हत्ती, विनोद, रिंगटोन्स आणि जाहिराती... कॉन्डोमच्या प्रसारासाठी भारताने काय काय केलंय?

    • Author, झोया मतीन आणि देवांग शहा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोट्यवधी लोकांना तुम्ही फॅमिली प्लॅनिंगविषयी कसं शिकवाल?

त्यांना कॉन्डोम हा शब्द वारंवार उच्चारायला लावायचा की त्याच्या अवतीभोवती असलेली सगळी लाज किंवा बुरसरटेले विचार गळून पडतील.

जरा जोखमीची कामगिरी वाटली तरी जाहिरात लेखक आनंद सुसपी यांनी 18 वर्षांपूर्वी हेच केलं. ते आणि त्यांच्या टीमने लोव लिंटास या जाहिरात संस्थेत काम करत असताना ‘कॉन्डोम बिन्धास्त बोल’ ही मोहीम आखली.

2006 मध्ये जनजागरूकता करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती आणि यात भारत सरकारचीही भागीदारी होती. कॉन्डोमचा खप तसंच वापर उत्तरेकडच्या आठ राज्यांमध्ये घसरला होता. याच राज्यांमध्ये भारताची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या राहाते. हा खप आणि वापर वाढवण्याकरिता ही मोहीम हाती घेतली होती.

या अंतर्गत वेगवेगळ्या जाहिराती तयार करण्यात आल्या होत्या. सगळ्या जाहिरातींमध्ये एक लाजाळू पुरुष दाखवला आहे. मग तो एखादा तरूण पोलीस कर्मचारी असेल, किंवा कोर्टाबाहेर बसलेला वकील. त्याला त्याचे सहकारी हा शब्द स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण्यासाठी प्रोत्साहन देतात.

“बोल बिन्धास्त बोल” असं म्हणत हे सहकारी त्याला तोपर्यंत उत्तेजन देत राहातात जोवर तो कॉन्डोम हा शब्द पटकन म्हणून टाकत नाही.

ही जाहिरात मालिका खूप प्रसिद्ध झाली, तिला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कारही मिळाला. भारतातल्या कुटुंबनियोजनचा व्यापक मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या अनेक जाहिरातींपैकी ही एक जाहिरात होती.

या जाहिराती कधी विनोदी असायच्या, कधी कुटुंबनियोजनाचा महत्त्वाचा संदेश द्यायच्या. भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रित करणं आणि सुरक्षित सेक्सचा प्रचार करणं असा या जाहिरातींमागचा हेतू असायचा.

कुटुंबनियोजनाच्या जाहिराती आणि घोषणा पहिल्यांदा 1950 च्या दशकात उदयाला आल्या. तेव्हा भारत सरकारने कुटुंबनियोजनासाठी एक विशेष खातं स्थापन केलं. हे जगात पहिल्यांदाच होत होतं.

या खात्याने गर्भनिरोधकं आणि नसबंदीसारख्या गोष्टींचा आक्रमकपणे प्रचार करायला सुरुवात केली. अतिवेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रित करणं हा यामागचा हेतू होता.

लोकांच्या तोंडात चटकन रुळतील अशा घोषणा आल्या. त्यात ‘हम दो, हमारे दो’, ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ अशा घोषणा टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांमध्ये वाजवल्या जाऊ लागल्या. पोस्टर लावले जाऊ लागले.

जितक्या मार्गांनी लोकांपर्यंत पोहोचता येईल ते सगळे मार्ग वापरण्यात येऊ लागले. या खंडप्राय देशातल्या दुर्गम भागात हा संदेश नेण्यासाठी हत्तींचाही वापर केला गेला.

या घोषणा आजही भारतच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी समानअर्थी शब्द म्हणून वापरल्या जातात.

“पुरुष इतर वेळी अश्लील जोक्स करत असतील, त्यांना ते विनोदीही वाटत असतील पण तुम्ही त्यांच्यासमोर कॉन्डोम हा शब्द उच्चारला की त्यांना शरम वाटते,” सुसपी म्हणतात.

संशोधनातून समोर आलंय की पुरुषांना सुरक्षित सेक्सबदद्ल बोलण्याची इच्छा नसते म्हणून ते हा विषय टाळतात.

शाश्वती बॅनर्जी एक आरोग्यविषयक तज्ज्ञ आहेत. त्यांनीही ‘बिन्धास बोल’ या मोहिमेवर काम केलं आहे. त्यांच्या मते या मोहिमेमागची कल्पना सोपी होती – पुरुषांना न लाजता कॉन्डोमविषयी बोलायला प्रवृत्त करायचं. कारण कॉन्डोम हा वाईट शब्द नाही, अश्लील शब्द नाही. त्याची दबक्या आवाजात चर्चा करण्याची गरज नाही, कॉन्डोम सगळे वापरतात, सगळ्यांनी वापरले पाहिजेत.

या मोहिमेअंतर्गत 40 हजाराहून जास्त कॉन्डोम निर्माते आणि मेडिकल स्टोअरवाल्यांशी टायअप केलं. मेडिकल स्टोअरच्या काऊंटरवर कॉन्डोम सतत दिसत राहावेत आणि त्यायोगे पुरुषांना याबद्दल अधिक सजग करता यावं असा होतू होता.

“पण कामाला काय आलं असेल तर विनोद. तुम्ही आधी हसता आणि मग हळूहळू तो संदेश तुमच्या मनात उतरतो,”सुसपी म्हणतात.

सरकार आणि खाजगी संस्थांनी एकत्र येत कुटुंबनियोजनाच्या जाहिरातींवर खूप वेळ, पैसा खर्च केला असला तर सगळ्याच जाहिराती यशस्वी ठरल्या नाहीत. काहींवर टीकाही झाली.

