्हणून इथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा शिडकावा केला गेला. यावरून या टूर्नामेंटचं यजमानपद भूषवणाऱ्या कतारला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे लक्षात येईल.

वाळवंटातला देश

कतार, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फुटबॉल वर्ल्डकपसाठी प्रचंड पाणी लागलं.

वर्ल्डकपसाठी जी आठ स्टेडियम निश्चित केली आहेत, तेथील ग्राउंड स्टाफसमोर बरीच आव्हानं असू शकतात.

जर समजा मूळ योजनेनुसार या वर्ल्डकपच्या मॅचेस उन्हाळ्यात खेळवण्यात आल्या असत्या तर एकूण 136 पीचसाठी दिवसाला जवळपास 50,000 लिटर पाणी लागलं असतं.

कतारसाठी स्टेडियम पीच बनवणारे कर्मचारी सांगतात की, त्यांच्या देशात जी आव्हानं आहेत त्यापेक्षा खूप वेगळी आव्हानं कतारसमोर आहेत.

जर एखादी इमर्जन्सी उद्भवली तर, त्यासाठी कतारची राजधानी दोहाच्या उत्तरेकडील 425000 चौरस मीटरवर इमर्जन्सी ग्रास वाढवण्यात आलं होतं. यासाठी रिसायकल केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला होता. वर्ल्डकपसाठी ज्या पीच तयार करण्यात आल्यात त्यावर पाणी मारण्यासाठी कृत्रिम पद्धतीने पाणी तयार करण्यात आलंय. हे पाणी डिसॅलिनेशन प्रक्रियेद्वारे तयार केलं जातंय.

कतार विद्यापीठातील जलविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक राधोउयान बिन हमादोउ म्हणतात, "जर नैसर्गिकरित्या उपलब्ध पाण्यावर गुजराण करायची असेल तर मग कतारमध्ये केवळ 14000 लोकच राहू शकतात."

"या पाण्याचा विचार करता, नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारं हे पाणी वर्ल्डकप स्टेडियमसाठी लागणाऱ्या पाण्याच्या एक चतुर्थांश सुद्धा नाहीये."

कतारमध्ये कोणती नदी नाहीये, इथं दरवर्षी 10 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो.

वाढती समस्या

कतार, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कतारमध्ये पाण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कतारमध्ये आज 29 लाख लोक राहतात. कतारची लोकसंख्या आणि तिथं उपलब्ध असणारं पाणी यात जमीनआस्मानाचं अंतर आहे. त्यामुळे कतारला आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करावा लागतो. यूके सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट मधील फिशरीज आणि एक्वाकल्चर सायन्सचे मध्य पूर्व कार्यक्रमाचे संचालक डॉ. विल ले क्वीजेन सांगतात, "अर्थात यातलं बरंचसं पाणी डिसॅलिनेशन मार्फत येतं. घरगुती आणि वैयक्तिक वापरासाठी जे पाणी लागतं त्याच्या जवळपास 100 टक्के पाणी या प्रक्रियेतून मिळतं."

या प्रक्रियेअंतर्गत समुद्रातून खारट पाण्यावर प्रक्रिया करून त्यातील मीठ आणि इतर अशुद्ध पदार्थ काढून टाकले जातात. त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य ठरतं.

कतारमध्ये मोठ्या प्रमाणात डिसॅलिनेशन प्रक्रिया केली जाते. पण आता जे गोड्या पाण्याचं उत्पादन आहे ते वाढवायला हवं. कारण कतार वेगाने प्रगती करतोय. आता कतारने वर्ल्डकपचं आयोजन केलं. इथून पुढे आणखीन मोठ्या खेळांच्या टूर्नामेंट भरवण्याचं कतारचं प्रयोजन आहे. वर्ल्डकप दरम्यान सुमारे दहा लाख पर्यटक कतारमध्ये आले. अशा स्थितीत पाण्याचा वापर सुमारे 10 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज देण्यात आला होता.

कतारकडे समुद्र किनारा असल्यामुळे त्यांच्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक वायू, नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक संसाधने आहेत. त्यामुळे डिसॅलिनेशन प्रक्रिया करणं त्यांना अवघड नाही. फक्त यात मोठा तोटा आहे तो म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो.

