निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा 'गर्जना मोर्चा'; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा
फोटो कॅप्शन, फाईल फोटो
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

कॉक्रोच जनता पार्टीनं महात्मा गांधी जयंतीला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर केलेल्या आंदोलनानंतर आता आज रविवारी (4 ऑक्टोबर) ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार असून या मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात वाढता असंतोष

'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रानं इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टमधून उघड केलेल्या काही बाबींनंतर, गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्यानं आयोगाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.

त्यामुळे, विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये, दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप नोंदवल्या आल्याचं म्हटलं होतं.

या वृत्तात प्रामुख्याने 3 मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.

  • SIR अंतर्गत मतदारांच्या नावांचा समावेश आणि वगळण्याबाबत 2 निवडणूक आयुक्तांनी घेतलेला आक्षेप.
  • फॉर्म 6 मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत नोंदवण्यात आलेला आक्षेप.
  • ECINet च्या केंद्रीकरणाचा, ज्यामुळे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना त्याचा अॅक्सेस मिळत नव्हता.

याशिवाय, द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात गोव्याचे उदाहरण देण्यात आले होते. त्यामध्ये 97 मतदार पात्र ठरल्यानंतरही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याचं म्हटलं होतं.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या प्रसिद्धीपत्रकात या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा

या रिपोर्टनंतर, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं देशभरात आंदोलनं केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनंही मुंबईत आंदोलन केलं आहे.

इंडिया आघाडीच्यावतीने 6 ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत.

तत्पूर्वी, आज रविवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंचा मुंबईत मोर्चा होणार आहे.

याआधीही, शिक्षणमंत्री राहिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत आंदोलन केलं होतं.

निवडणूक आयोगाविरोधातला 'गर्जना मोर्चा'

आज, रविवारी निघणाऱ्या ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला 'गर्जना' मोर्चा असं नाव देण्यात आलं आहे.

या मोर्चाचा ठरवण्यात आलेला आधीचा मार्ग बदलण्यात आला असून याबाबतची माहिती राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करून दिली आहे.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा

मुंबईत ठाकरे बंधूंचा हा गर्जना मोर्चा मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची सर्वांनी नोंद घ्यावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

"निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा 'गर्जना' मोर्चा येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला निघणार आहे. याबाबत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण मोर्च्याचा आधीचा मार्ग बदलावा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती. त्या विनंतीला मान देऊन हा मोर्चा 'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी आणि मोर्च्यात सामील होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. बाकी मोर्च्याला भेटूच", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सीजेपीच्या 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलनाचं आयोजन करणारे आयोजक आणि इतर 400 ते 500 अज्ञात सीजेपी समर्थकांविरोधात शिवाजी पार्क ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना बेकायदेशीर जमा जमावणे, लाउडस्पीकरचा वापर, गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, वाहतुकीला अडथळा तसेच पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा

पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान गेट नंबर 6, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

यात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेसह आशुतोष रांका, सौरभ दास, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आफरीन नवाज, पीएसयुच्या सौम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळे व इतर अनोळखी 400 ते 500 सीजेपी समर्थक आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189 आणि 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. शिवाजी पार्क पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली.

ते म्हणाले, "आणखी गुन्हे दाखल करा, पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढा सुरूच ठेवू!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)