टीकाकारांचं म्हणणं आहे की कुटुंबनियोजनांच्या अनेक मोहिमा म्हणावं तितकं काम करू शकल्या नाहीत कारण त्यांचा रोख फक्त महिलांवर होता, आणि पुरुषांचा यातून जणूकाही वगळलंच होतं.

राधाराणी मित्रा बीबीसीच्या मीडिया अॅक्शन विभागाच्या नॅशनल क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एक्झेक्युटिवह प्रोड्युसर आहेत.

त्या म्हणतात, “त्या काळात महिलांना गर्भनिरोधकाची कोणती साधनं वापरायची हे निवडण्याच अधिकार नव्हताच पण गर्भनिरोधकं वापरायची की नाही हेही ठरवण्याचा अधिकार नव्हता.”

गर्भनिरोधकांचा सगळा भार महिलांच्या वाट्याला आला, पण ज्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया होती असे पुरुष यापासून लांबच राहिले. त्यांना कुटुंबनियोजनांच्या पद्धतीबद्दल ना माहिती होती, ना त्यांना त्या वापरण्याची इच्छा होती.

अजूनही हाच ट्रेंड चालू आहे. 2019 ते 2021 या काळात जितक्या महिलांचा सर्व्हे झाला त्यापैकी 38 टक्के महिलांनी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केल्याचं सांगितलं, त्यातुलनेत फक्त 0.3 टक्के पुरुषांनी नसबंदी केल्याचं म्हटलं.

आनंद सिन्हा सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, “घोषणा देणं हा लोकांचं काऊन्सिलिंग करणं किंवा मोठ्या प्रमाणावर समाजात बदल घडवून आणणं याला पर्याय असू शकत नाहीत.”

पण या घोषणांमुळे एक सकारात्मक वातावरण तयार व्हायला मदत झाली खरी.

1975 च्या आणिबाणीच्या काळात लोकांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या होत्या. त्या काळात कुटुंबनियोजनच्या योजनेला धक्का बसला.

या काळात सरकारने लाखो महिला, पुरुष अगदी लहान मुलांची जबरदस्तीने नसबंदी केली. “यामुळे एकूणच कुटुंबनियोजन मोहिमेला बट्टा लागला. लोक अचानक गर्भनिरोधकांच्या नावालाही घाबरू लागले,” सिन्हा म्हणतात.

त्यानंतर अनेक वर्षं कुटुंबनियोजनच्या मोहिमेला नव्याने डिझाईन करणं आणि तिला ‘स्वीकारार्ह आणि मैत्रीचं’ स्वरूप देणं हे सर्वांत मोठं आव्हान होतं.

याच सुमारास कॉन्डोम विकणाऱ्या खाजगी कंपन्या तरुण जोडप्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायला लागल्या. परिणामी या जाहिराती अधिक सेक्सी आणि अधिक भावणाऱ्या झाल्या.

1980 च्या दशकात जेव्हा एचआयव्ही/एड्स पाश्चिमात्य देशांमध्ये धुमाकूळ घालायला लागला तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात या रोगाने थैमान घातलं तर काय अशी भीती पसरली. “यानंतर सेक्सचा विषय अधिक मोकळेपणाने बोलला जाऊ लागला आणि कॉन्डोमबद्दलच्या जाहिराती, जनहितार्थ केलेली जागरूकता यांचं प्रमाण वाढलं,” मित्रा म्हणतात.

यापैकी लक्षात राहणारी जाहिरात म्हणजे कॉन्डोम रिंगटोनची. 2008 साली आलेली ही जाहिरात कॉन्डोमला सर्वार्थाने लोकांच्या जीवनातली सहजमान्य वस्तू करण्याच्या हेतूने बनवण्यात आली होती.

ही जाहिरात ज्या सामाजिक मोहिमेअंतर्गत बनली ती मोहीम बीबीसी मीडिया अॅक्शनच्या नेतृत्वाखाली चालवली गेली होती आणि त्याला आर्थिक पाठबळ बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आलं होतं.

ही मोहीम भारतात एचआयव्ही थांबवण्यासाठी राबवण्यात आलेल्या एका मोठ्या मोहिमेचा भाग होती.

या जाहिरातीत एक रिंगटोन होती ज्यात कॉन्डोम...कॉन्डोम हा शब्द वेगवेगळ्या सुरावटींवर उच्चारला जात होता. एका लग्नात एका माणसाचा हा रिंगटोन वाजतो आणि तो कसा शरमेने पाणी पाणी होतो याचं विनोदी चित्रणही यात होतं.

मित्रा म्हणतात की ही रिंगटोन व्हायरल झाली. ती जवळपास 4 लाख 80 हजार वेळा डाऊनलोड झाली. अमेरिकेतल्या रेडियोवरच्या एनपीआर या शोमध्ये वाजली. जपानपासून इंडोनेशिया आणि दक्षिण अमेरिकेपासून यूरोपपर्यंत सगळीकडे ही रिंगटोन वाजवली गेली.

“ही रिंगटोन चर्चेत राहिली, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये अवतरली, अनेक ठिकाणी तिने बक्षीसं जिंकली पण या रिंगटोनचा एक मोठा सामाजिक परिणाम झाला, हे महत्त्वाचं,” बॅनर्जी म्हणतात.

त्या पुढे सांगतात, “लोकांच्या वागण्याची पद्धत बदलणं हे एका तुकड्या तुकड्यांच्या कोड्यासारखं असतं. तुम्ही एकेक तुकडा जोडत जाता, आणि सगळे तुकडे जोडले गेले की चित्र तयार होतं. कधी कधी एखाद्या विषयावर फक्त बोललं तरी लोकांचे दृष्टीकोन बदलता येतात.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)