डॉ. विल ले क्वीजेन सांगतात, "आखाती देशांमध्ये डिसॅलिनेशनसाठी जी 99.9 टक्के ऊर्जा वापरली जाते ती हायड्रोकार्बन इंधनाच्या स्वस्त पुरवठ्यातून वापरली जाते."

मात्र तेल आणि गॅस अशा हायड्रोकार्बन इंधनांमुळे खूप प्रदूषण होतं. पण कतार पर्यावरणाबाबतही खूप महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन ठेऊन आहे.

कतारला 2030 पर्यंत ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात 25% कपात करायची आहे. या फुटबॉल वर्ल्डकपच्या आयोजन समितीने दावा केल्याप्रमाणे या वर्ल्डकपमध्ये शून्य टक्के कार्बनचं उत्सर्जन झालंय.

कार्बन मार्केट वॉचसारख्या पर्यावरणीय गटांनी कतारच्या या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.

पण कतार त्यांचं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वास्तविक बदल करत असल्याचं नाकारता येणार नाही.

ग्रीन गोल

कतार, फुटबॉल वर्ल्डकप

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सौरऊर्जा

डॉ. विल ले क्वीजेन सांगतात, "सध्या यावर खूप कामं सुरू आहेत."

"डिसॅलिनेशनसाठी सौरऊर्जेचा वापर करता येईल का या शक्यतेवर सध्या कतार काम करतोय. ते सोलार पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती करून रिव्हर्स ऑस्मोसिस करू शकतात. सोबतच सूर्याच्या उष्णतेचा थेट वापर करून पाण्याची वाफ केली जाऊ शकते."

रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये पाण्याला एका मेम्बरॅन मध्ये सोडलं जातं. यात पाण्यातील अशुद्धता दूर केली जाते. त्यानंतर पाण्याला गरम करू त्याचं बाष्पीभवन करतात आणि नंतर त्याला थंड करतात. या पद्धतीने शुद्ध पाणी मिळतं.

मध्यंतरी एका राजकीय वादानंतर कतारच्या शेजारील देशांनी कतारावर बहिष्कार टाकला होता. याचा परिणाम कतारला अन्नधान्याच्या टंचाईला सामोरं जावं लागलं होतं.

या सगळ्यातून धडा घेत कतारने देशांतर्गत शेती आणि दूध उत्पादनाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. कोरडवाहू शेती आणि पशुपालनावर भर दिला जातोय. पण या सगळ्यामुळे कतारच्या नैसर्गिक जलस्रोतांवर दबाव वाढेल. डॉ. बे हमादोऊ सांगतात, "जलस्त्रोतातील एक तृतीयांश भाग शेतीसाठी वापरला जातो. आणि कतारच्या सकल देशांतर्गत उत्पादनात शेतीचा वाटा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. इथली शेती जवळपास 0.1 टक्के इतकीच आहे."

कृषी उत्पादनातून आर्थिक फायदा मिळावा हा कतारचा उद्देश नाहीये. तर आपत्कालीन परिस्थितीत आपल्या नागरिकांना अन्न पुरवता येईल याची खात्री व्हावी यासाठी गुंतवणूक सुरू आहे.

कतारच्या या योजना इतर लोकांना विचित्र वाटतील, पण डॉ. विल ले क्वीजेन सांगतात की, कतारसमोर जी आव्हानं आहेत ती इतर देशांपेक्षा फार काही वेगळी नाहीयेत.

"एखाद्या शुष्क आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशात तुम्हाला पाण्याची गरज असते तर अतिथंड प्रदेशात तुम्हाला उबदार वातावरणाची आवश्यकता असते. प्रत्येकासमोर स्वतःची लढण्यासाठी आव्हानं आहेत."

डॉ. बेन हमादोऊ म्हणतात, "कतार या जास्तीच्या ऊर्जा-केंद्रित प्रक्रियांवर काहीतरी उपाय शोधेल याची मला आशा आहे. कारण पाण्याशिवाय तर जगता येत नाही."

चर्चा तर अशा सुद्धा आहेत की, 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या देशात व्हाव्यात यासाठी कतारचे प्रयत्न सुरू आहेत. पण मग या स्पर्धा भरवल्या तर कतारला आणखीन आव्हानांचा सामना करावा लागेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)